गुहागर, ता. 29 : मुंबईतील वरळी येथून गुहागरकडे येत असताना एका महिलेच्या बॅगेतून तब्बल ३ लाख ८४ हजार ८०० रुपये किमतीचे सोन्याचे दागिने अज्ञात चोरट्याने लंपास केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. प्रवासादरम्यान घडलेल्या या धाडसी चोरीमुळे प्रवाशांच्या सुरक्षिततेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला असून गुहागर पोलीस ठाण्यात अज्ञात इसमाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. Woman’s Jewelry Stolen During Journey
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मैथिली मिलिंद आरेकर (वय ५१, रा. वरळी, मुंबई) या आपला मुलगा ऋग्वेद याच्यासह २६ एप्रिल रोजी रात्री गुहागरला जाण्यासाठी निघाल्या होत्या. वरळी ते गुहागर या दीर्घ प्रवासादरम्यान २६ एप्रिल रोजी रात्री ९.१५ वाजल्यापासून ते २७ एप्रिल रोजी सकाळी ७ वाजेपर्यंतच्या कालावधीत ही चोरी घडल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. आरेकर यांच्या जवळील काळ्या रंगाच्या प्रवासी बॅगेमध्ये वामन हरी पेठे ज्वेलर्सचे जांभळ्या रंगाचे पाकीट ठेवण्यात आले होते. या पाकिटात मौल्यवान सोन्याचे दागिने सुरक्षित ठेवले होते. मात्र, प्रवासादरम्यान अज्ञात चोरट्याने संधी साधून बॅगेतून हे पाकीट चोरून नेले. चोरी इतक्या सफाईने करण्यात आली की प्रवासादरम्यान कोणालाही त्याची चाहूल लागली नाही. Woman’s Jewelry Stolen During Journey
चोरीस गेलेल्या ऐवजात सुमारे १ लाख ३० हजार रुपये किमतीचे पाच तोळ्यांचे व ३८ इंच लांबीचे मोठे मंगळसूत्र, २ लाख ५२ हजार रुपये किमतीच्या प्रत्येकी एक तोळ्याच्या चार सोन्याच्या बांगड्या, तसेच २ हजार ८०० रुपये किमतीचा जास्वंदीच्या फुलांची नक्षी असलेला कर्णफुलांचा जोड असा एकूण ३ लाख ८४ हजार ८०० रुपयांचा समावेश आहे. गुहागर येथे पोहोचल्यानंतर बॅगेतील दागिने गायब झाल्याचे लक्षात येताच आरेकर कुटुंबीयांना मोठा धक्का बसला. त्यांनी तातडीने गुहागर पोलीस ठाणे गाठून याबाबत तक्रार दाखल केली. Woman’s Jewelry Stolen During Journey
पोलिसांनी भारतीय न्यायसंहिता अधिनियम २०२३ च्या कलम ३०५ (क) नुसार अज्ञात आरोपीविरोधात चोरीचा गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे. ही चोरी नेमकी प्रवासाच्या कोणत्या टप्प्यात झाली, बसमध्ये, खासगी वाहनात की इतर कोणत्या ठिकाणी, याचा तपास पोलीस करत आहेत. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज, प्रवासातील थांबे, तसेच संशयितांची हालचाल यांची तपासणी केली जात आहे. दरम्यान, या घटनेमुळे लांब पल्ल्याचा प्रवास करणार्या प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून मौल्यवान वस्तू सुरक्षित ठेवण्याबाबत अधिक सतर्क राहण्याचे आवाहन पोलिसांकडून करण्यात येत आहे. प्रवासादरम्यान अनोळखी व्यक्तींवर विश्वास ठेवू नये, बॅग नेहमी स्वतःजवळ ठेवाव्यात आणि मौल्यवान वस्तू शक्यतो वेगवेगळ्या ठिकाणी ठेवाव्यात, असा सल्लाही पोलिसांनी दिला आहे. Woman’s Jewelry Stolen During Journey
