गुहागर, ता. 28 : संपूर्ण जिल्ह्यात मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून १०६. २९ कि. मी. ची ४९ कामे पूर्ण झाली आहेत. यात चिपळूण (११ कामे) आणि खेड (१० कामे) तालुक्यांनी आघाडी घेतली आहे. पंतप्रधान योजनेत पिछाडीवर असलेल्या गुहागर तालुक्याने मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेत मात्र चांगली कामगिरी केली आहे. या योजनेतून गुहागरमध्ये २१. १८ किमीचे ८ रस्ते पूर्ण झाले आहेत. या नव्या रस्त्यांमुळे केवळ दळणवळण सोपे झाले नाही. शेतकऱ्यांचा माल बाजारपेठेपर्यंत वेळेत पोहोचण्यास मोठी मदत होणार आहे. जिल्ह्यातील ग्रामीण भागातील संपर्क वाढल्याने ग्रामस्थांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. Chief Minister Village Road Scheme
जिल्ह्याच्या दुर्गम भागातील विकासाची वाट आता अधिक सुखकर झाली आहे. पंतप्रधान आणि मुख्यमंत्री ग्रामसडक योजनांच्या माध्यमातून रस्ते विकासाचा मोठी गती पाहायला मिळत आहे. आतापर्यंत एकूण ७७ रस्ते पूर्ण झाले असून, सुमारे ३०० किमीहून अधिक लांबीचे रस्ते सुस्थितीत करण्यात यश आले. यामुळे पावसाळ्यातील प्रवासाची अडचण दूर होऊन ग्रामीण अर्थव्यवस्थेला नवी गती मिळणार आहे. Chief Minister Village Road Scheme
प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेच्या तिसऱ्या टप्प्यात जिल्ह्यात २८ कामे पूर्ण झाली आहेत. एकूण २०७.९५ कि.मी. रस्त्यांचे जाळे तयार करण्यात आले आहे. यात राजापूर तालुक्याने ४०.४५ किमीचे ७ रस्ते पूर्ण करत बाजी मारली आहे. चिपळूणमध्ये ४२.६९ किमीचे रस्ते तयार झाले आहेत. विशेष म्हणजे, याच योजनेत गुहागर तालुक्यात अद्याप एकही काम पूर्ण होऊ शकलेले नाही, ही चिंतेची बाब ठरत आहे. पुढच्या टप्यात गुहागर तालुक्यात सुधारणा होईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. Chief Minister Village Road Scheme
