डॉ. अमृता माळवदे
Guhagar news : सौ. मेधा मुकुंद पाटणकर अर्थात् श्रीदेव गोपाळकृष्ण माध्यमिक विद्यामंदिर गुहागर येथील सर्व विद्यार्थ्यांमध्ये प्रिय असलेल्या पाटणकर मॅडम. संस्कृत हा त्यांचा व्यासंग. शालेय नियमित अभ्यासक्रम त्या तळमळीने शिकवित असत. संस्कृतमध्ये असणारे प्रेरणाप्रेरक धडे आणि त्यातील संस्कृतचा एक एक शब्द प्रकृती प्रत्ययासहित समजावून त्यांचा अर्थ समजावून सांगत. त्यामुळे संस्कृत हा तसं पहायला गेलं तर अवघड असणारा विषय, लीलया समजून त्यातील सुरसता अनुभवण्यात मजा येत असे. Inspirational Patankar Madam
मी धोपावे गावची रहिवासी. गावात सातवीपर्यंतच प्राथमिक शाळा त्यामुळे पुढील शिक्षणासाठी विद्यार्थी दाभोळ किंवा गुहागरकडे वळत. मीही त्याच नियमाने २००६ साली श्रीदेव गो.कृ.मा.वि. मध्ये प्रवेश घेतला. प्रवेश मिळाला ‘आठवी ड’ मध्ये. त्यावेळी वर्गशिक्षिका होत्या खरे (कोकणे) मॅडम. या तुकडीत तसे सुमार विद्यार्थी. पण मी आणि माझ्या आणखी दोन मैत्रीणींमधील क्षमता पाहून अनेक स्पर्धांमध्ये भाग घेण्यास प्रोत्साहन, वाचनास खरे मॅडमनी प्रोत्साहन दिले. आणि आम्हीही आमच्या परीने कसोशीने प्रयत्न करून त्यांच्या प्रोत्साहनाचा त्यांना लाभ मिळवून देत होतो. त्यामुळे पुढे नववीत आम्हा तिघींना ‘अ’ तुकडीमध्ये स्थलांतरीत करण्यात आले. या तुकडीचा लाभ म्हणजे या तुकडीला संस्कृत विषय पाटणकर मॅडम शिकवित. हा विषय फक्त गुण मिळवण्यासाठी न शिकता त्यात सांगितलेली मूल्ये आत्मसात करण्यासाठी शिकावा, आपल्यातील स्मरणशक्ती, उच्चारणशक्ती वृद्धिंगत व्हावी म्हणून शिकावा असं त्या आवर्जून सांगत. मला संस्कृत विषयाची गोडी लागली ती केवळ त्यांच्यामुळे आणि पुढे संस्कृत विषयातच भवितव्य घडवायचा विचारही त्याच कालावधीत रूढ होत गेला तोही मॅडममुळेच. मॅडमनी शिकवलेला ‘हरिद्रायाः स्वामित्वम्’ हा धडा मला अजूनही जसाच्या तसा आठवतो. त्याचा सारांश प्रख्यात शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर यांनी हळदी वरील पेटंट अमेरीका गिळंकृत करण्याच्या तयारीत असताना संस्कृतमधील मूळ संहिता वाचून त्यावर संशोधन करून हे पेटंट भारतालाच मिळाले पाहिजे हे ठासून सिद्ध करून ते भारताला मिळवून दिले. याचा देशाच्या दृष्टीने आर्थिक, व्यावहारिक, औत्पादनिक असणारा लाभ आणखी सविस्तर सांगण्याची गरज मला वाटत नाही. हे मॅडमनी इतक्या तन्मयतेने शिकवलं होतं की पुढे आपल्या संस्कृत शास्त्रांची ही उपयोगिता नक्की आपल्याकडून अभ्यासली जावी आणि देशास त्याचा लाभ व्हावा हा विचार मनात रूजला आणि त्याला खतपाणी घालायचे काम मॅडमनी तितक्याच प्रेमभावनेने केले. Inspirational Patankar Madam
