साहील आरेकर : पक्ष संघटना बळकट करणार
गुहागर ता. २३ : राजेश बेंडल हे आमचेच आहेत. विधानसभा निवडणुकीत ते शिंदे सेनेत गेले. ते पुन्हा राष्ट्रवादीत आले तर पक्ष संघटना मजबूत होईल. मात्र त्यांना राष्ट्रवादीत आणण्यासंदर्भातील प्रक्रिया वरिष्ठ स्तरावरुन होईल. असे राष्ट्रवादी काँग्रेसचे नवनियुक्त तालुका अध्यक्ष साहील आरेकर यांनी सांगितले. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुकाध्यक्ष म्हणून नियुक्ती झाल्यानंतर प्रथमच साहील आरेकर यांनी पत्रकारांशी संवाद साधला. Sahil Aarekar Press

यावेळी ते म्हणाले की, एकेकाळी गुहागर मध्ये उत्तम संघटन असलेला, सर्वाधिक लोकप्रतिनिधी असलेला पक्ष अशी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थिती होती. मात्र मधल्या काळात गुहागर तालुक्याला नेतृत्व न मिळाल्याने कार्यकर्ते अन्य पक्षात गेले. या पाश्र्वर्वभूमीवर मला तालुकाध्यक्ष पद मिळाले. काहींनी अभिनंदन केले तर काहींनी इतक्या लहान वयात ही जबाबदारी पेलणे कठीण आहे, अशी टीका केली. पण मी असलेल्या सर्व कार्यकर्त्यांना सोबत घेऊन पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी प्रयत्न करणार आहे. समाजातील अनेक नवीन मान्यवर राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये येण्यास तयार आहेत. त्यांच्यापर्यंत पोचून त्यांना पक्षात सक्रिय करण्याचे काम सुरू आहे. मला तालुका कार्यकारिणी केवळ नावापुरती करायची नाही. मिळेल ती जबाबदारी मिळेल पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या कार्यकर्त्यांलाच पद देण्याचा मानस आहे. यापूर्वी अनेक जण खासदारांना भेटून विकासाची कामे सांगायचे. त्या कामांना निधी मिळाला तरी पक्ष संघटन वाढत नव्हते. आता खासदार तटकरेंनी नवी व्यवस्था तयार केली. तालुक्यातील कोणतेही काम तालुकाध्यक्षाच्या माध्यमातूनच त्यांच्या पर्यंत आले तरच निधी मिळेल. अशी व्यवस्था सुरू झाली आहे. त्याचा फायदा पक्ष वाढीसाठी होईल. Sahil Aarekar Press

खासदार सुनील तटकरेंनी सर्वाधिक निधी गुहागर तालुक्याला दिला. मात्र त्या तुलनेत पक्ष वाढला नाही. आता आम्ही महिन्यातून तीन ते चार वेळा भेटतो. विकास कामांची चर्चा करतो. आपल्या प्रयत्नातून जवळपास दोन कोटीचा निधी गुहागर तालुक्यात आला. काही निधी नगरपंचायतीसाठी तर काही निधी तालुक्यासाठी आहे. त्याच्यामुळे खासदार साहेब भेटत नाहीत, हा आरोप चुकीचा आहे. आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती व नगरपंचायत निवडणुका महायुती म्हणूनच लढण्याचा निर्णय झाल्याचे कळते. आमची शहरांमध्ये ताकद अधिक आहे. त्यामुळे भविष्यात स्वतंत्र लढण्याचा निर्णय झाला तरी देखील आम्ही यशस्वी होऊ. असा विश्वास साहिल आरेकर यांनी व्यक्त केला. Sahil Aarekar Press
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हा ओबीसी सेलचे उपाध्यक्ष श्रीधर बागकर, पडवे जिल्हा परिषद गट अध्यक्ष तुषार सुर्वे, गुहागर शहराध्यक्ष मंदार कचरेकर, राष्ट्रवादी काँग्रेस गुहागर तालुका सचिव दीपक शिरधनकर उपस्थित होते. Sahil Aarekar Press