• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
1 February 2026, Sunday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

कला-साहित्य-संस्कृती क्षेत्रातील पद्मगौरव

by Guhagar News
January 31, 2026
in Maharashtra
42 1
0
Padma Gaurav in the field of art, literature and culture
83
SHARES
238
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

गुहागर, ता. 31 : प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला सालाबादप्रमाणे ‘पद्म’ पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. समाजाच्या वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये आपल्या जीवनाचे सर्वस्व समर्पित करणार्‍या अनेक मान्यवरांचा ‘पद्म’ पुरस्काराने सन्मान केला जातो. मागील काही वर्षांपासून समाजाला अपरिचित असणारी असंख्य नावे ‘पद्म’ पुरस्कारांच्या यादीत यंदाही झळकली. कला-साहित्य-संस्कृती क्षेत्रातील असे अनेक दिग्गज, ज्यांचे कार्य प्रत्येक नागरिकाला ठावूक असायलाच हवे, अशा काही निवडक, हरहुन्नरी रत्नांचा हा थोडक्यात परिचय… Padma Gaurav in the field of art, literature and culture

पुस्तक त्याचे सांगाती : अंके गौडा (पद्मश्री)

वाचनसंस्कृती हा समृद्ध समाजाचा पाया. कर्नाटकातील ७५ वर्षीय अंके गौडा यांना आपल्या तरुणपणीच या गोष्टीची प्रचिती आली आणि ज्ञानविश्वातील एक आगळावेगळा चमत्कार त्यांनी करून दाखवला. एकेकाळी बस कंडक्टर म्हणून काम करणार्‍या गौडा यांनी भारतातील सर्वांत मोठे मोफत ग्रंथालय उभारून दाखवले, ज्यामध्ये अनेक दुर्मीळ हस्तलिखितांचादेखील समावेश आहे. कर्नाटकातील मांड्या जिल्ह्यातील एका शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या गौडा यांना तरुणपणीच वाचनाची आवड निर्माण झाली. वयाच्या २०व्या वर्षापासून बस कंडक्टर म्हणून काम करत असताना, गौडा यांनी स्वकमाईतून पुस्तके खरेदी करण्यास सुरुवात केली आणि एका भव्य ग्रंथालयाचा पाया रचला. कन्नड साहित्यात पदव्युत्तर पदवी प्राप्त करून जवळपास त्यांनी तीन दशके साखर कारखान्यात काम केले. या काळात त्यांनी त्यांच्या उत्पन्नातील जास्तीत जास्त रक्कम ही पुस्तकसंग्रहासाठी खर्च केली. म्हैसूरजवळचे ‘हरलाहल्ली अंके गौडा बुकहाऊस’ हे वाचनालय सर्वांसाठी खुले आहे. इथे पुस्तकं वाचण्यासाठी आपल्याला कुठल्याही प्रकारे शुल्क भरावे लागत नाही. संशोधक, विद्यार्थी, लेखक, इतकेच काय, तर सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांनासुद्धा या पुस्तकालयाची भुरळ पडली. पाच दशकांहून अधिक काळ ज्ञानाचं संचित जमवणार्‍या अंके गौडा यांच्या कार्यामुळे हरलाहल्ली या गावाचं रुपडं पालटलं. म्हणूनच त्यांचा ‘पद्मश्री’ने झालेला गौरव हा वाचनसंस्कृतीचाच सन्मान! Padma Gaurav in the field of art, literature and culture

ज्ञानतपस्वी शतावधानी : डॉ. आर. गणेश (पद्मभूषण)

