गुहागर, ता.30 : सुमारे पंचवीस, तीसपेक्षा जास्त गुरे, वासरे, डझनभर कुत्री, मांजरे यांना आयुष्यभर पोसून त्यांना जिवापाड जपणारा व सांभाळणारा एक अवलिया तलाठी नुकताच निवर्तला. त्याच्या जाण्याने अन्य कुणीही पोरके झाले नसले. तरी घरात असलेले एवढे पाळीव प्राणी मात्र आता अनाथ झाले आहेत. Talathi Kisan No More

किसन गंगाराम उर्फ केजी असे या अनोख्या माणसाचे नाव आहे. नुकतेच त्याचे देहावसान झाले. ते ६७ वर्षांचे होते. पाटपन्हाळे हायस्कूल मधून अकरावी पास हा विद्यार्थी पहिल्या पासूनच एकाकी जीवन जगत होता. शाळेत इतर मुलांमध्ये न मिसळणे, मस्ती नाही, विनोद नाही, शाळा सुटल्यानंतर चार किलोमिटर दूर असलेल्या घरी सर्वांच्या आधी परतलेला असायचा. मॅट्रिक झाल्यानंतर तो तलाठी म्हणून रुजू झाला. अनेक गावच्या तलाठी सजावर त्यांनी काम केले. पहिल्या पासूनच गुरे, कुत्री, मांजरे यांचा सांभाळ करण्याचा शौक होता. या पाळीव प्राण्यांचे व तलाठी भाऊंचे नातेच अजबच ! त्यांनी जीवनात या पाळीव प्राण्यांना मोठे स्थान दिले होते. हाच त्यांचा परिवार होता. कुटुंब होते. Talathi Kisan No More

त्यांचेकडे गाई, वासरे, धष्टपुष्ट बैल अशी वीसएक जनावरे होती. परंतू दुधाळ गायीचे एक कप दूध त्याने आपल्या चहात घातले नाही. ते दूध वासरांचे आहे. त्यावर त्यांचाच अधिकार असे ते म्हणायचे. अशी धष्टपुष्ट गुरे विकत घेण्यासाठी भाऊना अनेकजण गळ घालायचे. सजावर काम करत असताना गावात रस्त्याने चालत जाताना त्यांचासोबत वीसएक कुत्री जमायची. मग एखाद्या दुकानातून दोनतीन बिस्किट पुडे घेउन भाऊ त्यांना खाऊ घालायचे. त्यांच्या त्या पशु प्रेमाचा परिणाम त्यांच्या कामावर व्हायचा. अनेक तक्रारी व्हायच्या. दफ्तर तपासणीत या चुका पुढे यायच्या. मग ऑफिसच्या साहेबांची बोलणी ऐकून घ्यावी लागायची. अख्खा पगार या गुराढोरांच्या सांभाळण्यात खर्च व्हायचा. जमाबंदी व इतर कार्यालयीन पैसे ही खर्च व्हायचे. मग पैसे भरण्यासाठी आणखी कर्ज काढायचे. असा त्यांचा” प्रपंच” सुरु असायचा. असा हा अवलीया तलाठी भाऊ नुकताच गेला. त्याच्या जाण्याने घरातली सर्व गुरेढोरे, कुत्री, मांजरे पोरकी झालीत. Talathi Kisan No More
