गुहागर : तालुक्यातील कोकण एलएनजी प्रा. लि. या प्रकल्पात गॅसवाहु जहाजे येण्यास सुरवात झाली आहे. पावसाळ्यानंतर (15 सप्टेंबरनंतर) आज तिसरे गॅसवाहु जहाज प्रकल्पात दाखल झाले असून त्यातून गॅस काढून घेण्यास सुरवात झाली आहे. मार्शल व्हिसलिव्हस्काय (MARSHAL VASILEVSKIY) असे या जहाजाचे नांव आहे.
रशियामधील मार्शल व्हिसलिव्हस्काय या जहाजाने नायजेरियातील बोन्नी बंदरात गॅस भरुन 12 सप्टेंबरला भारताच्या दिशेने प्रवास सुरु केला. सुमारे 25 दिवसांनी (6 ऑक्टोबरला) हे जहाज अंजनवेल येथील कोकण एलएनजी प्रकल्प परिसरातील समुद्रात पोचले. आज शासकीय कागदपत्रांची पूर्तता झाल्यावर हे जहाज कोकण एलएनजी जेटीवर आणले जाईल. तेथे मार्शल व्हिसलिव्हस्काय जहाज स्थिर झाल्यावर त्यातील सुमारे 1.5 लाख क्युबिक मिटर (15 कोटी लिटर) इतका गॅस पाईपलाईनद्वारे एलएनजी प्रकल्पातील टाक्यांमध्ये आणण्याचे काम सुरु होईल.
द्रवरुप गॅस जहाजातून काढणे हे मोठे जिकीरीचे काम असते. वजा (-) 160 डिग्री सेल्सियस तापमानात अत्युच्च दाबामुळे नैसर्गिक वायुचे द्रव तयार होते. हा द्रवरुप वायु वजा (-) 160 डिग्री सेल्सियस तापमानातच तब्बल अडीच किलोमिटरच्या पाईपलाईनमधुन वाहून नेला जातो. एलएनजी प्रकल्पातील स्टोअरेज टँकमध्ये तेवढ्याच तापमात साठवला जातो. प्रकल्पामध्ये प्रक्रिया करताना हा द्रवरुपातील वायु 600 पट वाढतो.
भारतातील इंधनाची वाढती मागणी लक्षात घेवून केंद्र सरकारच्या गॅस ॲथॉरिटी इंडिया लिमिटेड (गेल) या कंपनीने ऑक्टोबर 2012 मध्ये रशियामधील गॅझप्रोम मार्केटींग ॲण्ड ट्रेडिंग या कंपनीशी 20 वर्ष गॅस पुरविण्याबाबत करार केला आहे. या करारानुसार गॅझप्रोमने भारताला दरवर्षी 2.5 मिलियन टन इतका द्रवरुप नैसर्गिक वायु पुरवायचा आहे.