आसमंत फाउंडेशन; शाळा, महाविद्यालयांचा सकारात्मक प्रतिसाद
रत्नागिरी, ता. 13 : येथे प्रथमच होणाऱ्या सागर महोत्सवाची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. व्याख्याने, लघुपट यासह वाळूशिल्प प्रदर्शन, खडकाळ समुद्रकिनारे व खारफुटी जंगलाची अभ्यासपूर्ण सफर असे विविध कार्यक्रम या महोत्सवात होणार आहे. मुख्य कार्यक्रम गोगटे-जोगळेकर महाविद्यालयात होणार आहे. यातील सर्व कार्यक्रम विनामूल्य आहेत. या महोत्सवाकरिता शाळा, महाविद्यालयांतून सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. Sagar Festival in Ratnagiri
आसमंत बेनेवोलन्स फाउंडेशन आणि किर्लोस्कर वसुंधरा, इकॉलॉजीकल सोसायटी आणि विवांत अनटेम्ड फौंडेशन या सहयोगी संस्थांनी प्रथमच सागर महोत्सवाचे आयोजन केले आहे. महोत्सवाचे उद्गाटन शुक्रवारी (ता. १३) सकाळी ९ वाजता गोगटे-जोगळेकर महाविद्यालयात गोव्याचे नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओशनोग्राफीचे संचालक डॉ. सिंग यांच्या हस्ते करण्यात आले. या महोत्सवातून रत्नागिरीतील विद्यार्थी, नागरिकांना बरीच माहिती मिळणार आहे. त्यामुळे या पहिल्याच महोत्सवाबाबत अनेकांना उत्सुकता आहे. Sagar Festival in Ratnagiri
सागर महोत्सव १३ व १४ जानेवारी २०२३ आणि २१ व २२ जानेवारी २०२३ या चार दिवशी होणार आहे. १३ ला सायंकाळी ४ वाजता आंतरभरती क्षेत्राती जैवविविधता यावर डॉ. अमृता भावे व्याख्यान देतील. महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी (ता. १४) सकाळी ९.३० ते दुपारी १२.३० या वेळेत माहितीपट दाखवण्यात येतील. १२.३० ला शाश्वत मासेमारी या विषयावर डॉ. केतन चौधरी यांचे व्याख्यान होईल. दुपारी २.३० वाजता मानवजातीच्या भविष्यासाठी महासागर या विषयावर डॉ. समीर दामरे, दुपारी ३.३० वाजता स्थानिक पक्षी या विषयावर प्रसाद गोखले व विराज आठल्ये व्याख्यान देतील. ४.३० वाजता व्याख्याने आणि माहितीपटांवर प्रश्नमंजुषा होईल. Sagar Festival in Ratnagiri

या महोत्सवाचा दुसरा टप्पा २१ आणि २२ जानेवारीला होणार आहे. २१ ला सकाळी ६.३० ते ९.३० या वेळेत भाट्ये किनाऱ्याची पायी सैर घडवण्यात येणार आहे. या वेळी प्रदीप पाताडे, अमृता भावे मार्गदर्शन करतील. ७ ते ९.३० या वेळेत कर्ला येथील कांदळवन सफर हेमंत कारखानीस, संतोष तोसकर व संजीव लिमये घडवतील. यासाठी पूर्वनोंदणी आवश्यक आहे. दुपारी ३ ते सायंकाळी ६ या वेळेत पेठकिल्ला ते मांडवी येथील खडकाळ समुद्रकिनाऱ्याची सफर प्रदीप पाताडे व अमृता भावे घडवतील. सायंकाळी ६.३० वाजता वाळूशिल्प भाट्ये किनाऱ्यावर पाहता येतील. यासंबंधी अधिक माहितीसाठी आसमंत बेनेवोलन्स फाउंडेशनचे प्रमुख नंदकुमार पटवर्धन मो. नं. 9970056523 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन केले आहे. Sagar Festival in Ratnagiri