कर्नाटकातील बहुभाषिक ज्ञानतपस्वी शतावधानी डॉ. आर. गणेश यांना ‘पद्मभूषण’ जाहीर झाल्यानंतर, भारतीय संस्कृती, प्राचीन परंपरांचा अभ्यास करणार्‍यांची मान गौरवाने उंचावली. ‘अवधानम्’ हा सादरीकरणातील असा प्रकार आहे, ज्यामध्ये सादरकर्ता (ज्यास ‘अवधानी’ असे संबोधले जाते) अनेक प्रश्नकर्त्यांच्या आव्हानात्मक प्रश्नांची एकाचवेळी उत्तरे देतो. काही तज्ज्ञांच्या मते, मध्ययुगीन काळात विशेषतः तेलुगू कवींनी ही कला विकसित केली. यामध्ये विशिष्ट विषय, छंद, रचना किंवा शब्दांचा वापर करून कवितांची अंशतः उत्स्फूर्त रचना केली जाते. सादरीकरणासाठी स्मरणशक्तीची प्रतिभा, बुद्धिमत्ता, भारतीय काव्य, छंदशास्त्र आणि सादरीकरण कौशल्याचे सखोल ज्ञान आवश्यक असते. डॉ. गणेश यांनी कन्नड, संस्कृत, तेलुगू आणि प्राकृत या चार भाषांमध्ये १ हजार, ३०० हून अधिक अवधानांचे सादरीकरण केले आहे. ते कर्नाटकातील एकमेव शतावधानी (१०० प्रश्न विचारणार्‍यांसोबत सादरीकरण करणारे) आहेत. १९८१ साली ज्यावेळी त्यांनी आपल्या कार्याला सुरुवात केली, तेव्हा कन्नड भाषेमध्ये तत्कालीन समाजात ‘अवधानम्’ करणारे कुणीही नव्हते, त्यामुळे या कलाकृतीच्या पुनरुज्जीवनाचे श्रेयदेखील त्यांनाच जाते. त्यांचे कन्नड, संस्कृत, तेलुगू, तामिळ, हिंदी, मराठी, इंग्रजी, प्राकृत, पाली, ग्रीक, लॅटिन आणि इटालियन या भाषांवर प्रभुत्व आहे, ज्यामुळे ते भारतातील अग्रगण्य बहुभाषाविदांपैकी एक आहेत. Padma Gaurav in the field of art, literature and culture

संथालीचे सेवेकरी : चरण हेंब्रम (पद्मश्री)

भारतीय संस्कृतीची समृद्ध ओळख इथल्या लोकसंस्कृतीमध्ये अजूनही जिवंत आहे, याची प्रचिती आपल्याला वेळोवेळी येते. इथली बहुभाषिक विविधता जपण्यासाठी अनेकांनी श्रम उपसले आहेत. अशाच महत्त्वपूर्ण व्यक्तींपैकी संथाली भाषेसाठी काम करणारं नाव म्हणजे चरण हेंब्रम. संथाली भाषा वृद्धिंगत व्हावी, यासाठी त्यांनी प्रयत्न केलेच, मात्र त्याचबरोबर ‘ओल चिकी’ नावाच्या लिपीच्या संवर्धनासाठीसुद्धा त्यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले. रामायण-महाभारताचे अनुवाद संथालीमध्ये केल्यामुळे वनवासी लोकांपर्यंत हा वारसा सक्षमपणे पोहोचला. चारही बाजूंनी निसर्गाच्या कुशीत विलीन झालेल्या मयूरभंज जिल्ह्यात त्यांनी शिक्षणासाठी महत्त्वपूर्ण केंद्रे उभारली. वनवासी समाजातील लोकांच्या उन्नतीसाठी त्यांना अंधश्रद्धांच्या जोखडातून मुक्त करण्याचे कार्यसुद्धा त्यांनी केले. संथाली भाषेबरोबरच संथाली संगीत, नृत्य यासाठीदेखील त्यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले. ‘पद्मश्री’ पुरस्कार जाहीर झाल्यानंतर माध्यमांशी संवाद साधताना ते म्हणाले की, “आतापर्यंत ओडिशा, झारखंड आणि पश्चिम बंगालमधील सुमारे ७० संस्थांनी माझा सत्कार करून मला सन्मानित केले. आदिवासी समाजाचा विकास आणि आदिवासींमध्ये शिक्षणाचा प्रसार कसा घडवून आणायचा, हेच माझ्यासमोरील प्रमुख आव्हान आहे,” असे ते म्हणाले. वनवासी जीवनसंस्कृतीचा जीवनपरिचय करून देणार्‍या अनेक ग्रंथांचेदेखील त्यांनी लेखन केले आहे. Padma Gaurav in the field of art, literature and culture

‘जामदनी’चे तारक : ज्योतिष देबनाथ (पद्मश्री)

