रक्तदान शिबिराने केला वाढदिवस साजरा
भारतीय जनता पार्टी गुहागर तालुका सरचिटणीस सचिन ओक यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून राजा हिंदुस्थानी कला क्रिडा व सांस्कृतिक मंडळ उदमेवाडी कोतळूकच्यावतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात 32 दात्यांनी रक्तदान केले. वाढदिवसाला केवळ शुभेच्छांचे कार्यक्रम न करता रक्तदानासारखा आजच्या काळात अत्यंत महत्त्वाच्या उपक्रम आपण करु शकतो. पैसे उधळण्यापेक्षा समाजासाठी सत्कारणी लागतील असे काम आपण करु शकतो. असा आदर्श राजकीय पक्षातील तालुकास्तरावर काम करणारा कार्यकर्ता सचिन ओक याने या शिबिराच्या निमित्ताने सर्वांसमोर ठेवला आहे.
गुहागर तालुक्यातील कोतळूक येथील श्री हनुमान मंदिराच्या सभामंडपात रक्तदान शिबिर पार पडले. शिबीरामध्ये रक्तदान करण्यासाठी एकूण 45 जणांनी नोंदणी केली होती. मात्र तपासणीमध्ये पात्र ठरलेल्या 32 रक्तदात्यांनी रक्तदान केले. या शिबीराची सुरूवात दिपप्रज्वलन व श्री हनुमंतचरणी पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. यावेळी कोतळूकचे माजी सरपंच दत्तात्रय ओक, कोतळूक सोसायटी चेअरमन लक्ष्मण शिगवण, माजी सभापती विलास वाघे, पिंपरचे माजी सरपंच प्रकाश मोरे, उदमेवाडीचे अध्यक्ष अनंत चव्हाण, राजा हिंदुस्थानी मंडळाचे अध्यक्ष उल्हास आरेकर, उदमेवाडीचे माजी अध्यक्ष आबा आरेकर, दिलिप मोहिते, जेष्ठ नागरिक बापू महाडीक, डॉ. पराग पावरी, भाजपा युवा मोर्चा गुहागर तालुकाध्यक्ष संजय मालप, गुहागर शहराध्यक्ष प्रकाश रहाटे, नरेश वराडकर, भोपाळ बोले आदी उपस्थित होते.
रक्तदान संकलन करण्यासाठी रत्नागिरी शासकीय रूग्णालयाच्या रक्तपेढीच्या डॉ. संगीता सोलकर, श्रीमती वाय. व्ही. सावंत, प्रभाकर मुळेकर, एम.एस.पवार, एस.सी.वाडेकर, एस.डी.चव्हाण उपस्थित होते. भारतीय जनता पार्टी उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्ष डॉ विनय नातू, गुहागर तालुकाध्यक्ष निलेश सुर्वे, ओबीसी सेलचे अध्यक्ष दिनेश बागकर, गटप्रमुख सुनिल भेकरे, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष प्रशांत शिरगावकर, जिल्हा सरचिटणीस सुरेश दादा सावंत, भारतीय जनता पार्टीचे विविध आघाड्यांचे प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते, सर्व पक्षीय कार्यकर्ते, विविध स्तरांतील मान्यवर नागरीकांनी यावेळी सचिन ओक यांना शुभेच्छा दिल्या.