गुहागर, ता. 06 : दत्त सांस्कृतिक मंडळ लाडघर तालुका दापोली तर्फे दरवर्षी होणाऱ्या समुद्राच्या वाळूमधील सायकल आणि धावण्याच्या शर्यती रविवार, ७ डिसेंबर २०२५ रोजी सायंकाळी ४ वाजता लाडघर समुद्रकिनारा येथे घेण्यात येणारआहेत. हे स्पर्धेचे ५९ वे वर्ष आहे. त्यानंतर संध्याकाळी ५ वाजता बैलगाडी स्पर्धा होतील. Ladghar beach cycling competition
लाडघर दत्त मंदिर येथे साजऱ्या होणाऱ्या दत्तजयंती निमित्त अनेक कार्यक्रम आयोजित केले जातात. दत्त सांस्कृतिक मंडळ लाडघर याचे अध्यक्ष दिपक बोरकर, उपाध्यक्ष निलेश मोरे आणि सचिव राजन संनकुळकर यांनी याबद्दल अधिक माहिती देताना सांगितले की, १९६५ पासून या मंडळातर्फे सायकल आणि धावण्याच्या शर्यती आयोजित केल्या जात आहेत. यातील सायकल शर्यतीचे अंतर २ किमी आहे, परंतु लाडघर समुद्र किनाऱ्यावर वाळूमध्ये वाऱ्याच्या विरुद्ध दिशेने सायकल चालवणे किंवा धावणे हे आव्हानात्मक असते. सुक्या वाळूमध्ये सायकल रुतते किंवा जास्त वेगाने पळत नाही. त्यामुळे अटीतटीची होणारी ही स्पर्धा पाहण्यासाठी आणि त्यामध्ये भाग घेण्यासाठी भरपूर गर्दी जमते. Ladghar beach cycling competition

सायकल आणि धावण्याच्या स्पर्धा खुल्या गटात होतील. गिअर, नॉन गिअर अशी कोणतीही सायकल वापरु शकता. यासाठी कोणतीही नोंदणी फी नसून आगाऊ नाव नोंदणी करण्याची आवश्यकता नाही. प्रत्येक गटातील पहिल्या तीन विजेत्यांना बक्षीस म्हणून रोख रक्कम आणि चषक देऊन गौरवण्यात येईल. अधिक माहितीसाठी संपर्क अभिनय कर्देकर ७७६७०७५३५२, वृषाल सुर्वे ७३५०४८९२८७ हे आहेत. सर्वांनी आपल्या दैनंदिन जीवनात सायकलचा अधिक वापर करुया, मैदानी खेळ खेळूया, पर्यावरण जपुया आणि आपले आरोग्य तंदुरुस्त बनवूया, असे आवाहन दत्त सांस्कृतिक मंडळाने केले आहे. Ladghar beach cycling competition
