गुहागर, ता. 11 : सध्या चिंताजनक प्रवृत्ती वाढताना दिसत आहे. अर्धवट शिक्षण घेतलेल्या अनेक युवकांना घरातील काम, शेती किंवा जबाबदाऱ्या पार पाडण्याची इच्छा नसल्याचे चित्र दिसून येत आहे. आई-वडिलांनी काम सांगितल्यास उलट उत्तर देणे, रागावणे आणि दिवसाचा बहुतांश वेळ गल्लीबोळातील चौकात किंवा पारावर बसून मोबाईलवर घालवणे, ही सवय वाढत चालली आहे. यामुळे पालकवर्गात चिंता व्यक्त केली जात आहे. Youth addicted to social media
अॅन्ड्रॉइड मोबाईल आणि इंटरनेटच्या वाढत्या वापरामुळे ग्रामीण भागातील युवकही डिजिटल झाले आहेत. शिक्षणासाठी किंवा इतर कारणांसाठी पालकांनी मोबाईल उपलब्ध करून दिले असले, तरी त्याचा योग्य वापर होत नसल्याचे वास्तव समोर येत आहे. काही युवकांनी मोबाईलचा योग्य वापर करून उच्च पदे मिळवली असली, तरी अनेकजण सोशल मीडियाच्या आहारी जाऊन स्वतःचे नुकसान करून घेत आहेत. Youth addicted to social media
आई-वडील उन्हातान्हात, पावसात शेतात मेहनत करून कुटुंब चालवत आहेत, याची जाणीवही अनेकांना राहिलेली नाही. देशाचे आणि समाजाचे भवितव्य घडविण्याची ताकद ज्यांच्या हातात आहे, त्या तरुणांकडून मोठ्या अपेक्षा आहेत. सामर्थ्य, ऊर्जा आणि बुद्धिमत्ता असलेल्या या युवकांसमोर आज बेरोजगारी, गुन्हेगारी यांसारख्या समस्या उभ्या आहेत. तंत्रज्ञान आणि इंटरनेटमुळे संधी वाढल्या असल्या, तरी त्याचबरोबर सोशल मीडियाचा अतिरेक तरुणाईला दिशाभूल करत असल्याचे चित्र आहे. दिवसातील मौल्यवान वेळ फेसबुक, व्हॉट्सअॅपसारख्या माध्यमांवर खर्च होत असल्याने युवकांच्या प्रगतीवर परिणाम होत आहे. Youth addicted to social media
एकेकाळी महिन्याला मिळणारा एक जीबी इंटरनेट डेटा पुरेसा वाटत होता. मात्र आजच्या काळात दिवसालाही तो अपुरा पडत असल्याने सोशल मीडियाचे व्यसन किती वाढले आहे, हे स्पष्ट होते. समाजाच्या आणि कुटुंबाच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी तरुणाईने तंत्रज्ञानाचा योग्य वापर करून स्वतःच्या प्रगतीकडे लक्ष देणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त होत आहे. Youth addicted to social media
