दगडोबा येथील घटना, वाहनातील सर्वजण सुखरुप
गुहागर, ता. 10 : तालुक्यातील पाटपन्हाळे येथे महामार्गावरील दगडोबा स्थानाजवळील दुभाजकावर बुधवारी (ता. 10) सकाळी 6.30 च्या दरम्यान चारचाकी वाहन आपटले. अपघाताची तिव्रता मोठी असूनही वाहनांमधील पाचही जण वाचले आहेत. या अपघाताची नोंद गुहागर पोलीस ठाण्यामध्ये वाहन मालक विजय शांताराम दणदणे राहणार मुंबई गोरेगाव यांनी केली आहे. Car Accident in Patpanhale
अपघाताची भिषणता पहाण्यासाठी बातमी खालील व्हिडिओ जरुर पहा.

पोलीस ठाण्यातील नोंदीप्रमाणे विजय दणदणे हे मुंबईहून मंगळवारी (ता. 9) रात्री दहा वाजता आपल्या मालकीची चारचाकी (एम एच 47 एन 0728) घेऊन गुहागर तालुक्यातील अडूर पड्याळवाडीला येण्यासाठी निघाले. बुधवारी (ता. 10) सकाळी साडेसहा वाजताच्या दरम्यान गुहागर विजापूर या राष्ट्रीय महामार्गावर शृंगारतळी सोडल्यानंतर पाटपन्हाळे येथील दगडोबा जवळ ते पोचले. येथे महामार्गाचे एक दिशा मार्ग असलेले दोन स्वतंत्र रस्ते आहेत. ते समजण्यासाठी दुभाजक बसविण्यात आले आहेत. याठिकाणी वाहन आले असता समोरुन येणाऱ्या बैलाला वाचवताना विजय दणदणे यांचे वाहन दुभाजकावर आदळले. ही धडक इतकी भिषण होती की दुभाजकाचा पन्हळी पत्रा थेट वाहनात घुसला. परंतु सुदैवाने वाहनातून प्रवास करणारे विजय दणदणे, राजेश शांताराम दणदणे, सौ विजया विजय दणदणे, प्रज्ञा विजय दणदणे, नाना रूपा हळये असे पाचही जण या अपघातापासून सुखरूप वाचले आहेत. गुहागर पोलीस ठाण्यामध्ये सदर अपघाताची नोंद करण्यात आली असून अधिक तपास सहाय्यक पोलीस फौजदार प्रमोद मोहिते करत आहेत.