याच्याच जोडीने मॅडमसोबतचा मला आणखी प्रसंग उद्धृत करावासा वाटतो तो म्हणजे सुभाषित पाठांतर स्पर्धेचा. रत्नागिरीतील फाटक हायस्कूल तर्फे या जिल्हास्तरीय स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. आधी तालुकास्तरावर स्पर्धा घेऊन त्यातील पात्र अशा केवळ एका विद्यार्थ्याला जिल्ह्याला पाठवायचे असे त्याचे स्वरूप होते. पण ही पाठांतर स्पर्धा म्हणजे फक्त पाठांतर स्पर्धा नव्हती. विद्यार्थ्याच्या स्मरणशक्ती बरोबर त्याचे उच्चारण, आरोह अवरोह, लयबद्धता, आत्मविश्वास इ. अनेक गोष्टी समाविष्ट होत्या. यात मी सहभाग घेण्याचे ठरवले. शालेय तासांव्यतिरिक्त पाटणकर मॅडमकडे वेळ असेल तेव्हा जाऊन एक एक सुभाषित अर्थासहित समजून घेऊन ते लयबद्ध म्हणायची तयारी सुरू झाली. कित्येक वेळेला मॅडम शाळा सुटल्यावरही माझ्यासाठी थांबत. मॅडमकडून एक एक गोष्ट बारकाईने शिकायची आणि गुहागरहून धोपावला जाता येता एस.टी मध्ये जो वेळ मिळे त्यात त्यावर मेहनत घ्यायची असा माझा दिनक्रम सुरू झाला. शेवटी तालुका स्तरीय स्पर्धांमध्ये शालाबाह्य संस्कृत जाणणाऱ्या परीक्षकांना बोलावले गेले. त्या परीक्षकांचे नावही मला आवर्जून उल्लेखावे वाटते ते म्हणजे शिक्षक चंद्रकांत झगडे. त्यांच्या संगनमताने माझी निवड करण्यात आली आणि पाटणकर मॅडम जिल्हा स्तरीय स्पर्धेसाठी मला घेऊन रत्नागिरीत दाखल झाल्या. मी माझं कर्तव्य चोख बजावलं होतं आणि त्याचा परिणाम म्हणजे मला जिल्हा स्तरावर देखील प्रथम पारितोषिक मिळालं. त्यांना त्या दिवशी झालेला आनंद, त्यांचा तो भावविभोर चेहरा माझ्या समोर आजही जसाच्या तसा उभा आहे. याचं सगळं श्रेय मॅडमकडे जातं. त्यांनी माझ्यावर घेतलेले परिश्रम, त्याचं मिळालेलं फळ हा केवळ त्यांचा विजय होता. Inspirational Patankar Madam
हळूहळू दहावी झाली. शालेय शिक्षण संपलं. महाविद्यालयात प्रवेश घ्यायची वेळ आली. माझं संस्कृतमध्येच पुढे जायचं हे स्वप्न दृढ होतं. पण घरातून बाहेर इतक्यात पडू नये अशी घरातल्यांची इच्छा आणि गुहागरमधील महाविद्यालयात संस्कृत नाही ही दुसरी समस्या आणि यावर उत्तर म्हणजे पाटणकर मॅडम. या दोन वर्षी तुझं नियमित संस्कृत नसलं तरी काही अडथळा येणार नाही यावर उपाय शोधू म्हणत मला त्यांनी तू इथेच प्रवेश घे असं सांगितलं. काही दिवसांत पुण्यातील टिळक महाराष्ट्र विद्यापीठात चौकशी करून तू तिथून ‘कोविद’ ही बाह्य मुलांसाठी असणारी वर्षाखेरीची परीक्षा देऊ शकतेस जेणेकरून तुझ्या या दोन वर्षात अंतर रहाणार नाही. अभ्यासही होईल आणि प्रमाणपत्रही मिळेल असं सूचवलं. इतकंच काय माझ्या तेथील प्रवेशाची सगळी जबाबदारीही त्यांनीच निभावली. या परीक्षा जून मध्ये असत. यांचा अभ्यास मॅडम माझ्याकडून एप्रिल मे या सुट्टीच्या कालावधीत त्यांच्या घरी करून घेत. त्यांना जिथे अडले त्यासाठी सुद्धा त्या थांबल्या नाहीत त्यांनी चिपळूण मधील प्रा. प्र. शं. तासे सरांबरोबर परिचय करून त्यांच्याकडून सहकार्य मिळवून दिले. बरं या बदल्यात त्यांनी माझ्याकडून कधीही एकही पै घेतली नाही. सगळं काही निःस्वार्थ बुद्धीने, तन्मयतेने, अपार प्रेमाने माझ्यासाठी केलं. हेच त्यांनी इतर विद्यार्थ्यांसाठी केलेलंही जवळून पाहिलं आणि अनुभवलं आहे. या परीक्षेच्या अभ्यासा निमित्ताने उन्हाळी सुट्टीत त्यांच्या घरी रोजच जाणं येणं होत असे. त्यांच्या घरातील प्रत्येक व्यक्तीबरोबर तेवढाच चांगला परिचय झाला आणि जवळजवळ मी त्यांच्याच कुटुंबाचा भाग बनले. या कालावधीत मला अभ्यासा व्यतिरिक्तही त्यांच्याकडून अनेक गोष्टी प्राप्त करून घेण्याचं भाग्य प्राप्त झालं. एक उत्तम मुलगी, आई, पत्नी, सून, सासू, आजी ह्या विविध भूमिका बजावताना त्यांचा सौहार्द भाव, वाणीतील मृदुता आणि कौटुंबिक प्रेमपूर्ण आत्मीयता हे नात्यातील अनेक पैलू अनुभवण्याचं आणि आत्मसात करण्यासाठीचं प्रोत्साहन नकळत मिळत गेलं. Inspirational Patankar Madam
पुढे बीए साठी गोगटे जोगळेकर महाविद्यालयात प्रवेश घेतला. संस्कृत आणि इंग्रजी हे दोन विषय घेऊन पदवीचं शिक्षण पूर्ण केलं. तिथेही पहिली येण्याची परंपरा कायम ठेवली. माझी शैक्षणिक स्थानं बदलत होती तरीही मॅडमबरोबरचा संवाद कमी झाला नव्हता. मॅडमना भेटल्याशिवाय कुठलीही सुट्टी जात नसे. आणि माझं कुठलंही यश मॅडम साजरं केल्याशिवाय रहात नसत. Inspirational Patankar Madam
रत्नागिरीनंतर पदव्युत्तर शिक्षणासाठी पुणे विद्यापीठातील संस्कृत विभागात जाण्याचा निर्णय घेतला. मॅडम खुशच होत्या. घरातून कधीही एकटी बाहेर न पडलेली मी एवढ्या मोठ्या शहरात सुरूवातीला खूप घाबरले आणि बावचळले होते. पण विद्यापीठातील सहकार्य भाव ओतप्रोत असलेल्या प्राध्यापकांमुळे आणि मैत्रवर्गामुळे लवकरच रूळले. आई पप्पांचे घरून पूर्ण समर्थन होतेच त्यामुळे त्यांच्या आपल्यासाठीच्या कष्टांचं चीज झालं पाहिजे ही भावना मनात दृढ होती. त्यामुळे जो अभ्यास करत असे तो मनापासून त्याचे फळ म्हणून मला MA ला विद्यापीठात प्रथम येण्याचं सौभाग्य प्राप्त झाले आणि मी चार सुवर्णपदकांची मानकरी ठरले. त्याचा मॅडमना कोण आनंद. पदवीदान दिवसाची सूचना प्राप्त झाल्यावर मी लगेच पाटणकर मॅडमना सांगितलं. तो सोहळा त्यांना प्रत्यक्ष अनुभवायचा होता, विद्यार्थीनीच्या पाठीवर कौतुकाची थाप मारायची होती त्यामुळे त्याच दिवशी आणि मागे पुढे जोडून घरात महत्त्वाचे कौटुंबिक कार्य असतानाही त्या रात्रीचा प्रवास करून माझ्या पदवीदान समारंभासाठी उपस्थित होत्या. या समारंभाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे वरती उल्लेख केल्याप्रमाणे ज्यांच्यामुळे माझ्यात संस्कृतमध्येच पुढे जावे हा विचार दृढ झाला ते प्रख्यात शास्त्रज्ञ माननीय डॉ. रघुनाथ माशेलकर सर याचे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते आणि त्यांच्या हस्ते सुवर्ण पदकं स्वीकारण्याचं सौभाग्य मला प्राप्त झालं. आणि ज्यांनी मला मदतीचा हात पुढे करून पुढे जाण्यास प्रेरणा दिली त्या माझ्या लाडक्या मॅडम त्यांच्या साक्षीने हे अनुभता आलं हे परमभाग्य. Inspirational Patankar Madam
