गुहागर, ता. 12 : डिजिटल युगात सायबर गुन्हेगार आता थेट पोलिसांनाही आपले लक्ष बनवू लागले असून सायबर गुन्हेगाराने नवी मुंबई पोलीस दलात कार्यरत असलेल्या पोलिसाला डिजिटल गोल्डमधील गुंतवणुकीच्या बहाण्याने तब्बल १८ लाख ९८ हजारांना गंडा घातल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. कळंबोली पोलिसांनी या प्रकरणात अज्ञात महिलेवर गुन्हा दाखल करुन तपासाला सुरुवात केली आहे. Policeman cheated in Facebook friendship

या प्रकरणात फसवणूक झालेला ३४ वर्षीय पोलिस शिपाई १ डिसेंबर २०२५ रोजी या पोलिसाला फेसबुकवर गौरी मुखर्जी नावाच्या महिलेची फ्रेंड रिक्वेस्ट आली. मैत्री झाल्यानंतर तिने पोलिसाचा विश्वास संपादन केला तसेच आपण कोलकाता येथे राहून डिजिटल गोल्डमध्ये गुंतवणूक करत असल्याचे सांगितले. अमेरिकेतील आपल्या काकांमार्फत या व्यवसायात गुंतवणूक केल्यास पैसे दुप्पट होतात, असे आमिष तिने या पोलिसाला दाखवले. सुरुवातीला या पोलिसाने टाळाटाळ केली; मात्र सदर महिलेने आपला फोन खराब झाल्याचे सांगून आईचा मोबाईल क्रमांक संपर्कासाठी दिला. त्यामुळे पोलिसाचा तिच्यावर विश्वास बसला. त्यानंतर त्याने गुंतवणुकीची तयारी दर्शवली. त्यानंतर सदर महिलेने या पोलिसाला एका लिंकद्वारे डीजीएम नावाच्या आयडीवर नोंदणी करण्यास सांगितले. सुरुवातीला ४० हजार रुपये भरल्यानंतर पोलिसाला त्याच्या खात्यात ३० हजारांचा नफा झाल्याचे दिसू लागले. त्यानंतर अधिक नफ्याच्या आमिषाने या पोलिसाने वेळोवेळी आरटीजीएस द्वारे २ लाख १० हजार रुपये आणि इतर रक्कम भरली. त्यानंतर त्याच्या खात्यात तब्बल ३७ लाख १८ हजार रुपये नफा झाल्याचे दिसत असल्याने पोलिसाने त्यातील २० लाख रुपये काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याला कधी विड्रॉल चार्जेस तर कधी जीएसटी आणि टॅक्स भरण्याच्या नावाखाली पुन्हा पैसे भरण्यास भाग पाडण्यात आले. अशा प्रकारे या पोलिसाने १८ डिसेंबर २०२५ ते १४ जानेवारी २०२६ या दीड महिन्यांच्या कालावधीत तब्बल १८ लाख ९८ हजार रुपये वेगवेगळ्या बँक खात्यांवर जमा केले. त्यानंतर देखील या पोलिसाला आणखी रक्कम भरण्याबाबत सांगण्यात येऊ लागले. या पोलिसाने अधिक पैसे भरण्यास नकार दिला असता, आरोपी महिलेने पैसे भरल्याशिवाय मूळ रक्कम आणि परतावा मिळणार नाही, अशी धमकी दिली. त्यानंतर फसवणूक झाल्याचे लक्षात येताच या पोलिसाने प्रथम सायबर पोर्टलवर आणि त्यानंतर कळंबोली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल करुन पुढील तपास सुरु केला आहे. Policeman cheated in Facebook friendship
