• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
21 August 2025, Thursday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

जिवंत हुतात्मा – सदानंदन मास्टर

by Guhagar News
July 21, 2025
in Articals, Old News
147 2
0
289
SHARES
825
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

नव्या राज्यसभा खासदाराची संघर्षमय कहाणी

( साप्ताहिक विवेक मध्ये प्रसिद्ध झालेला शेफाली वैद्य यांचा लेख साभार )

गुहागर, न्यूज : पूर्ण केरळ राज्य त्यांना आज जिवंत हुतात्मा म्हणून ओळखतं. चष्मा लावलेले, जवळ जवळ सहा फूट उंच, वयाच्या पन्नाशीतही बलदंड शरीरयष्टी टिकवून असलेले सदानंदन मास्टर जेव्हा त्यांच्या विद्यार्थ्यांना इतिहास शिकवण्यात रंगून गेलेले असतात, तेव्हा त्यांच्याकडे बघून वाटतही नाही की त्यांचे दोन्ही पाय गुडघ्यापासून तुटलेले आहेत. गेली वीस वर्षे सदानंदन मास्टरजी कृत्रिम पाय लावून वावरतात, पण त्यांच्या उत्साहात, काम करण्याच्या शक्तीत जराही बदल नाही. त्यांचे विद्यार्थी त्यांना ‘माशे’ म्हणून ओळखतात. आपल्या ह्या लाडक्या शिक्षकासाठी सदानंदन मास्टर ह्यांचे विद्यार्थी काय वाट्टेल ते करायला तयार आहेत इतके मास्टरजी विद्यार्थ्यांमध्ये लोकप्रिय आहेत.

१९९४ साली जेव्हा सदानंदन मास्टरजीना आपले दोन्ही पाय गमवावे लागले, तेव्हा ते फक्त तीस वर्षांचे होते. त्यांना अपघात झाला नव्हता किंवा कुठला आजारही झाला नव्हता. सदानंद मास्टरजींचे पाय केरळमधल्या कम्युनिस्ट गुंडानी अत्यंत क्रूरपणे करवत वापरून गुढघ्यांपासून कापून टाकले होते, तेसुद्धा भर बाजारात. सदानंदन मास्टरजींचा गुन्हा एकच होता, साम्यवादी विचारांची परंपरा असलेल्या कुटूंबात जन्मूनदेखील त्यांनी राष्ट्रवादी विचारांकडे वळण्याचं धाडस केलं होतं. कम्युनिस्ट वडिलांचा मुलगा संघविचारांनी प्रभावित होऊन स्वयंसेवक झाला होता, तेही केरळच्या कन्नूर जिल्ह्यात, जो जिल्हा केरळमधल्या साम्यवादी हिंसाचाराचा मूळ स्रोत आहे. ह्या जिल्ह्यातली गावंच्या गावं अशी आहेत जिथे फक्त एकाच राजकीय विचारसरणीचा, म्हणजे साम्यवादाचा प्रभाव चालतो. दुसऱ्या कुठल्याही विचारप्रणालीचे वारे जरी इथे फिरकले तरी अत्यंत क्रूर अशी हिंसा वापरून त्या विचारसरणीच्या लोकांचा समूळ बिमोड करण्यात येतो, आणि तरीही, राष्ट्रवादी विचार केरळमध्ये संघाच्या रूपाने रुजतोय, वाढतोय. सदानंद मास्टर हे त्या रुजत्या वाढत्या राष्ट्रवादाचे मूर्तिमंत प्रतीक आहेत. ही आहे सदानंदन मास्टर ह्यांची कहाणी, त्यांच्याच शब्दात सांगितलेली.

