16 गावांमध्ये सरपंच, उपसरपंच निवडले गेले, गिमवीत नाट्यपूर्ण घडामोड
गुहागर : तालुक्यातील रानवी, पडवे, शिर, अडूर, कोंडकारुळ, वेळणेश्र्वर, साखरीबुद्रक, तळवली, पेवे, नरवण, कोळवली, मळण, उमराठ, शिवणे, जामसुद आणि गिमवी या 16 ग्रामपंचायतींमध्ये सरपंच, उपसरपंच निवडीची प्रक्रिया आज पार पडली. गुहागर न्युजने वर्तविलेले बहुतांशी अंदाज आज खरे ठरले.
वेळणेश्र्वरमध्ये ग्रामपंचायत निवडणुकी दरम्यान गावाची कोअर कमिटी बनविण्यात आली आहे. ही कमिटी देईल तो निर्णय पुढील पाच वर्ष बिनविरोध निवडून आलेल्या सदस्यांना मानावा लागणार आहे. या कमिटीने वेळणेश्र्वरच्या सरपंच पदासाठी चैतन्य धोपावकर आणि उपसरपंच पदासाठी अमोल जामसुतकर अशी नावे सुचविली. स्वाभाविकपणे हे दोन्ही उमेदवार निवडून आले.


मळण ग्रामपंचायतीमध्ये बिनविरोध निवडून आलेले शिवसेनेचे नारायण पांडुरंग गुरव सरपंचपदी तर राष्ट्रवादीचे कार्यकर्ते रमाकांत गंगाराम सोलकर उपसरपंच पदी बिनविरोध निवड झाली. पेवे ग्रामस्थांनी यावर्षी बिनविरोध निवडणूक केली. सरपंच, उपसरपंच पदाची निवडणूकही बिनविरोध झाली. यामध्ये भारती भिकाजी सावरटकर यांच्याकडे सरपंच पद आणि किशोर चिवेलकर यांच्याकडे उपसरपंच पद सोपविण्यात आले. अडूर ग्रामपंचायतीची निवडणूक अटीतटीची झाली. यामध्ये माजी उपसभापती पांडुरंग कापले यांनी उभ्या केलेल्या पॅनेलला बहुमत मिळाले. येथे सरपंच पदी शैलजा हरिचंद्र गुरव तर उपसरपंच पदी उमेश मधुसुदन आरस यांची बिनविरोध निवड करण्यात आली.


वेळणेश्र्वरप्रमाणेच तळवलीमध्ये ग्रामविकास आघाडीच्या प्रमुख मंडळींनी निश्चित केलेल्या मयुरी महेश शिगवण सरपंच म्हणून तर अनंत गंगाराम डावल उपसरपंच पदी बिनविरोध निवडून आले. कोंडकारुळ ग्रामपंचायतीमध्ये 8 सदस्य गावाने बिनविरोध निवडून आणले. त्याच्यापैकी निलिमा प्रताप अडूरकर सरपंच पदी तर साठी अशोक सोमा अडूरकर उपसरपंच पदी बिनविरोध निवड झाली.


उमराठमध्ये स्थापनेपासून ग्रामपंचायतीची निवडणूक बिनविरोध करण्याची परंपरा आहे. येथील सरपंच, उपसरपंच पदाची निवडणूक बिनविरोध झाली. जनार्दन पांडुरंग आंबेकर यांच्याकडे सरपंच तर सुरज अरुण घाडे उपसरपंच पदाची जबाबदारी गावाने सोपविली आहे.
जामसुद ग्रामपंचायतीची निवडणूक शेवटच्या क्षणाला बिनविरोध झाली होती. त्याचे पडसाद सरपंच, उपसरपंच पदाच्या निवडणुकीतही उमटणार अशी शक्यता वर्तविली जात होती. कारण आरक्षण सर्वसाधारण प्रवर्गासाठी पडल्याने एका समाजातील दोन सदस्य इच्छुक होते. या समाजात एकमत न झाल्याने अखेर गावाने हा निर्णय ग्रामपंचायत सदस्यांवर सोडला. 7 ग्रामपंचायत सदस्यांपैकी संतोष यशवंत तथा बाबु सावंत, महेश यशवंत जामसुतकर, सुचिता सुनिल गमरे, प्रज्ञा प्रभाकर कुंभार आणि सृष्टी वैभव रेवाळे यांनी ग्रामपंचायत सदस्य म्हणून आवश्यक असणारी सर्व प्रक्रिया एकत्र पूर्ण केली होती. त्यामुळे हे 5 सदस्य सरपंच, उपसरपंच पदाच्या निवडीत एकत्र आले. त्यांनी सरपंच म्हणून संतोष तथा बाबु सावंत यांना व उपसरपंच म्हणून सृष्टी वैभव रेवाळे यांना उमेदवारी अर्ज भरण्यास सांगितले. स्वाभाविकपणे या दोघांची बिनविरोध निवड झाली.
गिमवीमध्ये सरपंच, उपसरपंच पदाच्या निवडीत नाट्यपूर्ण घडामोडी घडल्या. त्याची स्वतंत्र बातमी वाचण्यासाठी गिमवी या लाल रंगातील अक्षरांवर क्लिक करा.
(रानवी, पडवे, शिर, साखरीबुद्रक, नरवण, कोळवली, शिवणे या ग्रामपंचायतींमध्ये सरपंच, उपसरपंच पदी कोण स्थानापन्न झाले याची अधिकृत माहिती अजूनपर्यंत हाती आलेली नाही.)