गुहागर, ता. 11 : तालुक्यातील धोपावे येथे महावितरण विभागाच्या भोंगळ कारभारामुळे एका गायीचा जीव गेल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. अंडरग्राऊंड वीज वाहिनीच्या डीपी मधून (डिस्ट्रिब्युशन पॉईंट) वायरमध्ये विद्युतप्रवाह उतरल्याने गायीला जोरदार शॉक बसून तिचा मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरातील ग्रामस्थांमध्ये संतापाची लाट उसळली असून नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. Cow dies of electrocution at Dhopave
स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, गावात अंडरग्राऊंड वीज केबल टाकण्यात आली असली तरी संबंधित यंत्रणेची योग्य देखभाल आणि तपासणी होत नसल्याने अनेक ठिकाणी विद्युतगळतीचा धोका निर्माण झाला आहे. या निष्काळजीपणामुळेच गायीचा बळी गेल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. घटनेनंतर संतप्त ग्रामस्थांनी महावितरण विभागाच्या कार्यपद्धतीवर तीव्र नाराजी व्यक्त केली. “आज जनावराचा जीव गेला, उद्या एखाद्या नागरिकाला किंवा लहान मुलाला शॉक लागल्यास त्याची जबाबदारी कोण घेणार?” असा सवाल ग्रामस्थांकडून उपस्थित केला जात आहे. Cow dies of electrocution at Dhopave

धोपावे परिसरात अंडरग्राऊंड केबल आणि डीपीची तातडीने तांत्रिक तपासणी करण्यात यावी, दोषींवर कारवाई करावी तसेच मृत गायीच्या मालकाला योग्य नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. या गंभीर प्रकारानंतर महावितरण विभाग नेमकी कोणती भूमिका घेणार आणि नागरिकांच्या सुरक्षेसाठी कोणती उपाययोजना करणार, याकडे संपूर्ण धोपावे परिसराचे लक्ष लागले आहे. Cow dies of electrocution at Dhopave
