पक्षाने आणि नेत्यानेही खबर ठेवली आहे गुलदस्त्यात
गुहागर : तालुक्यातील एक नेता पक्षप्रवेशाच्या तयारीत असल्याची चर्चा जोरदार सुरु आहे. संबंधित पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांकडून नवरात्रोत्सवाच्या दिवसात हा प्रवेश व्हावा म्हणून जोरदार आग्रह सुरु आहे. आठवडाभरापूर्वी गुहागर दौऱ्यावरील खासदार सुनील तटकरे यांनी त्यावेळी नगराध्यक्ष राजेश बेंडल अचुक वेळी योग्य निर्णय घेतली असे पत्रकारांना सांगितले होते. त्यामुळे राजेश बेंडल पुन्हा राष्ट्रवादीत सक्रीय होणार की अन्य कोणी दुसऱ्या पक्षात जाणार याची चर्चा सध्या सुरु आहे.
सध्या गुहागर तालुक्यात पक्ष प्रवेशात गुहागरचे नगराध्यक्ष राजेश बेंडल यांचे नाव आघाडीवर आहे. पण प्रत्यक्षात त्यांनी राष्ट्रवादी कधी सोडली होती. असा प्रश्र्न आहे. गुहागर नगरपंचायत निवडणुकीआधी त्यांनी सक्रीय राजकारणापासून दूर रहाणे पसंत केले होते. गुहागर नगरपंचायत निवडणुकीचे वेळी शहर विकास आघाडीचे गठन करुन त्यांनी थेट नगराध्यक्ष पदाची निवडणुक लढवली. या निवडणुकीत शहर विकास आघाडीने शिवसेनेसोबत युती केली होती. त्यामुळे नगरपंचायत निवडणुकीच्या प्रचारात तत्कालीन पालकमंत्री रवींद्र वायकर यांनी एक सभा गुहागरमध्ये घेतली. त्यावेळी व्यासपीठावर नगराध्यक्ष पदाचे उमेदवार म्हणून राजेश बेंडल होते. परंतू त्यांनी राष्ट्रवादीच्या पक्ष सदस्यांचा राजिनामा दिल्याचे ऐकिवात नाही. किंबहुना नगराध्यक्ष झाल्यानंतर विधानसभा निवडणुकीचे वेळी त्यांनी राष्ट्रवादीचे उमेदवार सहदेव बेटकर यांचाच प्रचार केला. त्यामुळे राजेश बेंडल यांचा राष्ट्रवादीत पक्षप्रवेश असा विषय चर्चेत येण्याची आवश्यकता नाही.
या पार्श्र्वभुमीवर गुहागर तालुक्यातील नेत्याचा पक्षप्रवेश होणार अशी चर्चा असल्याने तो नेता कोण, कोणत्या पक्षात प्रवेश करणार असा प्रश्र्न अनेकांना पडला आहे. अर्थात हाती मिळालेल्या माहितीप्रमाणे हा पक्षप्रवेशाचा कार्यक्रम मुंबईत होणार आहे. गेल्या पाच सहा वर्षांचा इतिहास पाहिला तर शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात महत्त्वाच्या नेत्यांचे पक्षप्रवेश मुंबईत होतात. भारतीय जनता पार्टीमध्ये मुंबईत पक्षप्रवेश केल्याचे ऐकिवात नाही. त्यातच नुकतीच भाजपची प्रदेश कार्यकारीणीची सभाही पार पडली. याच सभेत बड्या नेत्याचा पक्ष प्रवेश झाला असता. त्यामुळे सदर नेता शिवसेना किंवा राष्ट्रवादीत जाणार हे जवळपास नक्की आहे. पण पक्षाने आणि प्रवेशकर्त्या नेत्यानेही याबाबतची खबर गुलदस्त्यातच ठेवली आहे.