बचत गटाच्या माध्यमातून १० एकर क्षेत्रावर सामूहिक शेतीचा प्रयोग
गुहागर, ता. 02 : हरितक्रांतीचे प्रणेते व महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री कै. वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त गुहागर पंचायत समिती, तालुका कृषि विभाग आणि ग्रामपंचायत उमराठ यांच्या संयुक्त विद्यमाने १ जुलै रोजी उमराठ येथे कृषिदिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी बचत गटांच्या माध्यमातून तब्बल १० एकर क्षेत्रावर सामूहिक शेतीचा महत्त्वाकांक्षी उपक्रम सुरू करण्यात आला. ही माहिती पंचायत समितीचे सभापती प्रणव पोळेकर यांनी दिली. Agriculture Day at Umarath

कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन व कै. वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेचे पूजन करून झाली. यावेळी सभापती प्रणव पोळेकर, उपसभापती निलेश सुर्वे, जिल्हा परिषद सदस्या अपूर्वा बारगोडे, नेत्राताई ठाकूर, पंचायत समिती सदस्य संदीप गोरीवले, गौरव वेल्हाळ, मानसी रांगळे तसेच उमराठचे प्रशासक जनार्दन आंबेकर उपस्थित होते. Agriculture Day at Umarath

कृषिदिनानिमित्त ग्रामपंचायत हद्दीत वृक्षलागवड करण्यात आली. आधुनिक व सेंद्रिय शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी शेतकऱ्यांना ‘गोकृपा अमृतम’ तयार करण्याचे प्रात्यक्षिक दाखविण्यात आले. तसेच बचत गटांच्या माध्यमातून सामूहिक शेतावर नाचणी व विविध फळभाजी पिकांच्या लागवडीचा शुभारंभ करण्यात आला. उपसभापती निलेश सुर्वे आणि जिल्हा परिषद सदस्या नेत्राताई ठाकूर यांनी सेंद्रिय शेतीचे महत्त्व अधोरेखित करत शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. Agriculture Day at Umarath

कार्यक्रमाला गटविकास अधिकारी प्रदीप शिंदे, तालुका कृषि अधिकारी अमोल क्षीरसागर, कृषि अधिकारी कृष्णदेव कदम, मंडळ कृषि अधिकारी नाले, सर्जेराव कांबळे, मंगेश पिंगळे, विस्तार अधिकारी प्रतीक जाधव, कृषि पर्यवेक्षक कुसाळकर यांच्यासह सर्व सहाय्यक कृषि अधिकारी उपस्थित होते. तसेच महात्मा गांधी तंटामुक्त समितीचे अध्यक्ष कृष्णा गोरीवले, पोलीस पाटील वासंती आंबेकर आणि ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला. कार्यक्रमाची प्रस्तावना तालुका कृषि अधिकारी अमोल क्षीरसागर यांनी केली, तर सूत्रसंचालन ग्रामपंचायत अधिकारी सिद्धेश लेंडवे यांनी केले. Agriculture Day at Umarath
