गुहागर, ता. 09 : तालुक्यातील मोडकागर ते तवसाळ हा महत्त्वाचा रस्ता सध्या पूर्णपणे खड्डेमय झाला असून नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडल्याने वाहनचालकांचे अपघात होत असून पावसाळ्यात परिस्थिती आणखीनच गंभीर होत आहे. या रस्त्यावरून दररोज विद्यार्थी, कामगार, शेतकरी तसेच रुग्णवाहिका ये-जा करतात. मात्र रस्त्याच्या दुरवस्थेमुळे प्रवास जीवघेणा ठरत आहे. दुचाकीस्वार घसरून पडण्याचे प्रकार वाढले असून वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. Modkagar-Tavsal road is potholed

नागरिकांनी अनेक वेळा संबंधित विभागाकडे तक्रारी करूनही कोणतीही ठोस दखल घेतली जात नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. “हा रस्ता म्हणजे अपघातांना निमंत्रण आहे. प्रशासन एखादी मोठी दुर्घटना घडल्यावरच जागे होणार का?” असा संतप्त सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. जर तातडीने रस्त्याची डागडुजी किंवा डांबरीकरण करण्यात आले नाही, तर येत्या काळात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा वेळणेश्वर येथील ग्रामस्थ महेश ठाकूर दिला आहे. याची सर्वस्वी जबाबदारी संबंधित सार्वजनिक बांधकाम विभागावर राहील, असेही महेश ठाकूर यांनी सांगितले आहे. Modkagar-Tavsal road is potholed
