गुहागर, ता. 09 : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पुणे येथे पुणे शहर पोलीस आयुक्तालय अंतर्गत विविध प्रकल्पांचे उदघाटन व भूमिपूजन संपन्न झाले. देशातील अत्याधुनिक सीसीटीव्ही प्रणालीचे लोकार्पण करण्यात आले. तसेच, अत्याधुनिक नियंत्रण कक्ष, कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित गुन्हे विश्लेषण, तसेच वाहतूक नियंत्रणाची अत्याधुनिक साधने पुणे पोलिसांना उपलब्ध झाली आहेत. यामुळे गुन्हेगारांचा तातडीने शोध, वाहतूक व्यवस्थापन आणि सार्वजनिक सुरक्षेचे नवे मापदंड तयार होतील. Pune Police ready to establish new norms

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की, निर्मनुष्य जागेवर लक्ष ठेवण्याचे काम तंत्रज्ञानाच्या सहाय्याने बोपदेव घाटापासून सुरू होत आहे. पुढील दोन वर्षांत शहर परिसरातील अशा 22 टेकड्यांवर लक्ष ठेवण्यात येईल. यावेळी पब्लिक ॲड्रेस सिस्टीम, ड्रोनसह 5 आधुनिक नियंत्रण वाहने, एका नवीन पोलीस स्टेशनचे उदघाटन आणि 4 पोलीस स्टेशनचे भूमिपूजनही झाले. राज्य शासनाने एकाचवेळी शहरासाठी 7 पोलीस स्टेशन मंजूर करण्याची ही राज्यातील पहिलीच वेळ आहे. त्यासाठी लागणारे एक 1000 मनुष्यबळाला मान्यता देण्याचाही प्रयत्न असेल. 60 वर्षांनंतर पोलिसांचा नवीन आकृतीबंध तयार करण्यात आला असून, नार्कोटीक्स व फॉरेन्सिक युनिटची स्थापना झाली आहे. लोहगाव, लक्ष्मीनगर, नऱ्हे, मांजरी आणि येवलेवाडी येथे नव्या पोलीस स्टेशनला मंजुरी देण्याबाबतही निर्णय त्यांनी जाहीर केला. Pune Police ready to establish new norms
पुण्याच्या वाढत्या वाहतूक गरजा लक्षात येऊन पुढील 10 वर्षांसाठी अर्बन मोबिलीटी प्लॅन तयार केला जात आहे. त्यात अत्याधुनिक एकात्मिक वाहतूक नियंत्रण प्रणाली उभारली जाणार आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या साहाय्याने वाहतूक नियोजन, पर्यायी रस्त्यांवर वाहतूक वळविणे आणि वाहतुकीची गती वाढविणे शक्य होईल. मुख्यमंत्री फडणवीस यांनी अमली पदार्थाविरुद्ध मोठी मोहीम हाती घेण्याचे आवाहन करत, विधी संघर्षित बालकांच्या पुनर्वसनासाठी पुणे पोलिसांच्या प्रकल्पाचे कौतुक केले. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे, मंत्री चंद्रकांत पाटील, वरिष्ठ पोलीस अधिकारी व इतर मान्यवर उपस्थित होते. Pune Police ready to establish new norms