14 मार्चला मोर्चाचे नियोजन, सर्व संघटनांचा निर्णय
Guhagar News, ता. 14 : तालुक्यातील सर्व शासकीय, निमशासकीय कर्मचारी संपात सहभागी होणार आहेत. 13 मार्चला सायंकाळी सर्व शासकीय, निमशासकीय, शिक्षक, शिक्षकेतर, नगरपंचायत व अंशकालीन कंत्राटी रोजंदारी कर्मचाऱ्यांच्या संघटनांची एक संयुक्त सभा पार पडली. यामध्ये 14 मार्चला सकाळी गुहागर शहरात मोर्चा काढुन गटविकास अधिकारी व तहसीलदार यांना निवेदन देण्याचे नियोजन करण्यात आले. Govt. Employees On Strike

एनपीएस योजना रद्द करुन सर्वांना जुनी पेन्शन योजना लागू करावी. या मागणीसाठी राज्य सरकारबरोबर गेली दोन वर्ष चर्चा सुरु आहे. मात्र या चर्चेतून सकारात्मक निर्णय झाला नाही. त्यामुळे शासकीय, निमशासकीय, शिक्षक, शिक्षकेतर, महानगरपालिका, नगरपालिका, नगरपरिषद, नगरपंचायत व अंशकालीन कंत्राटी रोजंदारी कर्मचारी समन्वय समिती महाराष्ट्र राज्य तर्फे 14 मार्चपासून बेमुदत संपाची हाक देण्यात आली. या निर्णयाच्या पार्श्र्वभुमीवर सोमवारी (13 मार्चला) सायंकाळी शासकीय विश्रामगृह, गुहागर येथे तालुक्यातील विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. या बैठकीमध्ये महाराष्ट्र राज्याच्या समन्वय समितीच्या बेमुदत संपाला 100 टक्के पाठींबा देण्याचा निर्णय घेण्यात आला. त्याचप्रमाणे मंगळवारी, 14 मार्चला तालुक्यातील सर्व कर्मचाऱ्यांचा मोर्चा काढण्याचे ठरविण्यात आले. हा मोर्चा मंगळवारी, 14 मार्चला सकाळी 10.30 वा. पंचायत समिती गुहागरमधुन सुरु होईल. मोर्चाच्या सुरवातीला गटविकास अधिकारी, गुहागर यांना निवेदन दिले जाईल. मोर्चेकऱ्यांसमोर काही संघटनांचे पदाधिकारी संपाची आवश्यकता, आधी झालेले प्रयत्न याबाबत मनोगत व्यक्त करतील. त्यानंतर पंचायत समिती पासून मोर्चाची सुरुवात होईल. तहसिलदार कार्यालय गुहागर येथे मोर्चा आल्यावर तहसीलदारांना निवेदन दिले जाईल. त्याच ठिकाणी मोर्च्याची सांगता होणार आहे. Govt. Employees On Strike
मोर्चामध्ये, संपामध्ये सहभागी असणारे सर्व शंभर टक्के कर्मचारी कसे हजर राहतील त्यासंबंधीचे नियोजन संबंधित घटक संघटनांनी केले आहे. सदर संप यशस्वी करण्यासाठी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन गुहागर तालुका सर्व सरकारी निमसरकारी शिक्षक शिक्षकेतर नगरपंचायत व अंशकालीन कंत्राटी रोजंदारी कर्मचारी समन्वय समितीच्या वतीने करण्यात आले आहे. Govt. Employees On Strike
