गुहागर, ता. 20 : चिपळूण तालुक्यातील धामणवणे येथील निवृत्त शिक्षिका वर्षा जोशी यांचा खून झाल्याने १५ दिवसांपूर्वी मोठी खळबळ उडाली होती. या प्रकरणातील संशयित आरोपी जयेश गोंधळेकर याला अवघ्या ४८ तासात चिपळूण पोलिसांनी अटक केली होती. आता या प्रकरणात त्याचा साथीदार रवी कांबळे याला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. कर्नाटकातून पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या आहेत. Accused in Varsha Joshi murder case arrested

निवृत्त शिक्षिका वर्षा वासुदेव जोशी यांच्या खून प्रकरणी अटकेत असलेला ट्रॅव्हल एजंट जयेश भालचंद्र गोंधळेकर याने पोलिसांकडे कबुली दिली होती. या खून प्रकरणातील साथीदार असलेला त्याचा मित्र रवी कांबळे (रा. सातारा) याच्या सहभागाची माहिती त्याने दिली होती. परंतु टिप मिळाल्यानंतर रवी आठ ते दहा दिवस पोलिसांना चकवा देत होता. रवीचा शोध घेण्यासाठी पोलिस पथक सातारा येथे गेले होते, मात्र तो पूर्णपणे सावध असल्याने सापडला नव्हता. तपासानंतर चिपळूण पोलिसांनी कर्नाटक राज्यातून त्याला अटक केली आहे. जयेश गोंधळेकरने दागिने व पैशांच्या हव्यासापोटी हा खून केल्याची पोलिसांना कबुली दिली होती. या कटात त्याचा साथीदार रवी कांबळेही सामील असल्याचे उघड झाले होते, मात्र खुनानंतर तो फरार झाला होता. Accused in Varsha Joshi murder case arrested
पोलीसांनी सीडीआर तपासला असता तो कर्नाटकात असल्याचे आढळले. यावरून पोलिस पथक गुलबर्गा जिल्ह्यातील तो राहत असलेल्या त्याच्या सासरवाडीतील गावात गेले. सापळा रचून पोलिसांनी रवी कांबळेला पकडलं. अथक प्रयत्नानंतर तो अखेर पोलिसांच्या हाती लागला आहे. रवीला पकडणे हे मोठे आव्हान होत चिपळूण पोलिसांच्या पथकाला हे मोठे यश मिळाला आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे, अपर जिल्हा पोलीस निरीक्षक बाबुराव महामुनी, चिपळूण उपविभागीय पोलीस अधिकारी श्री बेले, पोलिस निरीक्षक फुलचंद मेंगडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक ओम आघाव, हेडकॉन्स्टेबल वृशाल शेटकर, संदीप माणके, कॉन्स्टेबल किरण केदार आदींच्या पथकाने कर्नाटकात सलग तीन दिवस-रात्र मेहनत घेऊन त्याला जेरबंद केले. कर्नाटकातून अटक केलेल्या रवी कांबळे याला न्यायालयात हजर केले असता सहा दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. Accused in Varsha Joshi murder case arrested