गुहागर, ता. 31 : गुहागर परिसरातील अनेक गावांमध्ये, वाड्यांमध्ये संगीताचा वारसा जपणारे अनेक कलाकार आहेत. नाट्यगीत, भावगीत, अभंग, चित्रपट गीत, जाखडी, भजने, संगीत नाटके, नमने यांच्या माध्यमातून संगीत घराघरांमध्ये पोहोचले आहे. यामध्ये विशेष उल्लेख करायचा झाला तर गुहागर असगोली येथील तांबे कुटुंबाचा. सतत चार पिढ्या संगीताचा वारसा या कुटुंबाने जोपासला आहे. अशा तांबे कुटुंबात जन्मलेला प्रकाश तांबे म्हणजे एक हरहुन्नरी व्यक्तिमत्व आहे. Versatile Artist Prakash Tambe


प्रकाश तांबे यांनी शालेय जीवनापासूनच तबला वादनाला सुरुवात केली. गुहागरमध्ये आलेल्या कोणत्याही गायकाला हमखास साथ करेल असा साथीदार म्हणजे प्रकाश तांबे. शास्त्रीय गायन असो उपशास्त्रीय गायन असो नाट्यसंगीत, अभंग, भजन असो अगदी मनापासून तबल्याची साथ करतो. मग तो गायक मोठा असो किंवा नवोदित असो. सर्वांना सांभाळून घेणारा कलाकार म्हणजे आमचा प्रकाश तांबे. त्यांचे आजोबा कै. रामभाऊ तांबे संगीत नाटकातून स्त्री भूमिका करत असत. अत्यंत गोड गळा, देखणे रुबाबदार व्यक्तिमत्त्व, बालगंधर्वांची आठवण करून देत असत. वडील कै. गजानन तांबे यांनी सुमारे साठ वर्षाहून अधिक काळ गुहागर तालुक्यातील उत्सवात होणाऱ्या किर्तनाला तबल्याची साथ केली आहे. Versatile Artist Prakash Tambe


तसेच त्यांच्या कन्या कु. प्रियांका व कु. तेजस याही गायनामध्ये निपुण असून गायनाचे शिक्षण घेत आहेत. अशाप्रकारे चार पिढ्या संगीताचा वारसा जोपासत असलेले हे कुटुंब आहे. प्रकाश तांबे यांचे महाविद्यालयीन शिक्षण बीकॉम पर्यंत झाले. श्री महेश कुमार देशपांडे (चिपळूण) यांच्याकडे तबल्याचे शिक्षण घेऊन तबला विशारद ही पदवी घेतली आहे. Versatile Artist Prakash Tambe
1985 पासून अनेक मोठ्या तसेच नवोदित कीर्तनकारांना साथ केली आहे. सुरभी भजन मंडळाच्या स्थापनेपासून पाचशेपेक्षा जास्त भजनात साथ केली आहे व करत आहे. अनेक तालुका, जिल्हास्तरावर तसेच राज्य स्तरावर देखील सहभाग घेतला आहे. गोपाळ कृष्ण आरती मंडळ, राधाकृष्ण आरती मंडळ यांनाही मार्गदर्शन करुन साथ करत आहे. संगीत शारदा, गोराकुंभार, एकच प्याला, पाणिग्रहण, संशयकल्लोळ या नाटकांना तबल्याची साथ केली आहे. तसेच अंमलदार, म्हातारा न इतुका, सभ्य गृहस्थ हो या नाटकात भूमिका करून उत्तम अभिनय केला आहे. उपजत गोड गळा असल्यामुळे प्रकाश गायनामध्ये ही कमी नाही. गायनात साथ करताना सर्वांना सांभाळून घेणारा, मार्गदर्शन करणारा आणि विशेष म्हणजे मानधना बद्दल आग्रही नसणारा गुणी कलाकार म्हणजे प्रकाश तांबे. ‘कलेसाठी कला’ हेच ध्येय ठेवलेल्या प्रकाश तांबे वाटचाल करत आहेत. Versatile Artist Prakash Tambe

