आरेगावातील घटना, रामनवमीच्या उत्सवावर पसरली शोककळा
गुहागर, ता. 31 : रामनवमीच्या दिवशी आरे वाकी पिंपळवट ग्रामपंचायतीच्या माजी सदस्या प्राजक्ता देवकर (वय 49) यांनी गळफास लावून आत्महत्या केली. अचानक घडलेल्या या घटनेमुळे आरेगावातील श्रीराम मंदिरात सुरु असलेल्या रामनवमीच्या उत्सवावर शोककळा पसरली. सायंकाळनंतरचे सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले. शुक्रवारी (ता. 31) शवविच्छेदन झाल्यानंतर प्राजक्ता देवकर यांचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. Suicide in Aregaon

प्राजक्ता देवकर या अल्पशा आजाराने गेले काही महिने आजारी होत्या. त्याचप्रमाणे त्या आर्थिक संकटातही होत्या. रामनवमीच्या दिवशी सकाळी गावातील एका महिलांच्या सभेला त्या गेल्या होत्या. तेथून घरी आल्यावर त्यांनी दुपारी 12 ते सायंकाळी 6 च्या दरम्यान रहात्या घरात दोरीने गळफास लावून आत्महत्या (Suicide in Aregaon) केली. घरातील मंडळींच्या ही गोष्ट लक्षात आल्यावर गावात उत्सव सुरु असल्याने लवकर अंत्यसंस्कार उरकण्याची तयारी सुरु केली. मात्र गावचे पोलीस पाटील मिलिंद सुर्वे यांनी ही आत्महत्या असल्याने पोलीस येईपर्यंत थांबा. अशी विनंती ग्रामस्थांना केली.

घटनेचे गांभिर्य लक्षात घेवून गुहागर पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक तुषार पाचपुते आपल्या सहकाऱ्यांसह घटनास्थळी पोचले. भविष्यात अडचणी येवू नयेत म्हणून आपण कायदेशीर प्रक्रिया पार पाडूया अशी विनंती ग्रामस्थांना केली. ही विनंती ग्रामस्थांनी मान्य केल्यावर प्राजक्ता देवकर यांचा मृतदेह पोलीसांनी ताब्यात घेतला व शवविच्छेदनासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र चिखली येथे पाठवला. शुक्रवारी (ता. 31) सकाळी 10.30 वा. शवविच्छेदन झाल्यानंतर प्राजक्ता देवकर यांचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. त्यानंतर आरेगावातील स्मशानभुमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. या घटनेचा पुढील तपास सहाय्यक पोलीस उप निरीक्षक पवन कांबळे करत आहेत. Suicide in Aregaon
दरम्यान आरेगावातील श्रीराम मंदिरात रामनवमीच्या निमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. रात्री नाटकही होणार होते. ही घटना समजताच श्रीराम मंदिरातील सर्व कार्यक्रम रदद करण्यात आले.
प्राजक्ता देवकर 7 वर्ष ग्रामपंचायतीच्या सदस्य होत्या. गावातील कोणत्याही घरात कोणत्याही कार्यक्रमाचे निमंत्रण मिळाल्यावर हजर राहून त्या घरातील कुटुंबाला मदत करणाऱ्या ग्रामपंचायत सदस्य म्हणून त्यांची ओळख होती. त्यामुळे त्याच्या मृत्यूने संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे. त्यांच्या पश्चात दोन मुलगे, एक मुलगी असा परिवार आहे. Suicide in Aregaon