भारताला वस्त्रसंस्कृतीचा प्राचीन इतिहास लाभला आहे. खाद्यसंस्कृती, शिल्पकला याच पद्धतीने वस्त्रसंस्कृतीचा स्वतःचा एक विचार आणि प्रवाह आहे. याच वस्त्रसंस्कृतीच्या परंपरेचा एक अमूर्त वारसा म्हणजे जामदानी विणकाम. याच जामदानी कलेचं जतन करणार्‍या ज्योतिष देबनाथ यांना ‘पद्मश्री’ पुरस्काराने गौरवण्याचा निर्णय सरकारने घेतला. जामदानी विणकामाच्या विश्वातील एक महत्त्वाचं नाव म्हणजे ज्योतिष देबनाथ. पश्चिम बंगालच्या पूर्व बर्धमान जिल्ह्यातील कालना इथे राहणार्‍या ज्योतिष यांना हा वारसा त्यांच्या कुटुंबातच मिळाला. एकाचवेळी पारंपरिक शैलीचे जतन करतानासुद्धा आपल्या तंत्रामध्ये त्यांनी नवनवीन प्रयोग करत ही वस्त्रकला जिवंत ठेवली. एकेकाळी या वस्त्रकलेला राजाश्रय लाभला होता. वस्त्राची निर्मिती करताना, प्रत्येक कारागिराला अत्यंत सूक्ष्मपणे काम करावं लागतं. बांबूच्या सुईचा (ज्याला ‘कंदूर’ म्हणतात) वापर करून धाग्यांनी वेगवेगळ्या छटा तयार केल्या जातात. हे विणकाम कापडाच्या मागच्या आणि पुढच्या दोन्ही बाजूंनी सारखेच दिसते. जामदानी कापड अत्यंत हलके, मऊ आणि पारदर्शक असते. म्हणूनच त्यामागची निर्मितीसुद्धा तितकीच संवेदनशील असावी लागते. ज्योतिष देबनाथ यांच्या कार्याचे वैशिष्ट्य म्हणजे, केवळ पश्चिम बंगाल आणि भारतच नव्हे, तर जगभरात त्यांच्या विणकामाचे कौतुक केले जाते. ‘गुच्ची’ आणि ‘अरमानी’सारख्या जागतिक लक्झरी ब्रॅण्ड्सनादेखील त्यांच्या कौशल्याची भुरळ पडली. त्याचबरोबर सब्यसाची मुखर्जी यांच्यासारख्या नामांकित भारतीय डिझायनर्सनीसुद्धा ज्योतिष यांच्या कामाचे कौतुक केले आहे. वस्त्रसंस्कृतीचा वारसा जपण्याचा ध्यास घेतलेल्या ज्योतिष देबनाथ यांना ’नॅशनल हॅण्डलूम अ‍ॅवॉर्ड’, ‘संत कबीर अ‍ॅवॉर्ड’ अशा असंख्य पुरस्कारांनी गौरवण्यात आले आहे. Padma Gaurav in the field of art, literature and culture

भारतीय संगीताचे परदेशस्थ अभ्यासक : प्रा. डॉ. लार्स ख्रिश्चन कोच (पद्मश्री)