‘मी कन्नूर जिल्ह्यामधल्या मट्टनूर जवळच्या  एका छोट्या गावात वाढलेला मुलगा. माझे वडील कम्युनिस्ट पक्षाचे कार्यकर्ते होते. माझा मोठा भाऊ कम्युनिस्ट पक्षाच्या युवा शाखेचं काम करायचा. साहजिकच लहानपणापासून मलाही साम्यवादी विचारांचंच बाळकडू मिळालेलं. त्यात कन्नूर जिल्हा म्हणजे केरळमधल्या साम्यवादाची प्रयोगशाळा. कन्नुरमधल्या पिनरई ह्या गावात पहिल्यांदा केरळमध्ये साम्यवादी विचार रुजला. सध्याचे केरळचे मुख्यमंत्री पिनरई विजयन हे ह्याच गांवचे. त्यांच्यावर राजकीय हिंसाचाराचे आरोपही आहेत. कन्नूरमध्ये दुसऱ्या कुठल्याही विचारसरणीला पाय रोवू द्यायचा नाही हे कम्युनिस्ट पक्षाने ठाम ठरवलेलं. त्यामुळे इथला कुणीही रहिवासी राष्ट्रीय विचारांकडे आकृष्ट होताना दिसला की त्याच्याविरुद्ध, त्याच्या कुटुंबाविरुद्ध पद्धतशीरपणे मोहीम काढली जायची. आधी राजकीय आणि सामाजिक बहिष्कार, मग पदोपदी कामात अडवाअडवी आणि सगळ्यात शेवटी नृशंस हिंसाचार अशी सगळी शस्त्रे वापरून विरोधी विचारांचा बिमोड करणे हे केरळमधल्या कम्युनिस्टांचे धोरणच आहे. तरीही, अश्या भयानक प्रतिकूल परिस्थितीमध्येही कन्नूरमध्ये संघकार्याची स्थापना झाली. साम्यवाद्यांच्या दादागिरीला कंटाळलेले, कम्युनिस्ट विचारांमधला फोलपणा उमजू लागलेले माझ्यासारखे काही तरुण संघविचारांकडे वळायला लागले. सुरवातीला संघ गावा-गावात रुजवण्यासाठी कार्यकर्त्यांनी घेतलेले असीम कष्ट आम्हाला दिसतच होते.

मी कॉलेजमध्ये असताना एसएफआयचं काम करायचो. पण तोपर्यंत मला कळून चुकलेलं होतं की साम्यवादी विचारसरणीत भारताला भेडसावणाऱ्या प्रश्नांची उत्तरे मिळणे शक्य नाही. ह्याच दरम्यान माझी गावात काम करणाऱ्या काही संघाच्या कार्यकर्त्यांशी ओळख झाली. त्यांची देशकार्याविषयीची तळमळ, भारताला सतावणाऱ्या प्रश्नांची उत्तरे इथल्या मातीतच शोधणारी संघाची विचारसरणी ह्याचा माझ्या मनावर नकळतच परिणाम होत गेला आणि मी संघविचारांकडे आकृष्ट झालो. अधून मधून शाखेवर जायला लागलो. माझ्या वडिलांनी मला संघविचारांकडे वाळण्यापासून परावृत्त करायचा प्रयत्न केला खरा, पण त्यात फार जान नव्हती, कारण तोपर्यंत ते स्वतःही कम्युनिस्ट पक्षाच्या विचारसरणीला थोडेसे कंटाळले होते, पण माझ्या जीवाला काही धोका होऊ नये म्हणून ते मला अडवत होते. मी संघविचारांकडे वळलेला बघून एसएफआय मध्ये माझ्याबरोबर काम करणारे मित्र मात्र खूप अस्वस्थ झाले. त्यांनी माझं मन वळवायचा खूप प्रयत्न केला, पण कम्युनिस्टांची अरेरावी, त्यांचा हिंसेकडे असलेला कल, कुठलाही विरोधी विचार निर्घृणपणे चिरडून टाकायची त्यांची असहिष्णू वृत्ती ह्यामुळे माझा पुरताच भ्रमनिरास झाला होता. मी स्वतःला पूर्णपणे संघकार्याला वाहून घेतलं.

