आमदार भास्करशेठ जाधव यांचे यशस्वी प्रयत्न
गुहागर : कामथे रुग्णालयाला रुग्णवाहिकेची आवश्यकता होती. हे समजताच गुहागरचे आमदार भास्कर जाधव यांनी तातडीने नवी कोरी रुग्णवाहिका उपलब्ध करून दिली. गुहागर मधील कोरोना रुग्णांवरील उपचारांसाठीच्या अडचणीबाबत जिल्हाधिकारी श्री. लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी आमदार जाधव यांच्याशी संपर्क साधला व आ. जाधव यांच्या पुढाकाराने गुहागर कॉटेज हॉस्पिटल येथे दहा बेडचे व शृंगारतळी येथील रेनबो लॉज येथे पेड कोविड हॉस्पिटल तातडीने सुरू होणार आहे. यामुळे गुहागर वासीयांना दिलासा मिळणार आहे. चिपळूणकडे येण्याची त्यांची पायपीट थांबणार आहे. गुहागरमध्ये तातडीने दोन कोविड हॉस्पिटल सुरू होत असताना आमदार जाधव यांची प्रशासनावरील पकड पुन्हा एकदा सिद्ध झाली आहे.
बुधवार दि. १४ एप्रिल रोजी जिल्हाधिकाऱ्यांनी आमदार जाधव यांच्याशी संपर्क साधला. गुहागर मध्ये कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने कोविड सेंटर सुरू करण्यासाठी आपण यापूर्वी मागणी केली होती. आताही सहकार्य आवश्यक असल्याचे जिल्हाधिकारी मिश्रा म्हणाले. गुहागरमध्ये कॉटेज हॉस्पिटलची स्वतंत्र इमारत असून या ठिकाणी दहा बेड ऑक्सिजन व आवश्यक सुविधा उपलब्ध आहेत. तेथे तातडीने कोविड हॉस्पिटल सुरू करावे, असे आमदार जाधव यांनी सांगितले. आमदार जाधव यांनी परवानगीसह सर्वतोपरी सहकार्य करण्याची ग्वाही दिली.
शृंगारतळी येथे गेल्यावर्षी डॉ. राजेंद्र पवार यांनी रेनबो लॉज येथे पेड कोविड हॉस्पिटल सुरू केले होते. मात्र ते आता बंद आहे. मालकाने एक वर्षाचे भाडे ऍडव्हान्स द्यावे, अशी मागणी केल्याने कोविड सेंटर बंद पडले होते. आमदार जाधव यांनी हे लॉज तातडीने प्रशासनाने ताब्यात घ्यावे, असे सांगितले व जिल्हाधिकाऱ्यांनी त्यानंतर अवघ्या काही तासात तसा आदेश काढला. आता रेनबो लॉज येथेही पेड कोविड हॉस्पिटल सुरू होणार आहे. शासकीय दरानुसार या ठिकाणी रुग्णांवर उपचार होणार असल्याने शासकीय दरात रेमडे व अन्य औषध उपलब्ध होणार आहेत. परिणामी गुहागरमध्ये कोरोना रुग्णांवर गुहागरमध्ये उपचार होतील व चिपळूण, कामथे येथील आरोग्य सेवेवरील भार कमी होईल. तसेच वेळणेश्वर येथील कोविड सेंटर ही गरज भासल्यास सुरू केले जाईल असे त्यांनी सांगितले. काही तासात गुहागरमध्ये दोन कोविड हॉस्पिटल सुरू करण्याचा प्रयत्न मार्गी लागल्याने आमदार जाधव यांचा प्रशासनावरील असलेला वचक दाखवून दिला आहे.