पीक कापणी प्रयोगांकरिता ग्राम पातळीवरील समिती प्रतिनिधिंनी उपस्थित रहावे
रत्नागिरी, ता. 02 : चालू खरीप हंगामामध्ये झालेले कमी-अधिक पर्जन्यमान, ऑगस्ट महिन्यामधील पावसाचा खंड इ. कारणामुळे भात व नागली पिकांच्या उत्पादनात घट होण्याची शक्यता नाकारता येत नाही. याकरिता पीक कापणी प्रयोगा वेळी ग्राम पातळीवरील समिती मंडळ अधिकारी /मंडळ कृषी अधिकारी, ग्रामसेवक, सरपंच, पोलीस पाटील आणि विमा कंपनीचे प्रतिनिधी यांच्या देखरेखीखाली व उपस्थितीत प्रयोग करायचे असून, उत्पादनाची अचूक आकडेवारी मोबाईल अॕपद्वारे ऑनलाइन करायची आहे. तरी आपल्या गावामध्ये राबविण्यात येणाऱ्या पीक कापणी प्रयोगांकरिता ग्राम पातळीवरील समिती प्रतिनिधी यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी सुनंदा कुऱ्हाडे यांनी केले आहे. या करिता अधिक माहितीसाठी व पीक कापणीच्या तारखांसाठी संबंधित गावचे कृषी सहायक यांच्याशी संपर्क साधावा. Product statistics via mobile app

राज्यातील अधिसूचित क्षेत्रातील अधिसूचित पिकांसाठी प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगाम २०२३ ते रब्बी हंगाम २०२५-२६ हंगामासाठी ३ वर्षाकरिता राज्यात राबविण्यास शासनाने मान्यता दिली आहे. तथापि, सन २०२३-२४ पासून सर्व समावेशक पीक विमा योजना राज्यात राबवली जात आहे. या अंतर्गत रत्नागिरी जिल्ह्यामध्ये भात व नागली या दोन पिकांकरिता विमा संरक्षण लागू आहे. या योजनेंतर्गत शेतकऱ्यांना हवामान घटकांच्या प्रतिकूल परिस्थितीमुळे पिकांचे होणारे नुकसान तसेच पीक पेरणीपासून काढणीपर्यंतच्या कालावधित उत्पादनात येणारी घट, स्थानिक नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे होणारे नुकसान व काढणी पश्चात नुकसान इ. बाबीमुळे सरासरी उत्पादनात घट झाल्यास विमा संरक्षण दिले जाते. Product statistics via mobile app

या योजनेंतर्गत जिल्ह्यामध्ये भात व नागली या पिकांची सरासरी उत्पादकतेची परिगणना करण्यासाठी प्रत्येक पिकासाठी महसूल मंडळ स्तरावर कृषी, महसूल व जिल्हा परिषदेमार्फत पीक कापणी प्रयोगांचे नियोजन करण्यात आलेले आहे. पारदर्शक पद्धतीने पिकांच्या उत्पादनाची अचूक आकडेवारी प्राप्त करण्याच्या उद्देशाने पीक कापणी प्रयोगांचे केंद्र शासनाच्या मोबाईल अॕपद्वारे सर्वेक्षण करण्यात येत आहे. Product statistics via mobile app