‘पद्म’ पुरस्कारांच्या यादीतील आणखी एक महत्त्वपूर्ण नाव म्हणजे डॉ. लार्स ख्रिश्चन कोच. जर्मनीस्थित डॉ. लार्स ख्रिश्चन कोच यांनी मागची अनेक दशके भारतीय शास्त्रीय संगीताचा अभ्यास केला. त्यांच्या या कार्यामुळे भारताबाहेर पाश्चिमात्य देशांमध्ये शास्त्रीय संगीताचा वेगळा आणि व्यापक विचार तर त्यांनी पोहोचवलाच, मात्र त्याचबरोबर भारतीय परिप्रेक्षातसुद्धा या शास्त्राचं नव्याने आकलन अनेकांना घडलं. कोच यांचा जन्म १९५९ साली जर्मनीतील लॉवर सॅसनीच्या पाईन या एका छोट्याशा शहरात झाला. बर्लिन येथील वस्तुसंग्रहालयात मानववंशशास्त्राच्या अनेक शाखांमध्ये त्यांनी काम केले. त्याचबरोबर ‘संगीत’ या विषयामध्येदेखील त्यांनी दांडगा अभ्यास केला. त्यांच्या १९९४चा ‘पीएचडी’च्या प्रबंधामध्ये त्यांनी समकालीन उत्तर भारतीय शास्त्रीय संगीताच्या रससिद्धांतावर प्रकाश टाकला आणि त्याची तुलना १६व्या व १७व्या शतकात युरोपमधील बरोक युगात मोठ्या प्रमाणावर वापरल्या जाणार्‍या ‘भावनांच्या सिद्धांता’शी केली. भरतमुनींनी लिहिलेल्या नाट्यशास्त्राची तुलना त्यांनी फ्रान्समधील व्हर्सायच्या दरबारातील फ्रेंच विद्वान समीक्षकांनी मांडलेल्या सिद्धांताशी केली. रवींद्रनाथ टागोर यांच्या संगीतातील आधुनिक विचारांचा अभ्यास त्यांनी केला. त्यांनी पाश्चिमात्य चौकटींमध्ये भारतीय ज्ञानसंचिताला मारून-मुटकून बसवण्याचा प्रयत्न केला नाही. उलटपक्षी, भारतीय शब्दसंग्रहावर आधारित एका संरचित सौंदर्यशास्त्रीय प्रणालीद्वारे अस्सल विश्लेषण केले. कोच सध्या जर्मनीतील ‘ड्रेस्डेन स्टेट आर्ट कलेक्शन्स’ (एसकेडी)चे संचालक आहेत आणि ज्ञानविश्वातील त्यांची मुशाफिरी अजूनही सुरू आहे. Padma Gaurav in the field of art, literature and culture

रंगभूमीला आकार देणारा जादूगार : नुरुद्दीन अहमद (पद्मश्री)

आसाममधील प्रख्यात कलाकार आणि कलादिग्दर्शक नुरुद्दीन अहमद यांना त्यांच्या कार्याच्या योगदानासाठी ‘पद्मश्री’ पुरस्कार जाहीर झाला आहे. गेल्या चार दशकांहून अधिक काळ ते आसामच्या नाट्यक्षेत्रात कार्यरत असून त्यांनी तिथल्या सांस्कृतिक वैभवात मोलाची भर घातली आहे. एखादी नाट्यकृती किंवा एखादा चित्रपट ज्यावेळी तयार होत असतो, त्यावेळेला त्या कलाकृतीच्या निर्मितीमागे कलादिग्दर्शकाचा वाटा महत्त्वाचा असतो. नुरुद्दीन अहमद यांच्या याच महत्त्वाच्या कार्यासाठी पुरस्कार प्रदान केला जाणार आहे. दि. १७ जानेवारी १९५८ रोजी आसाममधील नलबाडी जिल्ह्यातील साठिकुची गावात नुरुद्दीन अहमद यांचा जन्म झाला. जे. जे. कॉलेज ऑफ आर्ट्समध्ये शिक्षणाचे धडे घेतल्यानंतर कलेचं एक वेगळं विश्व त्यांच्या समोर खुलं झालं. कलेच्या विश्वात प्रवेश केल्यानंतर अनेक गुरूंच्या आशीर्वादाने त्यांना नवीन गोष्टी शिकता आल्या. यामध्ये फिरत्या रंगभूमीचे चमत्कार दाखवणारे आद्य शर्मा, चंद्र कमल गोगोई (ललित कला), शंखा चौधरी (शिल्पकला), फटिक बरुआ (चित्रपट कलादिग्दर्शन), भाबेंद्र नाथ सैकिया (चित्रपट निर्मिती) आणि छबिन राजखोवा (बाहुलीनाट्य) यांचा समावेश आहे. ते गेल्या चार दशकांपासून आसामच्या फिरत्या रंगभूमीशी संबंधित आहेत, या काळात त्यांनी हजारो प्रयोगांसह ३०० हून अधिक नाटकांचे नेपथ्यनिर्माण केले. त्यांच्या निर्मितीमध्ये टायटॅनिक, डायनासोर आणि त्सुनामी या फिरत्या रंगभूमीवरील नाटकांच्या भव्य सेटचा समावेश आहे. कलादिग्दर्शक म्हणून कामासाठी त्यांनी देशविदेशांत प्रवास केला आहे. त्यांनी आसामच्या लोककला आणि परंपरांना आधुनिक स्वरूपात मांडण्याचे काम केले. शंकरदेव यांच्या ‘अंकिया नाट’ परंपरेतील मुखवटाकलेला त्यांनी नव्या पिढीपर्यंत पोहोचवले. २०१७ मध्ये गुवाहाटी येथील विष्णुपूर दुर्गा पूजासमितीसाठी त्यांनी तब्बल ११० फूट उंच दुर्गेची मूर्ती बांबूपासून साकारली होती. ही जगातील बांबूपासून बनवलेली सर्वांत उंच मूर्ती म्हणून ओळखली गेली, ज्यामुळे त्यांचे नाव जागतिक स्तरावर चर्चेत आले. Padma Gaurav in the field of art, literature and culture