चारवर्षांपूर्वी मी विवाहबंधनात अडकले. जीवनसाथीही संस्कृतज्ञ, गुरुकुलीय परंपरेत अध्ययन झालेला. हे ऐकूनही मॅडम खूप खुश झालेल्या. विवाहानंतर मी श्रीयुतांना घेऊन मॅडमच्या घरी गेले. पण यावेळी मॅडमचं प्रेम आम्ही दोघेही अनुभवत होतो. त्यांनी रितीरिवाजानुसार लेकीसहित जावयांचाही मानपान केला. मॅडमनी दिलेल्या कापडाचा शर्ट आम्ही आवर्जून शिवून घेतला. आजही तो सोनेरी शर्ट घाला म्हटल्यावर कुठला? पाटणकर मॅडमनी दिलेला? हाच प्रश्न श्रीयुतांकडून विचारला जातो. त्यांनी दिलेल्या छोट्या छोट्या गोष्टी, पुस्तकं यांच्यामुळे त्यांचं असं स्मरण तर होतच असतं. Inspirational Patankar Madam
दोन अडीच वर्षांपूर्वी मॅडमना जीवघेण्या कॅन्सरचं निदान झालं आणि हे ऐकल्यावर पायाखालची जमीनच सरकली. मी त्यावेळी दिल्लीत असल्याने त्यांना बघायला जाऊ शकले नाही. पण त्यांच्यावरील शस्त्रक्रियेआधी, शस्त्रक्रियेवेळी आणि त्यानंतरही फोनवरून तब्बेतीविषयी चौकशी होत होती. गेल्या दिवाळीत मी घरी आले असताना मॅडमना भेटायला मी आणि माझे श्रीयुत दोघेही गेलो होतो. दिवाळीमुळे मॅडमबरोबर त्यांच्या सगळ्या कुटुंबालाच भेटाण्याचा योग आला. जवळजवळ एक दिड तास मनसोक्त गप्पा झाल्या. मॅडमची प्रकृती चांगली आहे हे बघून खूप समाधान झालं आणि त्यांचा आशीर्वाद घेऊन आम्ही दोघे बाहेर पडलो. एकूण परिस्थिती बघता मॅडमचा हा शेवटचा आशीर्वाद असेल असा विचारही मनाला शिवला नव्हता. Inspirational Patankar Madam
२० जानेवारीला सकाळी सकाळी राजन दळींचा फोनवरील मॅडमच्या निधनाचा मेसेज वाचला आणि काही सुचेनासं झालं. डोळ्यासमोरून त्यांच्या बरोबरचा भूतकाळ सरसर धावत होता. डोक्यात त्यांचेच विचार. आणि यापुढे पाटणकर मॅडमचा तो कोमल स्वर, मृदु भाषा, व्यवहार पटुता कधीही अनुभता येणार नाही, त्यांचा चरणस्पर्श करून आशीर्वाद घेता येणार नाहीत याची असह्य पोकळी सतावू लागली होती. आजकालच्या कलियुगातील सत्ययुग म्हणजे मॅडम! जे कायमचं निद्रिस्त झालं होतं. मॅडमना माझ्या पी.एच्.डी च्या पदवीदान सोहोळ्याला उपस्थित रहायची इच्छा होती. येत्या काळात पदवी मिळेल, समारंभ ही होईल पण मॅडम नसतील ही कमी कुठेतरी मन खट्टू करून जाणारी आहे. Inspirational Patankar Madam
छात्रहितैककाङ्क्षिण्यै मातृवात्सल्यमूर्तये ।
नमः संस्कृतप्रियायै सदानन्दितचित्तायै।।
मन्मार्गदर्शिकां नित्यं मम कार्तज्ञज्ञापने।
मेधां मुकुन्दसहितां प्रणमामि मुहुर्मुहुः।।
अर्थात सदैव प्रसन्न चित्त असणाऱ्या, संस्कृत व्यासंगी, विद्यार्थ्यांच्या हिताची एकनिष्ठ कामना करणाऱ्या, मातृवत्सल अशा मूर्तीस नमस्कार असो. माझ्या मार्गदर्शिका मुकुंदसहित असणाऱ्या मेधा पाटणकर मॅडमना माझा कृतज्ञभाव प्रकट करण्यासाठी मी वारंवार प्रणाम करते आहे. Inspirational Patankar Madam
