वेळणेश्वर अभियांत्रिकी महाविद्यालयात आयोजन
गुहागर, ता. 08 : विद्या प्रसारक मंडळाच्या महर्षी परशुराम अभियांत्रिकी महाविद्यालय, वेळणेश्वर येथे वन व वन्यजीव संवर्धन जनजागृती कार्यशाळा यशस्वीरीत्या आयोजित करण्यात आली. सदर कार्यक्रम आज दि. ८ जानेवारी २०२६ रोजी सकाळी १०.१५ ते ११.१५ या वेळेत कॉम्प्युटर सेंटर (श्रीपती इमारत) येथे संपन्न झाला. महाविद्यालयाच्या ग्रीन क्लब, सिव्हिल अभियांत्रिकी विभाग व इलेक्ट्रिकल अभियांत्रिकी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने सदर कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. Wildlife Conservation Awareness Workshop
या कार्यशाळेसाठी डॉ. राहुल भागवत (संस्थापक – Wildlife Educare) हे तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते. त्यांनी वनसंवर्धनाचे महत्त्व, वन्यजीव संरक्षणासाठी समाजाची भूमिका, जैवविविधतेचे रक्षण व पर्यावरण संतुलन या विषयांवर सखोल मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी व प्राध्यापकांनी मोठ्या उत्साहाने कार्यशाळेत सहभाग घेतला. Wildlife Conservation Awareness Workshop

डॉ. राहुल भागवत मार्गदर्शन करताना सांगितले की, सह्याद्रीचा पर्यावरणीय समतोल बिघडला तर त्याचा परिणाम संपूर्ण देशाच्या हवामान बदलावर होताना दिसून येतो. कोकण प्रदेश जैवविविधतेने अत्यंत समृद्ध असून या नैसर्गिक संपदेचे संरक्षण करणे ही काळाची गरज आहे. प्रत्येक नागरिकाने किमान तीन झाडे लावून पर्यावरण संवर्धनात योगदान देणे आवश्यक आहे. Peregrine Falcon या पक्ष्याच्या सांगाड्यावर आधारित अभ्यासातून विमानाच्या वेगासंदर्भातील संशोधन करण्यात आले आहे, हे उदाहरण निसर्ग आणि आधुनिक विज्ञानातील नातेसंबंध स्पष्ट करते. पक्षी निरीक्षण व अभ्यासासाठी शासनाकडून शिष्यवृत्ती उपलब्ध असून, दुर्दैवाने या क्षेत्रात शिक्षण घेणारे बहुतांश विद्यार्थी कोकणाबाहेरील आहेत. यावरून कोकणातील जैवविविधता किती समृद्ध आहे, हे अधोरेखित होते. सर्पांविषयी माहिती देताना त्यांनी सांगितले की त्रिकोणी आकाराचा साप विषारी असतो, तर लांबट व गोलाकार शरीर असलेला साप बहुधा बिनविषारी असतो. तसेच सर्पदंशावरील विषनिरोधक औषधे (Anti-venom) शासकीय रुग्णालयांमध्ये उपलब्ध असल्याने अफवा न पसरवता त्वरित वैद्यकीय उपचार घेणे अत्यंत आवश्यक आहे. Wildlife Conservation Awareness Workshop
कार्यक्रमाचे समन्वयक प्रा. रिया गवस, संयोजक प्रा. अनिकेत जाधव, सिव्हिल विभागप्रमुख प्रा. नंदकिशोर चौगुले, इलेक्ट्रिकल विभागप्रमुख प्रा. सतिश घोरपडे तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अविनाश पवार यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाची यशस्वी अंमलबजावणी झाली. Wildlife Conservation Awareness Workshop
