राजेंद्र आरेकर यांचे आवाहन; इमारतीचे काम पूर्ण
गुहागर, ता. 18 : ज्ञानरश्मी वाचनालयाच्या नूतन इमारतीचे काम पूर्ण झाले आहे. एकूण 4 हजार स्क्वेअर फुट बांधकामाला सुमारे रु. 45 लाख इतका खर्च आला आहे. आता अंतर्गत सजावट, फर्निचर आदी कामे पूर्ण करायची आहेत. इमारतीसह सर्व खर्च देणगीमधुन उभा रहावा यासाठी रु. ४ लाख देणाऱ्या देणगीदाराचे नाव कक्षांना देण्याची योजना ज्ञानरश्मी वाचनालयाने बनविली आहे.
याबाबत बोलताना अध्यक्ष राजेंद्र आरेकर म्हणाले की, वाचनालयाच्या संचालकांनी 26 जानेवारी 2021 रोजी नूतन इमारतीचे उद्घाटन करण्याचे नक्की केले होते. त्यानुसार वेळापत्रक बनविण्यात आले. मात्र कोरोनाच्या संकटात दोन महिने टाळेबंदी आल्याने आणि नंतर सर्वांनाच मंदीला तोंड द्यावे लागेल. त्याचा परिणाम देणगीवर झाला. इमारतीसाठी आवश्यक खर्चाची रक्कम मिळाली नाही. तरी देखील संचालकांनी स्वत:च्या खिशात हात घालून बांधकाम न थांबवता पूर्ण केले. ठेकेदाराकडे काम दिले तर अधिक पैसे जातात. हे लक्षात घेवून सर्व संचालकांनी बांधकामावर लक्ष ठेवण्याची जबाबदारी उचलली. वास्तु रचनाकार, सल्लागार संस्था यांनी देखील आपल्या फीसाठी आग्रह धरला नाही. त्यामुळे कोरोनाचे संकटाच्या पार्श्र्वभुमीवर देखील सुमारे 15 लाखांची बचत करण्यात आम्ही यशस्वी झालो आहोत. इमारतीचे काम पूर्ण झाले असले तरी अंतर्गत सजावट, फर्निचर, संगणक संच, वीज जोडणी आदीसाठी मोठा खर्च अपेक्षित आहे. शिवाय संचालकांचे पैसेही संस्थेला कधीतरी द्यावे लागणार आहेत. हे लक्षात घेवून आम्ही वाचनालयातील महिला विभाग, बाल विभाग, स्पर्धा परीक्षा अभ्यासिका या कक्षांसाठी स्वतंत्र देणगी घेण्याचे ठरविले आहे. कोणत्याही एका कक्षासाठी रु. ४ लाख देणगी देणाऱ्या दात्याचे नाव आम्ही सदर कक्षाला देणार आहोत. वाचनाची संस्कृती टिकावी. नव्या तंत्रज्ञानाची जोड देवून इथे स्पर्धा परीक्षांसाठी मार्गदर्शन केंद्र सुरु व्हावे. नवोदित कवी, लेखकांना व्यासपीठ मिळावे. गुहागर तालुकासियांना विविध प्रकारचे साहित्य उपलब्ध व्हावे. यासाठी तळमळीने आम्ही काम करत आहोत. या कार्याला आर्थिकदृष्ट्या सबळ असलेल्या ग्रामस्थांनी, संस्थांनी, साहित्यप्रेमींनी मदत करावी. असे आवाहन राजेंद्र आरेकर यांनी केले आहे.
ज्ञानरश्मी वाचनालयाच्या खात्याचा तपशील पुढीलप्रमाणे आहे.
Account Name : Sarv. DnyanRashami Vachanalay
Bank of India, Guhagar Branch
Account No. : 140110100003779
IFSC Code : BKID 0001401