आज तो घाबरतोय… कोरोनाला नाही बदनामीला. कारण कोरोना झालेल्या माणसाकडे घरातले कुटुंब, जवळचे मित्र, समाज, एका वेगळ्या नजरेने बघतो. ती कुत्सित नजर आणि घायाळ करणारे शब्द याच्या भितीने तो आपला आजार लपवतो.
Mayuresh Patankar
आणि एक दिवस बळी पडतो….. कोरोनामुळे.
दुर्दैवाने आलेल्या दु:खद बातमीनंतर लाट येते ती सहानुभुतीच्या चार शब्दांची. जो परत न येण्याच्या वाटेवर निघुन गेला त्यांच्या आठवणींच्या उमाळ्याने डोळे भरुन येतात. पण आम्ही विसरतो 8-10 दिवसांपूर्वी मनात, जनात बोलले शब्द.
मंडळी, आज या लेखाच्या निमित्ताने तुमच्यासमोर काही मुद्दे ठेवतोय. जे गेल्या सहा महिन्यातील अनुभव, चर्चा यामधुन समोर आलेत. हा लेख वाचा आणि मग ठरवा वाचायचं, जगायंच की खोट्या प्रतिष्ठेचे बुरखे घालून जगायचं.?????
- आता दुकाने, कार्यालये, एस.टी. सुरु झाली म्हणजे कोरोना गेला असे मुळीच समजू नका. कोरोनाचे संकट आहे तसेच आहे. किंबहुना ते अधिक गडद झाले आहे. त्यामुळे मार्च, एप्रिल मे महिन्यात जी काळजी आपण घेत होतो ती आजही घ्यायची आहे.
- विलगीकरण ही शिक्षा नाही. आपल्यापासून आपल्या परिवाराला कोरोना होवू नये म्हणून घ्यायची काळजी आहे. जर त्या व्यक्तिला गृह विलगीकरण म्हणून स्वतंत्र खोलीत ठेवले असेल तर स्वच्छता काटेकोरपणे पाळा. जेणेकरुन तुम्हाला कोरोनाचा संसर्ग होणार नाही. म्हणून विलगीकरणातील व्यक्तिला महारोग्याप्रमाणे वागणूक देवू नका.
- आज अनेक जण आपल्याला एकदा ताप येवून गेला तर तो वातावरणातील बदलामुळे आला असेल असे गृहित धरतात. आणि विलगीकरण नको म्हणून घरात कोणाशीच काही बोलत नाहीत. घरच्यांना माहिती असेल तर ते अन्य कोणाशी बोलत नाहीत. ही मोठी चूक ठरु शकते. ताप आला म्हणून तुम्ही तुमच्या डॉक्टरांकडे गेल्यावर जर त्यांनी तुम्हाला तपासणी करण्यास सांगितले असेल तर घाबरुन न जाता तपासणी करुन घ्या. कदाचित तुम्ही कोरोना पॉझिटिव्ह नसाल तर मनातील भिती संपून जाईल. कोरोना पॉझिटिव्ह असाल तर डॉक्टर सांगतील त्या सूचनांचे पालन करा.
- प्रत्येक कोरोना पॉझिटिव्ह व्यक्तीला कोविड केअर सेंटरमध्ये संस्थात्मक विलगीकरणात ठेवलेच जाते असे नाही. मोठी लक्षणे नसतील तर तुम्हाला डॉक्टर गृहविलगीकरणात रहाण्याची सूचना करतात. हे लक्षात ठेवा. तुम्हाला बीपी, शुगर, हार्ट प्रॉब्लेम असे आजार असतील तरच डॉक्टर संस्थात्मक विलगीकरण कक्षात ठेवतात.
- जर तुम्हाला विलगीकरणात ठेवले तर ती शिक्षा मानू नका. उलट पुढचे १४ दिवस तुम्ही विश्रांती घेवू शकता. तुमचा आवडता छंद जोपासू शकता. तुम्हाला तुमच्या मनाशी संवाद साधायला एक मोठा कालावधी मिळाला आहे. या काळात तुम्ही अनेक गोष्टी करु शकता. ही संधी सोडू नका.
- आज माझे कुटुंब माझी जबाबदारी अभियान सुरु आहे. या अभियानाला साथ द्या. तपासणी करा. कोणतीही गोष्ट लपवून ठेवू नका.
मंडळी, अनेक डॉक्टरांबरोबर झालेल्या गप्पा आणि आकडेवारीचा विचार केला तर माझी काही मते बनली आहेत. ती तुमच्या जवळ शेअर करतोय
- कोरोनामुळे मृत्यु आलेल्या व्यक्तिंपैकी अनेक व्यक्तींनी आधी दूर्लक्ष केल्याचे समोर आले आहे.
- कोरोनाच्या संसर्गाचे प्राथमिक लक्षण सुरवातीला येणारा किंचित ताप हे आहे. हाच ताप नंतर तापदायक ठरतो.
- सर्दी, खोकला ही तापानंतरची लक्षणे आहेत. तेव्हा एखादा दिवस येणाऱ्या तापाकडे दुर्लक्ष करु नये.
- कोरोनाच्या सामुहिक संसर्गाला आता सुरवात झाली आहे. तेव्हा कधी ना कधी तो आपल्या घरापर्यंत येवू शकतो. ही मानसिकता बनवून ठेवा. त्यामुळे संकट आपल्यापर्यंत आल्यावर आपण घाबरुन जाणार नाही.
- मास्क लावणे, सामाजिक अंतराचे भान ठेवणे, बाहेरुन आल्यावर हातपाय साबणाने धुणे, बाहेर घातलेले कपडे बदलुन मगच घरात वावरणे. अशा छोट्या छोट्या गोष्टीही आपण आवर्जुन केल्या पाहिजेत.
- आता कोरोनाची शक्ती कमी होतेयं. पण म्हणून त्याकडे दुर्लक्ष करुन चालणार नाही.
- घरात वयोवृध्द, लहान मुले असतील तर अधिक काळजी घ्या.