दोघांना अटक, पैशाच्या हव्यासापोटी गुन्हा घडल्याचे झाले उघड
गुहागर : सौ. सुनेत्रा दुर्गुळे यांचा खूनाचा शोध लावण्यात अवघ्या 12 तासांत पोलीसांना यश आले आहे. संजय श्रीधर फुणगुसकर (वय 40) व सत्यजित बबन पटेकर (वय 32) दोघेही रा. नवानगर अशी आरोपींची नावे आहेत. गुरुवारी रात्री 1.30 वा. त्यांना अटक करण्यात आली. आज (ता. 18) आरोपींना न्यायालयात हजर केल्यावर मा. न्यायालयाने संजय फुणगुसकरला 25 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. तर दुसऱ्या आरोपीची आरोग्य तपासणी करण्यास सांगितले आहे.
बँकेच्या महिला शाखाधिकाऱ्यांच्या खुनाने जिल्ह्यात खळबळ उडाली होती. या खुनाचे कारण काय, खूनी कोण, या प्रकरणाचा शोध पोलीस कसा लावतात याची उत्सुकता होती. पोलीस उपविभागीय अधिकारी नवनाथ ढवळे यांनी गुहागर मधील पोलीसांना सोबत घेवून तपासाची सुत्रे वेगाने फिरवली. दाभोळ खाडीतून मृतदेह बाहेर काढून शवविच्छेदन प्रक्रिया होईपर्यंत विविध मार्गाने माहिती संकलनाला पोलीसांनी सुरवात केली होती. मृतदेह पाण्यातून बाहेर काढल्यानंतर पंचनाम्यासह अन्य आवश्यक कायदेशीर प्रक्रिया घटनास्थळी पूर्ण करण्यात आल्या. त्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला. पोलीस उपविभागीय अधिकारी नवनाथ ढवळे व अन्य अधिकारी गुहागर पोलीस ठाण्यात आल्यावर तपासाला गती प्राप्त झाली. शवविच्छेदनाचा प्राथमिक अहवाल येईपर्यंत चौकशीलाही सुरवात झाली होती. तपासाबाबत दिलेल्या प्रसिध्दपत्रकात पोलीसांनी म्हटले आहे की, सौ. सुनेत्रा यांच्या मोबाईल सिडीआरचे विश्लेषण करण्यात आले. नातेवाईकांकडून माहिती घेण्यात आली. त्यावरुन सौ. सुनेत्रा यांनी संजय श्रीधर फुणगुसकर यांच्या सोबत वेलदूर ते शृंगारतळी असा प्रवास केल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे संजय फुणगुसकर यांच्या मोबाईल सिडीआरचेही विश्र्लेषण करण्यात आले. त्यानंतर प्रत्यक्ष चौकशीला सुरवात झाली त्यावेळी पोलीसांनी संकलीत केलेली माहिती व संजय फुणगुसकर सांगत असलेल्या गोष्टींमध्ये तफावत आढळून आली. अखेर पोलीसी खाक्या दाखवल्यावर संजय श्रीधर फुणगुसकर यांनी सत्यजित बबन पटेकर याला सोबत घेवून पैशांसाठी सौ. सुनेत्राचा खून केल्याचे सांगितले.
संजय फुणगुसकर हा विदर्भ कोकण ग्रामीण बँक शाखा वेलदूरमध्ये सराफाचे काम करत होता. सौ. सुनेत्रा यांनी सोन्याच्या व्यवहारासाठी सात लाख रुपये आणलेले होते. सदर पैशांच्या हव्यासापोटी संजय फुणगुसकर आणि सत्यजित बबन पटेकर यांनी सौ. सुनेत्रा दुर्गुळे यांचा गळा आवळून खुन केला. त्याच्या प्रेताची विल्हेवाट लावण्यासाठी मयताला वेलदूर नवानगर तरी जेट्टी येथे आणून मयताच्या पायाला व कमरेला रस्सी बांधून रस्सीला दोन मोठे दगड बांधून जेट्टीसमोर दाभोळ खाडीत ढकलून देण्यात आले. सदरचा गुन्हा उघडकीस आला असून दोन्ही आरोपींना गुरुवारी (ता. 17) रात्री 1.31 वा. अटक करण्यात आली आहे.
सदर घटनेत अवघ्या चार तासांत पोलीस संशयितांपर्यंत पोचले. चौकशी करुन 12 तासांच्या आत पोलीसांनी आरोपींना शोधले. या तपासामध्ये उपविभागीय पोलीस अधिकारी नवनाथ ढवळे यांनी महत्त्वाची भूमिका होती. तपास पथकात गुन्ह्याचे चौकशी अधिकारी पोलीस उपनिरिक्षक किरणकुमार कदम, सहाय्यक पोलीस निरीक्षक बी. के. जाधव, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक आनंदराव पवार, पोलीस हेडकॉन्स्टेबल राजू कांबळे, सचिन पाटील, सचिन चव्हाण, संतोष साळसकर, संतोष माने, वैभव चौगुल, हेमलता कदम, आदीनाथ आदवडे, सुभाष भागणे, शांताराम झोरे, राकेश बागुल, अरुण चाळके, गुरु महाडिक, रमीझ शेख, पोलीस उपविभागीय कार्यालयातील मिलिंद चव्हाण, इम्रान शेख, मनोज कुळे यांचा समावेश होता.