आमच्या गावात संघ कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन श्रमदानाने एक बस-थांबा उभारला होता. केरळवर राज्य करणाऱ्या कम्युनिस्टांच्या नाकर्तेपणाचा तो बस-थांबा एक प्रतीक होता. जे सरकार करू शकलं नाही ते संघशक्तीने साध्य करून दाखवलं होतं. त्यामुळे तो बस-थांबा कम्युनिस्ट कार्यकर्त्यांच्या डोळ्यात सलत होता. १९९३ मध्ये सप्टेंबरच्या आठ तारखेला कम्युनिस्टांनी कन्नुरमध्ये बंद पुकारला होता. त्या दिवशी काही कम्युनिस्ट गुंडांनी झुंडीने येऊन तो बस-थांबा तोडायला सुरवात केली. आम्हाला खबर कळताच आम्ही संघ कार्यकर्तेही तिथे पोचलो. दोन्ही गटांमध्ये मारामारी झाली. मलाही बेदम मारहाण झाली. आम्ही प्रतिकार केला ते कम्युनिस्टांना आवडलं नाही. आतापर्यंत त्यांना त्यांनी केलेली गुंडगिरी मूकपणे लोक सहन करतात हेच माहिती होतं. मी कम्युनिस्ट विचारांची कास सोडून संघविचारांकडे वळलेलो, त्यामुळे मी त्यांच्या डोळ्यात खूपच सलत होतो. मला जन्मभर लक्षात राहील असा धडा शिकवलाच पाहिजे असं कम्युनिस्टांना वाटत होतं. ती संधी त्यांना लवकरच मिळाली.

मला अजूनही तो दिवस अगदी जसाच्या तसा आठवतो.  २५ जानेवारी १९९४ ची संध्याकाळ. मी फक्त तीस वर्षांचा होतो तेव्हा. माझ्या बहिणीचं लग्न काही दिवसांवर आलं होतं. त्या संदर्भात काही बोलणी करायला म्हणून मी माझ्या काकांकडे गेलो होतो. आनंदात होतो मी. माझंही लग्न ठरलं होतं. माझ्याच बी.एड च्या वर्गात शिकणाऱ्या वनिता नावाच्या मुलीबरोबर. आम्ही दोघांनी प्रेमाच्या आणा-भाका घेतल्या होत्या. दोघांचंही शिक्षण संपलं होतं आणि दोघांनी मिळून संसाराची उज्ज्वल स्वप्ने बघितली होती. आपल्यापुढे काय वाढून ठेवलंय याची आम्हा दोघानांही कल्पना नव्हती. माझं काम आटोपून मी बसने रात्री आठ वाजता माझ्या गावात परतलो. माझ्या घर जवळच्या बस-स्टॉप वर मी उतरलो. ‘ते’ माझी वाटच पहात होते. ते, कम्युनिस्ट पक्षाचे भाडोत्री कार्यकर्ते. माझ्या गावातलेच होते त्यातले काही. मी ओळखतही होतो त्यांना चांगला. त्यांची माझी वैयक्तिक काहीच दुश्मनी नव्हती, पण त्या क्षणी ते द्वेषाने अंध झाले होते. मला घेरून त्यांनी जेरबंद केलं. काहींनी आजूबाजूला गावठी बॉम्ब फेकले. आजूबाजूचे तुरळक लोक घाबरून पळाले. त्या लोकांनी मग मला जमिनीवर पकडून ठेवलं आणि करवतीने माझे दोन्ही पाय गुडघ्यापासून खाली कापून काढले. त्या प्राणांतिक वेदना मी अगदी आजही विसरू शकत नाही. माझे पाय कापून ते कम्युनिस्ट गुंड थांबले नाहीत, त्यानी माझे दोन्ही कापलेले पाय दूर चिखलात फेकून दिले आणि माझ्या रक्ताळलेल्या गुढघ्यांना शेण फासलं. शस्त्रक्रिया करून माझे पाय परत जोडले जाऊ नयेत म्हणून त्यांनी घेतलेली ती खबरदारी होती. त्यांचं काम झाल्यावर मला तसंच तिथे बस-स्टॉपवर रक्ताच्या थारोळ्यात तडफडत सोडून ते निघून गेले. अतिरक्तस्त्रावाने आणि वेदनेने मी इतका क्लांत झालो होतो की मला ओरडण्याचे देखील त्राण राहिले नव्हते. मी तसाच तिथे बेवारशी जनावरासारखा पडून राहिलो, जवळजवळ अर्धा तास, खबर कळून पोलीस तिथे येईपर्यंत.

पोलीस आले तेव्हा मी ग्लानीत होतो. पोलिसांनी आणि इतर संघ कार्यकर्त्यांनी मिळून मला शहरात मोठ्या इस्पितळात नेलं. एकाने दूर फेकलेले माझे पाय बरोबर घेतले. ते परत जोडता येतील म्हणून नव्हे, तर माझे पाय कसे कापून टाकले हे डॉक्टरांना कळावं म्हणून. दुसऱ्या दिवशी मी शुद्धीवर आलो तेव्हा माझ्या गुढघ्यांना पांढरंशुभ्र बॅंडेज बांधलेलं होतं आणि खाली? खाली काहीच नव्हतं. कालपर्यंत मी धडधाकट होतो अन आज दोन्ही पायानी पांगळा झालेलो होतो. त्याच दिवशी वनिता, माझी होणारी पत्नी मला भेटायला इस्पितळात आली. तिचा चेहरा पार विदीर्ण झाला होता. माझ्याजवळ होतं-नव्हतं ते धैर्य एकवटून मी तिला सांगितलं की मी तिला तिच्या वचनातून मोकळं करतोय. तिने माझ्यासारख्या एका पांगळ्याबरोबर आता लग्न करू नये. तिच्या आई-वडिलांनीही तिला हेच सांगितलं. पण ती मानेनेच नाही म्हणून सांगितलं.

मी जवळ जवळ सहा महिने इस्पितळात होतो. खूप कठीण दिवस होते ते. माझं आयुष्य मला निरर्थक वाटत होतं. मी कधीही कुणाचंही वाईट केलेलं नसताना हा भोग माझ्याच वाट्याला का यावा हे मला कळत नव्हतं. नैराश्याने ग्रासलं होतं मला. पण संघाचे कार्यकर्ते नित्य नियमाने माझ्या भेटीला यायचे. मला सतत बोलतं ठेवायचे. माझ्या मनाची उभारी टिकवून ठेवायला मदत करायचे. एकटा असलो की शाखेत शिकवलेली गाणी मी स्वतःशीच गुणगुणत राहायचो. माझे मनोधैर्य वाढवायचा प्रयत्न करायचो. वनिता ह्या सर्व काळात सतत माझ्या बरोबर होती. माझ्या कुटुंबीयांनी, तिच्या कुटुंबीयांनी, इतकंच काय, ज्येष्ठ संघ कार्यकर्त्यांनी सांगून देखील ती माझ्याशी लग्न करण्याच्या तिच्या निश्चयापासून ढळली नव्हती. तिचा दुर्दम्य विश्वास आणि प्रेम, माझ्या कुटुंबीयांनी केलेली सेवा आणि संघाच्या कार्यकर्त्यांनी केलेली अथक साथ, ह्यामुळे मी माझ्या नैराश्यातून बाहेर आलो. डॉक्टरांनी जयपूर फूट बसवला. मी हळूहळू परत चालायची सवय करू लागलो. खूप दुखायचं. पहिल्यांदा कृत्रिम पाय बसवताना कातडी सोलवटायची. प्रत्येक पाऊल उचलताना अपरिमित वेदना व्हायच्या. पण हळूहळू सवय झाली. मी परत माझ्या पायावर उभा राहिलो आणि कुणाच्याही मदतीविना चार पावलं चाललो तो दिवस केवळ माझ्यासाठीच नव्हे तर वनिताला आणि संघातल्या सगळ्यांसाठीच खूप आनंदाचा दिवस होता.

