आमदार जाधवांचे वर्चस्व कायम, मनसेचा चंचुप्रवेश
गुहागर, ता. 20 : आज झालेल्या निवडणुकीने पुन्हा एकदा आमदार भास्कर जाधव यांचे गुहागर तालुक्यावर वर्चस्व असल्याचे सिध्द केले आहे. महाविकास आघाडी म्हणून निवडणुका लढविल्या असे चित्र दाखवले गेले असले तरी प्रत्यक्षात या निवडणुकीत राष्ट्रवादीचा प्रभाव कुठेच दिसून आला नाही. राज्यात शिंदे फडणवीस सरकार आल्यानंतरही डबल इंजिन सरकार गुहागरमध्ये प्रभावहीन (Double engine government ineffective in Guhagar) असल्याचेच समोर आले. त्याचवेळी ग्रामपंचायत निवडणुकांची संधी साधुन गुहागरच्या राजकारणात मनसेनेही चंचुप्रवेश केल्याचे समोर येत आहे.
राष्ट्रवादीसाठी चिंता
21 ग्रामपंचायतींपैकी 15 ग्रामपंचायतींवर उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचा झेंडा रोवण्यात आमदार भास्कर जाधव (MLA Bhaskar Jadhav) आणि शिवसैनिक यशस्वी झाले. महाविकास आघाडी (Mahavikas Aaghadi) म्हणून निवडणुकीला सामोरे जात असताना मित्रपक्षांनी स्वारस्यच दाखविले नाही. हे आमदार जाधव यांनीच जाहीर केले. आज निकालांमध्येही त्याचेच प्रतिबिंब उमटले. एकेकाळी गुहागर तालुक्यात दबदबा असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) हाताला एकही ग्रामपंचायत लागली नाही. हे नुकसान राष्ट्रवादीसाठी चिंता करणारे असले तरी स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या हाती काहीही नाही. खासदार सुनील तटकरे (MP Sunil Tatkare) यांच्यासमोर हे दु:ख येथील कार्यकर्त्यांनी बोलून दाखवले. मात्र भविष्यातील समीकरणांचा विचार करता आपल्याला महाविकास आघाडी म्हणूनच लढावे लागेल असे सांगत कार्यकर्त्यांना शांत केले होते. (Double engine government ineffective in Guhagar)

Double engine government ineffective in Guhagar
राज्यात सत्तांतर झाल्यानंतर गुहागरमध्ये भाजपसोबत बाळासाहेबांची शिवसेना (BJP + Shinde Sena) होती. दोन्ही पक्ष समन्वयाने या निवडणुकीला सामोरे गेले. तरीही 21 पैकी केवळ 4 ग्रामपंचायतींवर भाजपला वर्चस्व मिळवता आले. त्याचवेळी आरे वाकी पिंपळवट, हेदवी या दोन ग्रामपंचायती भाजपच्या हातातून निसटल्या हे देखील महत्त्वाचे आहे. आगामी काळात जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि गुहागर नगरपंचायत या निवडणुका पक्षाच्या चिन्हावर लढवल्या जाणार आहेत. आज झाकली मुठ सव्वा लाखाची म्हणत भाजप-शिंदे सेना युतीचे कार्यकर्ते शांत राहीले तरी या निवडणुकांमध्ये पुन्हा एकदा या पक्षांचा प्रभाव किती हे समोर येईल. तोपर्यंत कालावधीत डबल इंजिनचे बळ गुहागरमधील कार्यकर्त्यांना मिळणार का हे पहावे लागेल. हे बळ मिळाले नाही तर 2009 पासून सुरु असलेला सिलसिला प्रत्येक निवडणुकीत पहायला मिळेल.
मनसेचा चंचुप्रवेश
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या स्थापनेपासून गुहागरमध्ये पक्ष संघटना रुजविण्याचे काम सुरु झाले. गुहागरमधील हॉटेल व्यावसायिक राजेश शेटे यांनी मनसेसाठी खूप मेहनत घेतली. त्यांच्यानंतरही मनसेचे सर्व पदाधिकारी पक्षवाढीसाठी काम करत आहेत. पक्ष नवा असल्याने सातत्याने मिळणारे अपयश, मोठ्या पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून होणारी चेष्टा, अवहेलना सहन करत मनसैनिक निष्ठेने उभे रहात आहेत. मागील (2019) विधानसभा निवडणुकीत मनसेचे उमेदवार गणेश कदम यांनी चिखलीत प्रचार कार्यालय सुरु केले होते. आता शृंगारतळीत संपर्क कार्यालय सुरु झाले आहे. काही गावांमधुन शाखा कार्यालये उघडण्यात आली आहेत. नव मतदार हे मनसेचे मुख्य लक्ष्य आहे. वेगवेगळे उपक्रम, आंदोलने यातून युवक वर्ग मनसेशी जोडला जात आहे. अशा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला (MNS) राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या गुहागर दौऱ्याने निश्चितच बळ दिले. कौंढर काळसुर आणि जानवळे या दोन ग्रामपंचायतींमध्ये भाजप पुरस्कृत पॅनेलबरोबर लढताना मनसेचे ग्रामपंचायत सदस्य निवडून आले आहेत. तालुक्यातील अन्य ग्रामपंचायतींमध्येही काही सदस्य मनसेचे प्रतिनिधीत्व करतात. त्यामुळे गुहागर तालुक्यात मनसे हळुहळु हातपाय पसरत आहे. पक्ष म्हणून हे कौतुकास्पद आहे. (Double engine government ineffective in Guhagar)

राजकीय पक्षांच्या स्थितीबरोबरच समाज म्हणून होणार प्रचार देखील प्रभावशाली होत आहे. या निवडणुकीत गावाच्या विकासाबरोबरच समाजाच्या उमेदवाराला निवडून द्या असा प्रचार सामाजिक माध्यमांमधून केला गेला. त्याचा परिणामही मतदानावर विशेषत: सरपंच पदाच्या निवडणुकीवर झाला. पाटपन्हाळेमधील विजय तेलगडेंचा विजय हे त्याचे मोठे उदाहरण आहे. (Double engine government ineffective in Guhagar)

