१५ ऑगस्टपर्यंत वाढवण्याबाबत सरकार सकारात्मक
गुहागर, ता. 24 : पारंपरिक मच्छिमारांची गेल्या दोन दशकांहून अधिक काळापासूनची पावसाळी मासेमारी बंदीचा कालावधी ६१ दिवसांवरून ७६ दिवस (१५ ऑगस्टपर्यंत) करण्याची मागणी आता पूर्णत्वास जाण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे यांनी या मागणीची दखल घेत सात सागरी जिल्ह्यांतील मच्छिमार जिल्हा समित्यांकडून अभिप्राय मागवला होता. रायगड वगळता सर्व जिल्ह्यांनी बंदी कालावधी १५ ऑगस्टपर्यंत वाढवण्यास समर्थन असल्याची माहिती काही मच्छीमार संघटनांना दिली आहे. Fishing ban period to be extended

अखिल महाराष्ट्र मच्छिमार कृती समितीचे अध्यक्ष देवेंद्र तांडेल यांनी सांगितले की, या संदर्भातील आवश्यक प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण झाली असून अंतिम मंजुरीसाठी प्रस्ताव राज्याच्या विधी विभागाकडे पाठवण्यात आला आहे. २२ जूनला समितीच्या शिष्टमंडळाने मत्स्यमंत्री नितेश राणे यांची भेट घेतली. यावेळी सरकारकडून बंदी कालावधी ३१ जुलैऐवजी १५ ऑगस्टपर्यंत वाढवण्याबाबत सकारात्मक हालचाली सुरू आहेत. बंदी कालावधी वाढवल्यास मत्स्य संवर्धन, मासळी पिल्लांचे संरक्षण, माशांच्या प्रजननाला पोषक वातावरण आणि भविष्यातील मत्स्योत्पादन टिकवून ठेवण्यास मोठी मदत होईल तसेच वाढती चक्रीवादळे, अवकाळी वादळे आणि प्रतिकूल हवामानाच्या पार्श्वभूमीवर मच्छिमारांच्या सुरक्षेसाठीही हा निर्णय आवश्यक असल्याचे मत काही मच्छीमार नेत्यांनी व्यक्त केले आहे. Fishing ban period to be extended
