गुहागर, ता. 7 : रत्नागिरी रिफायनरी ॲण्ड पेट्रोकेमिकल्स हा प्रकल्प राजापूर तालुक्यातून पुन्हा एकदा गुहागरला आणण्याच्या चर्चा सुरु झाल्या आहेत. बेरोजगार तरुण रिफायनरीला अनुकुल आहेत तर सर्व राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी कोणतीही प्रतिक्रिया न देता सावध भूमिका घेतली आहे.
रत्नागिरी रिफायनरी ॲण्ड पेट्रोकेमिकल्स प्रकल्प राजापुरात होणार नाही हे नक्की असून कंपनीची अनुकुलता असेल आणि स्थानिकांची मागणी असेल तर हा प्रकल्प गुहागरमध्ये झाला तरी चालेल अशी भूमिका खासदार विनायक राऊत यांनी घेतली. त्यानंतर गुहागरमध्ये या प्रकल्पाबाबत चर्चा सुरु झाली.
तालुक्यातील तरुणांना वाटते की प्रकल्प गुहागरमध्ये आला तर येथील रोजगार वाढेल. अभियांत्रिकी महाविद्यालयात शिकणारा ओंकार वर्धमान म्हणतो की, इंटरनेटवरुन मिळालेल्या माहितीनुसार ही देशातील सर्वात मोठी ग्रीन रिफायनरी आहे. म्हणजे प्रदुषणाची जागतिक मानांकने येथे पाळली जातील. मग अशा प्रकल्पामुळे हजारो तरुणांना रोजगार मिळणार असेल तर विरोध का करायचा. शास्त्र (रसायनशास्त्र) शाखेतून पदवीधर झालेला दाभोळचा प्रविण सावंत म्हणतो की, रत्नागिरी रिफायनरीमुळे येथील रोजगार आणि उद्योगांना चालना मिळणार आहे. आज शास्त्र शाखेचा पदवीधर असून मला इस्त्रीचे दुकान चालवावे लागते. जर हा प्रकल्प आला तर माझ्या शिक्षणाचा मला फायदा होईल.
मात्र राजकीय पदाधिकाऱ्यांची सावध भुमिका आहे. भाजपचे तालुकाध्यक्ष नीलेश सुर्वे म्हणाले की, आज सत्तेत असलेल्या पक्षांनी याबाबत निर्णय घ्यायचा आहे. केवळ माध्यमांमधुन येणाऱ्या बातम्यावरुन मी रिफायनरीबाबत बोलु शकत नाही. शिवसेनेच तालुकाप्रमुख म्हणाले की, राजापुरमध्ये रिफायनरीबाबत पक्षाची असलेली भुमिका सर्वांनाच माहिती आहे. उद्या गुहागरमध्ये प्रकल्प येणार असेल तर आम्हाला आधी विचारले जाईल. त्यावेळी सर्वांशी चर्चा करुन आमची मते पक्षाकडे मांडू.
रत्नागिरी रिफायनरी म्हणजे ज्या प्रकल्पाची चर्चा नाणार प्रकल्प म्हणून होते हा प्रकल्प सुरवातीला गुहागर तालुक्यातील भातगांव, तवसाळ पट्ट्यात होणार होता. याचे सुतोवाच तत्कालिन खासदार अनंत गीते यांनी केले होते. तेव्हा या प्रकल्पाला स्थानिकांनी विरोध केला. मात्र तांत्रिक कारणांमुळे या प्रकल्पासाठी राजापुर तालुका निवडण्यात आला.