गुहागर, ता. 29 : कोकणचं नव्हे तर राज्याचे पर्यटन केंद्रबिंदू म्हणून पुढे येत असलेल्या गुहागरात थर्टीफर्स्ट पूर्वीच पर्यटकांनी तुफान गर्दी केलेली दिसत आहे. गुहागर चौपाटीसह तालुक्यातील सर्वच प्रेक्षणीय स्थळे, हॉटेल, लॉज, घरगुती राहण्याची, जेवणाची ठिकाणे पर्यटकांनी गर्दी केलेली आहे. तसेच पुढील 8 दिवस गुहागर पर्यटकांनी फुल्ल राहणार असल्याचे येथील हॉटेल व्यावसायिकांनी सांगितले. Huge crowd of tourists on Guhagar beach
महाराष्ट्रातील सर्वात मोठा समुद्र किनारा हा गुहागर तालुक्यात आहे. वाशिष्ठी नदी आणि जयगडच्या खाडीजवळ गुहागर आहे. अथांग सुंदर निसर्गरम्य किनारा आणि पांढरीशुभ्र पुळण हे गुहागरचे प्रमुख आकर्षण आहे. गुहागर शहराला लाभलेल्या समुद्रकिनारा तब्बल सात किलोमीटर लांब आहे. चेन्नई येथील मरीना बीच 12 किलोमीटर लांब आहे. गुहागर समुद्रकिनारा सात किलोमीटर लांबीचा आहे. गुहागर, पालशेत, अडूर – बुधल, बोऱ्याबंदर, हेदवी, वेळणेश्वर, रोहिले, तवसाळ हे गुहागरमधील समुद्र किनारे आहेत. यापैकी बहुतांश समुद्र किनारे हे पर्यटकांपासून अलिप्त आहेत. यामुळे पर्यटकांची फारशी गर्दी नसते. इथल्या शांत, निवांत समुद्र किनाऱ्यावर फिरताना लाटांचा आवाज कानात घुमतो. इथलं निसर्ग सौंदर्य पाहून मन हरखून जाते. समुद्र किनाऱ्यांसह गुहागरमध्ये नैसर्गिक चमत्कार देखील पहायला मिळतात. हेदवी समुद्र किनाऱ्यावर वर्षानुवर्षे समुद्राच्या लाटांचा मारा होऊन येथील खडकावर एक मोठी अरुंद भेग (घळ) निर्माण झाली आहे. भरतीच्यावेळी समुद्राचे पाणी या घळईत जोराने घुसते. यानंतर या घळीतून एखाद्या कारंज्याप्रमाणे पाणी वेगाने वर उसळते. ही घळ ‘बामणघळ’ म्हणून प्रसिद्ध आहे. Huge crowd of tourists on Guhagar beach

गुहागर तालुक्यात अनेक धार्मिक पर्यटनस्थळ देखील आहेत. भगवान शंकरांचे वास्तव्यस्थान ‘गुह्यवन’ म्हणून गुहागर ओळखले जाते. दगडी बांधणीचे व्याडेश्वर हे शिवमंदिर गुहागरचे ग्रामदैवत आहे. दशभूज गणेशाचे मंदिर, वरचापाट येथील श्री दुर्गादेवी मंदिर, वेळणेश्वरचे श्री देव वेळणेश्वर मंदिर देखील तितकेच लोकप्रिय आहे. तालुक्यात पर्यटन हंगामात दिवसाला सुमारे 1600 ते 1800 पर्यटक येत असतात. यामध्ये सर्वाधिक कौटुंबिक पर्यटकांची संख्या जास्त असते. दरवर्षी पर्यटकांच्या या वाढलेल्या संख्येमुळे गुहागरातील पर्यटनाला गेल्या काही वर्षात सुगीचे दिवस आले आहेत. Huge crowd of tourists on Guhagar beach
तालुक्यात सुमारे ७० हॉटेल, ४० एमटीडीसी निवासस्थाने व ८० घरगुती निवास आणि राहण्याची व्यवस्था आहे. गेल्या काहीवर्षात असगोली किनारी द वूड, हॅपी केबिन, मोडका आगर येथे शांताई रिसॉर्ट, गुहागर कीर्तनवाडी येथे मँगो व्हीलेज, पालशेत किनारी गाज, गुहागर शहरातील नक्षत्र, श्रीपूजा, चैतन्य निवास अशी चांगली राहण्याची ठिकाणे आहेत. किनारी खाद्य पदार्थाचे स्टॉल, उंट सफर, घोडा सफर, पाण्यामध्ये जेटस्की, बनाना राईट्स व अन्य सफारीचा आनंद लुटता येतं आहे. Huge crowd of tourists on Guhagar beach
