गुहागर न्यूज : महायुतीतील घटकपक्षांची नाराजी ओढवू नये, राज्य सरकार अस्थिर होऊ नये, यासाठी रत्नागिरी जिल्ह्यातील भाजपचे कार्यकर्ते आणि मतदारांचा बळी देण्याचा निर्णय प्रदेश भाजपने घेतला आहे. असे कोणी म्हणत नसले तरी नगरपालीका आणि नगरपंचायतीमधील महायुतीच्या जागा वाटपातून तेच समोर येत आहे. आगामी जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकांमध्येही हेच चित्र कोकणात दिसून येणार आहे. मात्र त्याची पर्वा भाजपच्या शिर्षस्थ नेत्यांना नाही. BJP workers and voters
नगरपालीका व नगरपंचायतीच्या निवडणुकांची घोषणा झाल्यावर भाजपने महायुतीबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवर घेतला जाईल असे जाहीर केले. त्यामुळे भाजपच्या गोटात आनंदाचे वातावरण होते. रत्नागिरी जिल्ह्यातील खेड, गुहागर, चिपळूण आणि देवरुख या चार ठिकाणी भाजपचा नगराध्यक्ष दिमाखात बसेल, अशी स्वप्न भाजप कार्यकर्त्यांना पडू लागली. त्यात चुक काहीच नव्हते. चिपळूणमध्ये भाजपच्या सौ. खेराडे थेट जनतेतून नगराध्यक्ष म्हणून निवडून आल्या होत्या. खेडमधील माजी नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांनी कार्यकर्त्यांसह भाजपत प्रवेश केल्याने तेथील भाजप कार्यकर्ते उत्साहात होते. देवरुखमध्ये भाजपचा नगराध्यक्ष होता. गुहागर शहरात भाजपचा नगराध्यक्ष नसला तरी त्यावेळी आमदार भास्कर जाधव यांच्या राष्ट्रवादीला सत्तेतून दूर ठेवण्यासाठी स्थापन केलेल्या शहर विकास आघाडीतही भाजप कार्यकर्त्यांचा सहभाग होता. आत्ता समीकरणे बदलली असली तरी त्या 5 वर्षात गुहागरमध्ये सत्तेला गवसणी घालण्यासाठी भाजपला मजबुत केले होते. त्यामुळे स्थानिक निवडणुकांमध्ये महायुती झाली तर उत्तम अन्यथा स्वतंत्र लढून आपले अस्तित्व दाखवून देऊ, अशा मानसिकतेमध्ये भाजपचे कार्यकर्ते, पदाधिकारी होते. भाजपच्या मतदारांचीही हीच अपेक्षा होती. खासदार नारायण राणेंचा अपवाद वगळता राज्यात आणि केंद्रात सत्ता असली तरी जिल्ह्यात भाजपचा आमदार नाही. याची खंत भाजपच्या मतदारांमध्येही आहे. नगरपालीका, नगरपंचायत निवडणुकीत सोबत आले तर महायुतीसह अन्यथा स्वबळावर भाजपने लढावे असे भाजपच्या मतदाराला मनोमन वाटते होते. त्यातच बिहारच्या निवडणुकीतील विजयाने येथील भाजप कार्यकर्ते, पदाधिकारी आणि मतदारांचे मनोबल वाढले होते. BJP workers and voters

परंतू या सर्व स्वप्नांना भाजपच्या शीर्षस्थ नेत्यांनी तिलांजली देत महायुतीतील घटक पक्षांसोबत जुळवून घेण्याचा आदेशच दिला. महायुतीतील आमदारांचा निर्णय मानला पाहीजे असा इशारा दिला. प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी रत्नागिरी जिल्ह्यातील भाजप पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत पालकमंत्री उदय सामंत आणि गृहराज्यमंत्री योगेश कदम यांना बोलावून भाजप पदाधिकाऱ्यांची तोंडेच बंद केली. आमदार निरंजन डावखरे यांनी तर थेट अन्याय सहन करा, असे आवाहनच केले. प्रदेश भाजपने रत्नागिरी जिल्हा शिवसेनेला आंदण देवून टाकला. त्यामुळे विजयासमीप जाणाऱ्या भाजपच्या पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मतदारांचे निवडणुकीपूर्वीच नियोजनपूर्वक मानसिक खच्चीकरण करण्यात आले आहे. उद्या निकाल लागल्यानंतर पराभवाची कारणे शोधण्यासाठी चिंतन बैठका होतील. त्यावेळी भाजपचे हेच शिर्षस्थ नेते महायुतीचा निर्णयच कसा योग्य होता याचे बाळकडू द्यायलाही कमी करणार नाहीत. BJP workers and voters
भाजपचे रत्नागिरी जिल्ह्यातील कार्यकर्ते पदाधिकारी यांचे तोंड दाबून बुक्क्यांचा मार खात आहेत. यामागे कारण आहे ते राज्यातील सत्ता. भाजप, राष्ट्रवादी (अ.प.) आणि शिवसेना याच्या सरकारमध्ये सारे काही आलबेल नाही. राष्ट्रवादी आणि शिवसेनेत टोकाचा संघर्ष आहे. त्याचे प्रतिबिंब रायगड जिल्ह्यातील निवडणुकांमध्ये उमटताना दिसत आहे. भाजप आणि राष्ट्रवादीमध्येही पश्चिम महाराष्ट्रात संघर्ष आहे. केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यावर झालेले आरोप हे नियोजित पध्दतीने करण्यात आले. त्याला उत्तर म्हणून थेट पार्थ पवार यांचा जमीन घोटाळा उघडकीस आणला गेला. भाजपचे दोन्ही मित्र पक्ष देवेंद्र फडणवीस यांचे मुख्यमंत्री पद अस्थिर ठेवण्यासाठी झगडत आहेत. अशावेळी दोघांना अंगावर घेण्यापेक्षा स्थानिक निवडणुकांमध्ये त्यांच्या मनाप्रमाणे वागून मुख्यमंत्री पदासह सत्तेची खूर्ची स्थिर करण्याचा प्रयत्न प्रदेश भाजपकडून होत आहे. म्हणूनच रत्नागिरी जिल्ह्यात गृह राज्य मंत्री योगेश कदम आणि पालकमंत्री उदय सामंत यांना खूष ठेवण्याचे धोरण प्रदेश भाजप आखत आहे. आपल्या कार्यकर्त्यांचा आणि मतदारांचा बळी त्याचसाठी चढविला जात आहे. BJP workers and voters
या सर्व परिस्थितीमुळे भाजप त्यांचा हक्काचा मतदार मात्र गमावतो आहे. याचे भान राहीलेले नाही. हा मतदार आज केवळ केंद्रातील मोदी सरकारची कामगिरी आणि राष्ट्रीय समस्या व सुरक्षेसंदर्भात घेतले जाणारे ठोस निर्णय यामुळे भाजपसोबत आहे. राज्यातील राजकारणात भाजपकडूनच भाजपचा घेतला जाणारा बळी या मतदारांना नामंजूर आहे. त्यामुळे रत्नागिरी जिल्हयातील भाजपची दुरावस्था या मतदाराला सहन होत नाही. भाजपचा मतदार आणि कार्यकर्त्यांमधील हा असंतोष जेव्हा बाहेर पडेल तेव्हा भाजपच्या हातातून वेळ निघून गेलेली असेल. BJP workers and voters
