रत्नागिरी, ता. 27 : ‘वाढता इलेक्ट्रॉनिक कचरा, तसेच प्लास्टिक कचरा हा कोणत्याही एका ठिकाणचा नव्हे, तर आंतरराष्ट्रीय पातळीवरचा प्रश्न आहे. त्यामुळे त्या प्रश्नाची तीव्रता कमी करण्यासाठी अनेक संस्थांनी काम करणे आवश्यक आहे. पुण्यातील पूर्णम इकोव्हिजन फाउंडेशन आणि रत्नागिरीतील अनबॉक्स या संस्थांनी यामध्ये घेतलेला पुढाकार अत्यंत कौतुकास्पद आहे. ई-कचरा संकलनाबरोबरच या समस्येबद्दलची जागरूकता शाळा-महाविद्यालयांमध्ये करणे खूप गरजेचे आहे,’ असे प्रतिपादन जिल्हा विज्ञान शिक्षक संघटनेचे माजी अध्यक्ष रवींद्र इमानदार यांनी केले. Collection of E-Waste on Republic Day
पूर्णम आणि अनबॉक्स या संस्थांच्या संयुक्त विद्यमाने रत्नागिरीत प्रजासत्ताकदिनी ई-यंत्रण हा ई-कचरा संकलन उपक्रम १४ केंद्रांवर आयोजित करण्यात आला होता. या उपक्रमाचे प्रातिनिधिक स्वरूपात उद्घाटन खेडशीतील अनुश्रुती एंटरप्रायझेसच्या संकलन केंद्रावर करण्यात आले. त्या वेळी ते बोलत होते. सकाळी नऊ ते एक या वेळेत रत्नागिरीतील सर्व केंद्रांवर मिळून सुमारे ५०० किलो ई-कचऱ्याचे संकलन झाले. रत्नागिरीत यंदा या उपक्रमाचे दुसरे वर्ष होते. Collection of E-Waste on Republic Day

उद्घाटन खेडशीचे सरपंच वसंत बंडबे, ‘अनबॉक्स युवर डिझायर’चे गौरांग आगाशे, ‘पूर्णम इकोव्हिजन’च्या प्रतिनिधी रोहिणी सोनावणे, श्रीनगर सर्वांगीण विकास मंडळाचे अध्यक्ष अनूप नलावडे आणि मंडळाचे अन्य पदाधिकारी, ‘अनबॉक्स’च्या नेहा गोखले आणि अनुश्रुती एंटरप्रायझेसचे कोनकर कुटुंबीय उपस्थित होते. Collection of E-Waste on Republic Day
उद्घाटन कार्यक्रमात रोहिणी सोनावणे यांनी पूर्णम इकोव्हिजन फाउंडेशनतर्फे ई-कचऱ्यासंदर्भात केल्या जाणाऱ्या कार्याची माहिती दिली. ‘ज्या ई-कचऱ्यातील कम्प्युटर किंवा अन्य इलेक्ट्रॉनिक साहित्य दुरुस्त करून पुन्हा वापरण्यासारखे असते, त्याची दुरुस्ती करून ते गरजू शाळांना दिले जाते. पूर्णम संस्थेने आतापर्यंत एक हजारांहून अधिक कम्प्युटर्स अशा प्रकारे दुरुस्त करून शाळांना दिले आहेत. जो ई-कचरा अशा प्रकारे वापरता येण्यासारखा नसतो, तो ई-कचरा प्रदूषण मंडळाची मान्यता असलेल्या रिसायकलिंग कंपन्यांकडे दिला जातो, जेणेकरून त्याचा पर्यावरणावर कोणताही घातक परिणाम होत नाही. प्लास्टिकपासून बेंचेस किंवा बॅरिकेड्स अशा उपयुक्त वस्तू तयार करून त्याही दान केल्या जातात,’ असे त्यांनी सांगितले. ई-यंत्रण उपक्रम आज एकाच दिवशी महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक या तीन राज्यांतील १०३० केंद्रांवर पार पडल्याची माहितीही त्यांनी दिली. Collection of E-Waste on Republic Day

खेडशीचे सरपंच वसंत बंडबे यांनी या उपक्रमाला आपल्या शुभेच्छा दिल्या. तसेच, जास्तीत जास्त ग्रामस्थांपर्यंत या विषयाबद्दलची माहिती पोहोचावी आणि जागरूकता व्हावी, यासाठी प्रयत्नशील राहण्याची आणि सर्वतोपरी सहकार्य करण्याची ग्वाही त्यांनी दिली. Collection of E-Waste on Republic Day
गौरांग आगाशे यांनी ‘अनबॉक्स’तर्फे दर महिन्याला केल्या जात असलेल्या प्लास्टिक-ई कचरा संकलनाबद्दल माहिती दिली. तसेच, रत्नागिरीकरांकडून या उपक्रमाला मिळत असलेल्या सहकार्याबद्दल समाधान व्यक्त केले. या विषयाच्या जागरूकतेसाठी सहकार्य करण्याचे आश्वासन देतानाच कायमस्वरूपी संकलन केंद्र निश्चित करण्याबद्दलही त्यांनी सकारात्मकता दर्शवली. दरम्यान, नऊ ते एक या वेळेत रत्नागिरी शहरातील १४ केंद्रांवर मिळून सुमारे ५०० किलो ई-कचऱ्याचे संकलन झाले, अशी माहिती त्यांनी या उपक्रमाच्या सांगतेवेळी दिली. रत्नागिरीकरांनी या उपक्रमात सक्रिय सहभाग घेऊन पर्यावरणरक्षणाला चांगला हातभार लावल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. तसेच, सहभागी झालेले सर्व नागरिक आणि स्वयंसेवकांचे त्यांनी आभार मानले. रत्नाकर जोशी, चिन्मय भागवत, गुरुप्रसाद जोशी, महेंद्र दांडेकर, नेहा गोखले, शरदचंद्र वझे, भाग्यश्री सुर्वे, सुबोध वाघरे, पार्थ जोशी, शुभानन आंबर्डेकर, स्पृहा जोगळेकर, अंकिता मोरे, कपिल शेवडे यांनी स्वयंसेवक म्हणून या मोहिमेत काम पाहिले. Collection of E-Waste on Republic Day

अनबॉक्स युवर डिझायर, आगाशे फूडकोर्ट, अनुश्रुती एंटरप्रायझेस, सावंत रोडलाइन्स (साळवी स्टॉप), श्री धन्वंतरी आयुर्वेद (मारुती मंदिर), श्री धन्वंतरी एंटरप्रायझेस (शांतीनगर), मानस किराणा स्टोअर (माळनाका), डिक्सन सप्लायर्स (जिल्हा परिषद कार्यालयाजवळ), आर्यक सोल्युशन्स (रमेशनगर), हॉटेल सी फॅन्स (मांडवी), सुरस स्नॅक्स (कारवांचीवाडी), खादाडी कट्टा (जोशी पाळंद) या केंद्रांवर ई-कचरा संकलित करण्यात आला. Collection of E-Waste on Republic Day
