गुहागर, ता. 18 : अयोध्येतील प्रभु श्री रामचंद्राच्या मंदिर निर्माणासाठी व्याडेश्र्वर देवस्थानने दोन लाख एकावन्न हजार रुपयांची देणगी दिली आहे. व्याडेश्र्वर देवस्थानचे अध्यक्ष अरुण परचुरे, उपाध्यक्ष शार्दुल भावे, प्रकाश भावे, अमरदिप परचुरे, हेमंत बारटक्के आणि श्रीधर आठवले यांनी देणगीचा धनादेश श्रीराम जन्मभुमी तिर्थक्षेत्र न्यासाचे कार्यकर्ते राजन दळी, डॉ. मंदार आठवले, विनोद पटेल, कौस्तुभ दिक्षित, प्रथमेश पोमेंडकर आणि अमित चौधरी यांच्याकडे सुपूर्त केला.
5 ऑगस्ट 2020 रोजी प्रभु श्री रामचंद्राच्या भव्य मंदिर उभारणीसाठी भूमिपूजन करण्यात आले. या वेळी देशातील 3000 पेक्षा जास्त नद्यांचे तीर्थ, देशातील वेगवेगळ्या स्थानांवर आणि बलिदान दिलेल्या कारसेवकांच्या घरुन आणलेली माती भूमिपूजनासाठी आणण्यात आली होती. अयोध्येतील राम मंदिर 57 हजार 400 चौरस फुटात बांधण्यात येणार आहे. मंदिराची एकूण लांबी 360 फूट, रुंदी 235 फूट आणि उंची 161 फुट इतकी असणार आहे. नागर शैलीत बांधण्यात येणाऱ्या या मंदिराचे बांधकाम पूर्णपणे दगडात होणार आहे. गावागावातून पूजन करुन अयोध्येत पाठविलेल्या विटांचा उपयोग देखील मंदिर निर्मितीसाठी केला जाणार आहे. मंदिर उभारणीच्या कार्यात एल ॲण्ड टी आणि टाटा कन्स्लटन्सी या कंपन्यांचे सुमारे 36 अभियंते सध्या कार्यरत आहेत. या मंदिरात सुमारे 600 किलो वजनाची पंचधातूची घंटा बसविण्यात येणार आहे.
अशा या भव्य राममंदिराची माहिती वाडीवाडीतील प्रत्येक घरात जावून सर्वांपर्यंत पोचविण्याचे काम सध्या श्रीराम जन्मभुमी तीर्थक्षेत्र न्यासाचे कार्यकर्ते करत आहेत. तसेच माझा ही या मंदिराच्या निर्मितीमध्ये खारीचा वाटा असला पाहिजे या श्रध्देने सर्व समाजातील, धर्मातील लोक समर्पण निधी देत आहेत. असा समर्पण निधी संकलीत करण्याचे कामही कार्यकर्ते करत आहे.
गुहागर तालुक्यातील जवळपास 60 गावांमध्ये हे काम अंतिम टप्प्यात आहे. अनेक मंडळी या कामासाठी आपापल्या इच्छेप्रमाणे 10 रुपयांपासून निधी देत आहेत. काही दिवसांपूर्वीच गुहागरमधील खातू मसाले उद्योगचे खातू कुटुंबियांनी दोन लाखाचा निधी समर्पित केला. तर आज व्याडेश्र्वर देवस्थानने देखील 2 लाख 51 हजार रुपयांचा निधी कार्यकर्त्यांकडे सुपूर्त केला.
दहावीच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन, आरोग्य शिबिरे, तालुक्यातील मंदिरांच्या उभारणीमध्ये आर्थिक मदत, टँकरने पाणी पुरविणे, समुद्रकिनाऱ्यावरील जीवरक्षकांसाठी नगरपंचायतीला सहकार्य, कोरोना संकट काळात मास्कचे वाटप, औषधांसाठी निधी, स्थानिक लोककलांना व्यासपीठ मिळवून देण्यासाठी नमन महोत्सव, पर्यटन महोत्सव असे विविध उपक्रम व्याडेश्र्वर देवस्थानतर्फे राबविले जातात. या देवस्थानने अयोध्येतील श्रीराम मंदिराच्या उभारणीमध्येही मोठे सहकार्य केले आहे. त्याबद्दल ग्रामस्थ, भक्त, विविध संस्थांनी व्याडेश्र्वर देवस्थानचे अभिनंदन केले आहे.