सम प्रमाणात निधी नसल्याचा डाँ. नातूंचा आरोप, लोकसंख्येच्या निकषानुसार निधी वाटप व्हावे
गुहागर, ता. 09 : ० ते १०० हेक्टरपर्यंतच्या लघुपाटबंधारे योजनेअंतर्गत जिल्हा वार्षिक योजना सन २०२४-२५ या आर्थिक वर्षामध्ये प्रत्येक तालुक्यातील कामांना मंजुरी देण्यात आली मात्र, जिल्ह्यातील ९ तालुक्यांना सम प्रमाणात निधीचे वाटप झालेले नसून केवळ रत्नागिरी व राजापूर या ठराविक तालुक्यांसाठीच कोट्यवधींचा निधी खर्च झाल्याचा आरोप माजी आ. डाँ. विनय नातू यांनी केला आहे. Funds under the Minor Irrigation Scheme


याबाबत डाँ. नातू यांनी या प्रत्येक कामांवर दि. ३१ मार्च २०२५ अखेर किती निधी खर्च झाला. याबाबत जि.प. रत्नागिरी ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता यांच्याकडून माहिती मिळवली असता, हे वास्तव समोर आले आहे. ० ते १०० हेक्टरपर्यंतच्या लघुपाटबंधारे योजनेच्या कामांसाठी रत्नागिरी जिल्ह्याला या आर्थिक वर्षात ५ कोटी ५० लाख मंजूर झाले. यापैकी १ कोटी ५० लाखाची बिले द्यावयाची आहे. दापोली तालुक्यातील २ कामांसाठी ५० लाख, गुहागर विधानसभा मतदारसंघातील गुहागर तालुक्यासाठी २ तर चिपळूण तालुक्यासाठी १ अशा तीन कामांना ८६ लाख, चिपळूण विधानसभा मतदारसंघातील संगमेश्वर तालुक्यातील ३ कामांना ५० लाख, रत्नागिरी तालुक्यातील ६ कामांसाठी २ कोटी ५० लाख, राजापूर मतदारसंघातील लांजा तालुक्यातील २ व संगमेश्वर तालुक्यातील ३ अशा ५ कामांसाठी १ कोटी १० लाख मंजूर करण्यात आले. Funds under the Minor Irrigation Scheme

