स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची नेत्रावती एक्सप्रेसमध्ये मोठी कारवाई
रत्नागिरी, ता. 12 : मुंबईतील वाकोला परिसरातून अपहरण झालेल्या दोन अल्पवयीन मुलींचा शोध घेण्यात रत्नागिरी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला (LCB) अवघ्या काही तासांत यश आले आहे. ‘ऑपरेशन मुस्कान’ अंतर्गत रत्नागिरी रेल्वे स्थानकावर नेत्रावती एक्सप्रेसमध्ये ही कारवाई करण्यात आली असून, दोन्ही मुलींना सुरक्षितरीत्या वाकोला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. Search for kidnapped girls in Ratnagiri
बृहन्मुंबईतील वाकोला पोलीस ठाण्याच्या हद्दीतून दोन अल्पवयीन मुलींचे अपहरण झाल्याची घटना घडली होती. याप्रकरणी वाकोला पोलीस ठाण्यात ११ फेब्रुवारी २०२६ रोजी भारतीय न्याय संहिता (BNS) कलम १३७(२) अन्वये गु.र.नं. १४६/२०२६ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. या मुलींचा शोध घेण्यासाठी मुंबई पोलीस युद्धपातळीवर प्रयत्न करत होते. Search for kidnapped girls in Ratnagiri

सदर मुली नेत्रावती एक्सप्रेसने गोव्याच्या दिशेने प्रवास करत असल्याची गोपनीय माहिती रत्नागिरी पोलिसांना प्राप्त झाली. या माहितीचे गांभीर्य ओळखून रत्नागिरीचे पोलीस अधीक्षक श्री. नितीन दत्तात्रय बगाटे आणि अपर पोलीस अधीक्षक श्री. बी. बी. महामुनी यांनी तात्काळ स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला कारवाईचे आदेश दिले. मिळालेल्या सूचनेनुसार, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे एक पथक तात्काळ रत्नागिरी रेल्वे स्थानकावर दाखल झाले. नेत्रावती एक्सप्रेस स्थानकात येताच पोलिसांनी ‘ऑपरेशन मुस्कान’ अंतर्गत डब्यांची तपासणी सुरू केली. यावेळी संशयास्पदरीत्या प्रवास करणाऱ्या दोन मुली पथकाला मिळून आल्या. अधिक चौकशी केली असता, या त्याच दोन मुली असल्याचे निष्पन्न झाले ज्यांचे वाकोला येथून अपहरण झाले होते. ११ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ही यशस्वी कारवाई करण्यात आली. Search for kidnapped girls in Ratnagiri
ही कारवाई पोलीस निरीक्षक श्री. नितीन हेदे यांच्या मार्गदर्शनाखाली विजय आंबेकर (पोहेकॉ/९०९), दिपराज पाटील (पोहेकॉ/१४०७), स्वाती राणे (मपोहेकॉ/१२१०) पथकाने केली. दोन्ही मुलींची सुरक्षित सुटका करून त्यांना पुढील कार्यवाहीसाठी वाकोला पोलीस ठाण्याच्या पथकाकडे सुपूर्द करण्यात आले आहे. रत्नागिरी पोलिसांच्या या तत्परतेमुळे पालकांनी आणि नागरिकानीं पोलिसांचे आभार मानले आहेत. Search for kidnapped girls in Ratnagiri
