रत्नागिरी, ता. 08 : गोल्ड ट्रेडिंग करुन कमी वेळात जास्त नफ्याचे अमिष दाखवून ११ लाख ६० हजार रुपयांची फसवणूक करणाऱ्या महिलेविरुद्ध सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना ४ जुलै ते २१ ऑगस्ट २०२५ या कालावधीत घडली आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार फिर्यादी यांची संशयित मारिया नावाच्या महिलेबरोबर सोशल मिडियाच्या फेसबुकवर ओळख झाल्यानंतर तिने ट्रेडींग संदर्भातील सल्लागार असल्याचे भासवून गोल्ड ट्रेडिंग करुन कमी वेळात जास्त नफ्याचे अमिष दाखवले. त्यानंतर मारिया हिने व्हॉटसऍपद्वारे लिंक पाठवून ते फिर्यादी यांच्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल करण्यास सांगितले. Fraud with the lure of higher profits

तसेच फिर्यादी यांची दिशाभुल करुन पैसे गुंतवण्यास भाग पाडले. त्यानंतर गुंतवणूक केलेल्या रक्कमेची फिर्यादी यांनी विचारणा केली असता कंपनीच्या नियमाप्रमाणे ६ लाख १३ हजार ६४७ रुपये इतकी रक्कम भरावी लागेल. तसेच मनी लॉड्रींग झाल्यामुळे तुमचे अकॉऊंट सस्पेक्टेड झाले असल्याचे सांगितले. त्यामुळे सर्व रक्कम भरावी लागेल अशी उत्तरे देवून फिर्यादी यांना गुंतवणूक केलेल्या रक्कमेवर कोणताही लाभांश न देता त्यांची ११ लाख ६० हजार रुपयांची फसवणूक केली. या प्रकरणी फिर्यादी यांनी सायबर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी संशयित महिलेविरुद्ध माहिती तंत्रज्ञान अधिनियमद्वारे सायबर गुन्हा दाखल केला आहे. Fraud with the lure of higher profits