आज जवळ जवळ वीस वर्षे मी कृत्रिम पाय लावून वावरतोय. दिवसाला सलग अठरा-अठरा तास काम करतोय. मिळेल त्या वाहनाने, मिळेल तसा प्रवास करतोय. तासंतास शाळेत उभा राहून शिकवतोय. किंबहुना मला पाय नाहीत ही जाणीवच मी विसरून गेलोय. वनिताचं आणि माझं लग्न झालंय. आम्ही एक छोटं घरकुलही उभारलंय. आम्हाला एक मुलगीही आहे. ती बी. टेक करतेय सध्या. मी अजूनही संघाचं काम करतो. मला वनिताचा आणि माझ्या लेकीचा पूर्ण पाठिंबा आहे. माझ्या कुटुंबातल्या लोकांनाही आता राष्ट्रीय विचारांचं महत्व पुरेपूर उमजलंय. कम्युनिस्ट विचारांमधील फोलपणा आता त्यांना पुरताच कळलाय. इतकंच काय ज्या लोकांनी माझ्यावर हल्ला केला होता त्यातलेही काही लोक आता संघाकडे वळलेत.

ज्यांनी माझे पाय कापले त्यापैकी काही जणांनी नंतर येऊन माझी माफी मागीतली. माझा त्यांच्यावर राग नाही. कारण दोष त्यांचा नाही. ज्या विचारापोटी द्वेषाने आंधळे होऊन त्यांनी माझ्यावर हा भयंकर हल्ला केला त्या विचाराचाच हा दोष आहे. मी आज कोवळ्या मुलांना शिकवतो. त्यांना हा घाऊक द्वेष आंदण देण्याची माझी इच्छा नाही. संघ देशावर प्रेम करायला शिकवतो. एखाद्या व्यक्तीचा किंवा समाजधारेचा द्वेष करायला नाही. मला माझ्या विद्यार्थ्यांना देशप्रेम शिकवायचंय. कुठल्यातरी परकीय देशात उगम पावलेला विदेशी ईझम शिकण्यापेक्षा त्यांनी ह्या देशावर, ह्या मातीवर प्रेम करायला शिकावं. इथल्या प्रश्नांना इथल्या मातीतच उत्तरं शोधायला शिकावं एव्हढीच माझी इच्छा आहे.

पिनरयी विजयन मुख्यमंत्री झालेत तेव्हापासून केरळमध्ये कम्युनिस्टांचा हिंसाचार परत एकवार उफाळून आलाय. ज्या राज्याच्या मुख्यमंत्री स्वतःच एखाद्या राजकीय खुनाच्या प्रकरणात आरोपी असेल त्या राज्यात हिंसा झाली नसती तरच नवल. केरळमध्ये राष्ट्रीय विचारांच्या लोकांपुढे फार मोठी आव्हानं आहेत. एकीकडे रक्तरंजित लाल हिंसाचार तर दुसरीकडे इस्लामी मूलतत्ववाद राज्यात हळूहळू मूळ धरत आहे तर केरळच्या काही भागात ख्रिस्ती धर्मप्रसारकांचा अनिर्बंध संचार आहे. तरीही राष्ट्रप्रेमाची ज्योत केरळमध्ये सदैव तेवत राहील कारण ही आदी शंकराचार्यांची जन्मभूमी आहे. संघाचा, राष्ट्रीय विचारांचा प्रभाव केरळमध्ये हळूहळू पण निश्चितपणे वाढतो आहे. मला खात्री आहे की काही वर्षात परिस्थिती जरूर बदलेल.’ – शेफाली वैद्य

Tags: GuhagarGuhagar NewsLatest Marathi NewsLatest NewsMarathi NewsNews in GuhagarThe Struggle Story of an MPटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share116SendTweet72
Guhagar News

Guhagar News

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.