बोगस पदवी वाटप, प्रशासकाची नेमणूक
गुहागर, ता. 15 : गुहागर येथील खरे-ढेरे-भोसले महाविद्यालयावर प्रशासकाची नियुक्ती करण्यात आली आहे. बोगस प्रवेश आणि बोगस परीक्षा घेऊन विद्यार्थ्यांना पदवीच्या थेट तिसऱ्या वर्षास बसवून मुंबई विद्यापीठाच्या पदव्या मिळवून देण्याचा प्रकार गेल्यावर्षी उघडकीस आल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे. Khare-Dhere-Bhosale College fine
गुहागर येथील खरे-ढेरे-भोसले महाविद्यालयातील गैरप्रकारांना सहकार्य करण्यास नकार देणाऱ्या ४ प्राध्यापकांना गुहागर एजुकेशन सोसायटीच्या संचालक मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी काहींना सोबत घेऊन मारहाण केल्याचा प्रकार गेल्यावर्षी घडला होता. याचे तीव्र पडसाद महाराष्ट्र राज्याच्या विधानसभेमध्ये उमटले होते. गुहागरचे आ. भास्कर जाधव यांनी औचित्याच्या मुद्दयाद्वारे ही घटना अधिवेशनामध्ये मांडली होती. सध्या सुरु असलेल्याअधिवेशनातही पुन्हा आ. जाधव यांनी प्राध्यापकांना मारहाण करणाऱ्या आणि कोकणातील शिक्षणात गैरप्रकार घडवून आणून शिक्षण क्षेत्राला काळिमा फासणाऱ्या या घटनेतील जबाबदार महाविद्यालयावर काय कार्यवाही केली? असा जाब विचारला. यावेळी उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी या प्रकरणी संबंधित महाविद्यालय दोषी आढळले असून महाविद्यालयावर प्रशासकाची नियुक्ती करण्यात आलेली असल्याचे सांगितले. Khare-Dhere-Bhosale College fine

अधिक माहितीनुसार, या महाविद्यालयावर मुंबई विद्यापीठाने सत्यशोधन समिती गठित केली होती. या समितीने ३ वेळा महाविद्यालयाला भेट देऊन संबंधित प्रकरणाची सखोल चौकशी करून आपला अंतिम अहवाल विद्यापीठास दिला होता. या संदर्भाने मुंबई विद्यापीठाने या महाविद्यालयाला दोषी मानून रुपये १० लाख एवढा दंड लावलेला असून प्रशासक नेमण्याची शिफारस सरकारकडे केली होती. सबब महाराष्ट्र शासनाने संबंधित महाविद्यालयावर प्रशासकाची नियुक्ती केली. प्रशासक म्हणून डॉ. किरणकुमार बोंदर, सह-संचालक, उच्च शिक्षण विभाग, पनवेल यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. बुकटू संघटनेने मुंबई विद्यापीठाच्या सिनेट मध्ये हा प्रश्न वारंवार लावून धरून विद्यापीठाला कठोर कारवाई करण्यास भाग पाडले. Khare-Dhere-Bhosale College fine
