ज्ञानरश्मी वाचनालयाच्या डॉ. तानाजीराव चोरगे सभागृहाचे उद्घाटन
गुहागर, ता. 18 : शहरातील ज्ञानरश्मी वाचनालयाच्या बहुउद्देशिय सभागृहाचे नामकरण आणि तैलचित्र अनावरण समारंभ रविवार, 21 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 5 वा. होणार आहे. या निमित्ताने पानिपतकार विश्र्वास पाटील, ज्येष्ठ साहित्यिक डॉ. तानाजीराव चोरगे, इतिहास संशोधक प्रकाश देशपांडे, भाषांचे अभ्यासक, कवी, समीक्षक अरुणजी इंगवले हे मान्यवर उपस्थित रहाणार आहेत. या सर्वांचे विचार ऐकण्याची संधी गुहागर तालुक्यातील साहित्यप्रेमींना मिळणार आहे.
शहरातील ज्ञानरश्मी वाचनालयाच्या बहुउद्देशिय सभागृहाला कोकणातील ज्येष्ठ विचारवंत, साहित्यिक, सहकार क्षेत्राला नवी दिशा देणारे डॉ. तानाजीराव चोरगे यांचे नाव देण्यात आले आहे. या सभागृहाचे उद्घाटन पानिपतकार विश्र्वास पाटील यांच्या हस्ते होणार आहे. रविवार, 21 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 5 वा. हा कार्यक्रम होणार आहे. अशी माहिती ज्ञानरश्मी वाचनालयाचे अध्यक्ष राजेद्र आरेकर यांनी दिली.
ज्ञानरश्मी वाचनालयाच्या नूतन इमारतीचे उद्घाटन आणि लोकार्पण सोहळा 26 जानेवारी 2021 रोजी पार पडला. वाचनालयाच्या पहिल्या मजल्यावर सुमारे 200 नागरिक बसू शकतील असे सभागृह आहे. साहित्याशी निगडीत विविध कार्यक्रम घेण्यासाठी हे सभागृह उपयोगी ठरणार आहे. या सभागृहाला कोकणातील कृषी, तंत्र सहकार, क्रीडा, अभिनय, शिक्षण, समाजकारण अशा अनेक क्षेत्रात ठसा उमटविणारे डॉ. तानाजीराव चोरगे यांचे नाव देण्यात आले आहे. सभागृहामध्ये डॉ. तानाजीराव चोरगे यांचे तैलचित्र लावण्यात येणार आहे.
हा कार्यक्रम रविवार, 21 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 5 वा. ज्ञानरश्मी वाचनालयात होणार आहे. पानिपतकार म्हणून परिचित असलेले विश्र्वास पाटील यांच्या हस्ते सभागृहाचे नामकरण आणि तैलचित्र अनावरण करण्यात येणार आहे. या निमित्ताने तालुकावासियांना पानिपतकार विश्र्वास पाटील यांचे विचार ऐकण्याची संधी मिळणार आहे.
या समारंभाचे अध्यक्ष स्थानी महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणेचे कार्याध्यक्ष मिलिंद जोशी, ज्येष्ठ साहित्यिक आणि रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष डॉ. तानाजीराव चोरगे, चिपळूणच्या लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिरचे कार्याध्यक्ष प्रकाश देशपांडे, भाषांचे अभ्यासक, कवी, समीक्षक अरुणजी इंगवले हे मान्यवर उपस्थित रहाणार आहेत.
वाचनालयाच्या सभागृहाच्या उद्घाटनाच्या निमित्ताने गुहागर तालुक्यातील साहित्यप्रेंमीना छोटेखानी साहित्य संमेलनच अनुभवता येणार आहे. त्यामुळे या कार्यक्रमाला सर्वांनी उपस्थित रहावे असे आवाहन ज्ञानरश्मी वाचनालयाचे अध्यक्ष राजेद्र आरेकर यांनी केले आहे.