भाट्ये खाडीत ९५ कोटींचा ‘ग्रोएन्स’ बंधारा; नौकांचा मार्ग होणार मोकळा
रत्नागिरी, ता. 29 : रत्नागिरीतील भाट्ये खाडी आणि समुद्राच्या मुखाशी साचणाऱ्या गाळाचा जुना प्रश्न आता कायमस्वरूपी सुटणार आहे. राज्याचे उद्योग आणि रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी ९५ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असून, प्रत्यक्ष कामाला लवकरच सुरुवात होत आहे. ‘Groen’s’ dam in Bhatye Bay
काय आहे ‘ग्रोएन्स’ बंधारा प्रकल्प?
भाट्ये पूल ते मांडवी दरम्यान समुद्रात सुमारे १ किलोमीटर लांबीचा ‘ग्रोएन्स’ पद्धतीचा समांतर बंधारा बांधला जाणार आहे. समुद्राच्या लाटांसोबत येणारा गाळ या बंधाऱ्यामुळे खाडीमुखात न शिरता बाहेरच अडवला जाईल. यामुळे खाडीतील पाण्याचा मार्ग (चॅनेल) सुरक्षित राहील आणि मच्छीमार नौकांना भरती-ओहोटीच्या वेळी होणारा अडथळा दूर होईल. केवळ बंधाराच नव्हे, तर खाडीतील साचलेला गाळ काढण्यासाठी (ड्रेजिंग) स्वतंत्रपणे १२५ कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी मिळाली आहे. अशा प्रकारे एकूण २२० कोटींच्या या दुहेरी प्रकल्पामुळे भाट्ये खाडीचा चेहरामोहरा बदलणार आहे. सध्या भाट्ये किनाऱ्यावर साहित्याच्या हालचालीसाठी रस्ता तयार करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू झाले आहे. ‘Groen’s’ dam in Bhatye Bay
पालकमंत्री उदय सामंत आणि बंदर विकास मंत्री नितेश राणे यांच्या माध्यमातून या प्रकल्पाला सर्व तांत्रिक व सीआरझेड परवानग्या मिळाल्या असून, यामुळे रत्नागिरीच्या मत्स्य व्यवसायाला मोठी चालना मिळणार आहे. ‘Groen’s’ dam in Bhatye Bay
