महिला बालकल्याणचे पाठपुराव्याकडे दुर्लक्ष व महाबँकेचा ढिसाळ कारभार
गुहागर : तालुक्यातील 15 अंगणवाड्यांना पोषण आहार पुरविणाऱ्या महिला बचतगटांचे पैसे गेल्या सव्वा वर्षात देण्यात आलेले नाहीत. या पैशांचा डि.डि. गुहागरच्या महिला व बालकल्याण विभागाने मार्च महिन्यात काढला. मात्र र्बंक ऑफ महाराष्ट्र शाखा हेदवीतून तो वठवलाच गेला नाही. बँकेचा ढिसाळ कारभार आणि महिला बालकल्याणच्या पर्यवेक्षकाचे दुर्लक्ष यामुळे पोषण आहार पुरवणाऱ्या महिलांचे पैसे थकले आहेत.
गुहागर तालुक्यात 235 अंगणवाड्या आहेत. या अंगणवाड्यांमदील 3 ते 6 वयोगटातील मुलांना पोषण आहार दिला जातो. हा पोषण आहार बनविणाऱ्या महिला बचतगटांना प्रति विद्यार्थी प्रति दिन 8.00 रुपये मिळतात. हे मानधन महिला बचतगटांच्या खात्यात थेट जमा होते. गुहागर तालुक्यातील 220 अंगणवाड्यांचे मानधन मार्च महिन्यात बचतगटांच्या खात्यात जमा झाले. मात्र हेदवी बीट मधील 15 अंगणवाड्यांचे जुन 2019 ते फेब्रुवारी 2020 या 9 महिन्यांचे पोषण आहाराचे मानधन रु. 20 हजार अद्याप त्यांना मिळालेले नाही.
याबाबत या महिला सातत्याने पाठपुरावा करत होत्या. त्यांना महिला व बालकल्याण विभागातील पर्यवेक्षक सुरवातीला माहिती देत होते. मात्र मे महिन्यानंतर पर्यवेक्षक त्यांना टाळू लागले. पत्रकारांना देखील पर्यवेक्षकांनी उडवाउडवीची उत्तरे दिली.
अखेर हा विषय पत्रकारांनी नवे गटविकास अधिकारी डॉ. अमोल भोसले यांच्यापर्यंत नेला. तेव्हा पर्यवेक्षक पवार यांनी सांगितले की, मार्च महिन्यात सर्वांसोबत 15 अंगणवाड्यांच्या मानधनाचा डि.डि. महिला व बालकल्याण विभागाने काढला. उर्वरित पैसे जमा झाले. मात्र बँक ऑफ महाराष्ट्र शाखा हेदवीकडून याबाबत योग्य उत्तरे मिळत नाहीत. एकदा हेदवी शाखेने हा डि.डि. चिपळूण शाखेत क्लिअरींगला पाठवल्याचे सांगितले. तर दुसऱ्या वेळी रत्नागिरी ऑफीसमध्ये पाठवल्याचे सांगण्यात येत आहे. त्यावर डॉ. भोसले यांनी पर्यवेक्षक पवारांना तातडीने लेखी पत्र घेवून बँकेकडे पाठपुरावा करण्यास सांगितले आहे.
या संदर्भात हेदवी बँकेत विचारणा केली असता तो डि.डि.चे पैसे आमच्याकडे पोचले नसल्याचे उत्तर मिळाले. लॉकडाऊनमुळे सर्व सेवा ठप्प असल्याने हा डि.डि. बँक कर्मचाऱ्यांच्या हातून गहाळ झाल्याची शक्यता आहे. मात्र ही वस्तुस्थिती बँक लपवून ठेवत आहे. बँकेच्या या ढिसाळ कारभारामुळे बचतगट मात्र आर्थिक कोंडीत सापडले आहेत. मार्च महिन्यात लॉकडाऊन सुरु झाल्यापासून अंगणवाड्या बंद झाल्या. त्यामुळे पोषण आहारावर आर्थिकदृष्ट्या सक्षम होणाऱ्या महिलांचा अर्थार्जनाचा स्रोतच बंद झाला.