सरपंच सौ. गोरिवले यांनी केला शुभारंभ; ग्रामस्थांचे स्वप्न पूर्ण होणार
गुहागर, ता. 25 : विविध पुरस्कार मिळविणाऱ्या कोतळूक गावाने ग्रामपंचायत इमारतीचे नुतनीकरण करण्याचे ठरविले आहे. या कामाचा शुभारंभ सरपंच सौ. उर्मिला गोरिवले यांनी केला. नुकताच या गावाला आर. आर. पाटील सुंदर गाव योजनेमध्ये तालुकास्तरावरील सर्वोत्कृष्ट कामगिरीचा पुरस्कार मिळाला आहे.
ग्रामपंचायतीचा कारभार एकोप्याने करुन आदर्श ग्राम म्हणून ओळख मिळविलेल्या कोतळुक ग्रामपंचायतीला नुकताच तालुकास्तरावरील सुंदर गावाचाही पुरस्कार मिळाला आहे. सन 2018-19 मध्ये आर. आर. पाटील सुंदर गाव स्पर्धेत तालुक्यातील सर्वोत्कृष्ट कामगिरी कोतळूक गावाने केली होती. या गावाने ग्रामपंचायतीची निवडणूकही बिनविरोध केली आहे. कोरोना काळात आरोग्य केंद्राला सहकार्य करुन जनजागृतीची अभियाने गावाने यशस्वी केली.
कोतळूक गावाने आपल्या ग्रामपंचायतीच्या इमारतीचे नुतनीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे. तीन वर्षांपूर्वी कोतळूकचे माजी सरपंच दत्तात्रय ओक आणि कुटुंबियांनी कै. काशिनाथ बाळाजी ओक तथा नाना ओक यांच्या स्मरणार्थ ग्रामपंचायतीच्या इमारतीसाठी ४ गुंठे जागा विनामूल्य दिली होती. या जागेत ग्रामपंचायतीची नवीन इमारत उभी रहाणार आहे. त्यासाठी ग्रामपंचायतीचा ग्रामनिधी व १५ वा वित्त आयोग इतर विकासकामे मधून १३ लाख २१ हजार १८० रुपयांचा निधीची तरतूद करण्यात आली आहे.
या कामाचा शुभारंभ सरपंच सौ. उर्मिला गोरिवले यांनी केला. यावेळी कोतळुकच्या उपसरपंच सौ. संजीवनी जावळे, माजी सभापती व जिल्हा नियोजन समितीचे सदस्य विलास वाघे, गणपत शिगवण, ग्रामपंचायत सदस्य सचिन ओक, विजय भेकरे, रमेश गोरिवले, शितल गोरिवले, संचिता गुरव, सेजल शिगवण, माजी सरपंच सुरेश गोरिवले, माजी उपसरपंच शिवराम मोहिते, तुकाराम मोहिते, प्रकाश मोहिते, माजी पोलिस पाटील नंदकुमार नार्वेकर, तंटामुक्त समितीचे माजी अध्यक्ष सुनिल भेकरे, चंद्रकांत गुरव, लक्ष्मण भेकरे, भगवान गोरिवले, अनंत चव्हाण, लक्ष्मण गोरिवले, सुरेश भेकरे, तुकाराम बाधावटे, पांडुरंग कावणकर, आनंद शिगवण, ग्रामविकास अधिकारी मोहन घरत, ठेकेदार कुणाल तांडेल आदींसह वाडी प्रमुख, ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते.