विविध सामाजिक, धार्मिक उपक्रमांनी साजरा होणार
संदेश कदम, आबलोली
गुहागर, ता. 20 : तालुक्यातील मळण येथे श्री चंडिका देवीचा नवरात्र उत्सव सामाजिक, धार्मिक अशा विविध उपक्रमांनी साजरा होणार आहे. मळण हे गाव आनंदीबाई पेशवे यांचे माहेरघर आहे. या गावाची रखवाली देवी श्री चंडिका माता ही नवसाला पावणारी देवी म्हणून प्रसिद्ध आहे. या देवीच्या मंदिरात सभोवतालचे तसेच दूर दूरचे भक्त नवस फेडण्यासाठी येत असतात. दरवर्षी नवरात्रौ उत्सवात मंडळाचे सदस्य व गावातील महिला पुरुष ग्रामस्थ मंडळी नऊ नवरात्र उत्सव अतिशय शांततेत उत्साहात आणि जल्लोषात साजरा करतात. Navratri festival of Chandika Devi

श्री चंडिका देवी नवरात्रोत्सव मळण या मंडळाच्या वतीने श्री चंडिका देवी मंदिर येथे सोमवार दिनांक 22 /09/2025 ते गुरुवार दिनांक 02/10/2025 असे दहा दिवस श्री चंडिका देवीचा नवरात्र उत्सव साजरा करण्यात येणार आहे. यामध्ये आरती श्री सत्यनारायणाची पूजा, महिला मंडळ आणि पुरुष मंडळ यांचा भजनाचा कार्यक्रम, नाचाचे कार्यक्रम, दांडिया रास, आरोग्य शिबिरे, शस्त्रक्रिया शिबिरे, विद्यार्थ्यांच्या विविध स्पर्धा, धार्मिक प्रवचन, हरिपाठ, दांडिया रास स्पर्धा, संगीत खुर्ची स्पर्धा, लकी ड्रॉ सोडत, महाप्रसाद, फॅन्सी ड्रेस स्पर्धा अशा विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. दसऱ्याच्या दिवशी सोने लुटण्याचा कार्यक्रम ही उत्साहात संपन्न होणार आहे त्यानंतर स्पर्धांचे बक्षीस वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात येणार आहे. Navratri festival of Chandika Devi