संगीत सम्राज्ञी : पोखिला लेथेपी (पद्मश्री)

आसामच्या पोखिला लेक्थेपी एकाचवेळेला लोककलाकार, गायिका, समाजसेविका म्हणून अनेकांना परिचित आहेत. आपल्या जीवनातील चार दशकांहून अधिक काळ कारबी लोकसंगीताच्या संवर्धनासाठी त्या झटल्या. त्याचसोबत कार्बी समुदायातील महिलांच्या उत्थानासाठी त्या कार्यरत आहेत. विशेषतः कौटुंबिक हिंसाचार आणि सामाजिक अन्यायाविरुद्ध त्यांनी महिलांना संघटित केले. १९६०च्या दशकांमध्ये पोखिला यांचे वडील गावोगावी होणार्‍या नाटकांमध्ये संगीत वाजवत असत. त्यामुळे पोखिला यांना लहानपणीच संगीताची आवड निर्माण झाली. पुढे अनेक संगीत स्पर्धांमध्ये त्यांनी प्रथम पारितोषिक पटकावले. कारबी संस्कृतीमधील ‘कारबी संगीत’ हा केवळ तिथल्या लोकांच्या मनोरंजनाचा भाग नसून तो त्यांच्या इतिहासाचा आणि अस्तित्वाचा एक अविभाज्य भाग आहे. कारबी संगीतामध्ये चेन्ग (पारंपारिक ढोल) मुरि, केंगडोंगडक, (बांबूपासून बनवलेले वाद्य) आदी वाद्यांचा सर्वाधिक वापर होतो. यामध्ये मौखिक परंपरेला महत्त्व आहे. प्रत्यक्ष सादरीकरणातून पुढच्या पिढीकडे संगीताचा हा वारसा सोपवला जातो. यामध्ये निसर्ग, प्रेम, पूर्वजांचे पराक्रम आणि जीवनातील तत्त्वज्ञान अशा वेगवेगळ्या अंगांना स्पर्श केले जाते. पोखिला लेथेपी यांच्या कार्याचे वैशिष्ट्य म्हणजे, त्यांनी कारबीमध्ये नवीन आधुनिक संगीताची निर्मिती केली. यामुळे आपसूकच दोन पिढ्यांमध्ये एक सेतू तयार करण्याचे काम त्यांनी केले. आतापर्यंत वेगवेगळ्या संगीतकारांबरोबर त्यांनी केले. तरुणांच्या गळ्यातील ताईत अशी ओळख असलेल्या झुबीन गर्ग यांच्यासोबतसुद्धा त्या गायल्या होत्या. कलेच्या माध्यमातून धुमसणार्‍या राज्यात शांतता प्रस्थापित करण्यासाठी त्या दिवस-रात्र झटत आहेत. त्यांना आजवर अनेक प्रादेशिक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. मात्र, २०२६चा ‘पद्मश्री’ पुरस्कार हा त्यांच्या अनेक दशकांच्या निस्वार्थ सेवेला मिळालेली सर्वांत मोठी राष्ट्रीय पोचपावती आहे. Padma Gaurav in the field of art, literature and culture

Tags: GuhagarGuhagar NewsLatest Marathi NewsLatest Newsliterature and cultureMarathi NewsNews in GuhagarPadma Gaurav in the field of artटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share33SendTweet21
Guhagar News

Guhagar News

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.