पर्यावरण प्रेमींसाठी सुवार्ता, 123 अंडी केली संरक्षित
गुहागर, ता. 16 : अखेर नव्या वर्षात ऑलिव्ह रिडले कासविणने गुहागरच्या समुद्रकिनाऱ्यावर अंडी घातली. पहिल्या घरट्यातील 123 अंडी शुक्रवारी संरक्षित करण्यात आली आहे. निसर्ग वादळ, कमी दाबाच्या पट्ट्यामुळे पश्चिमेकडील समुद्रात निर्माण झालेली वादळजन्य परिस्थिती आणि अवकाळी पाऊस यामुळे ऑलिव्ह रिडले प्रजातीची कासवे अंडी घालण्यासाठी येण्याचा काळ तीन महिन्यांनी लांबला. गुहागरला स्मशानभुमी परिसरातील समुद्रकिनाऱ्यावर शुक्रवारी सकाळी कासवमित्र आल्हाद तोडणकर कासवाच्या अंड्यांचे एक घरटे सापडले. या घरट्यात 123 अंडी होती. गेले तीन महिने आल्हाद तोडणकर दररोज पहाटे साडेसात कि.मी. लांबीचा समुद्रकिनारा तुडवत आहेत. मात्र आजपर्यंत त्यांना एकही घरटे सापडले नव्हते. त्यामुळे निराश झालेल्या आल्हाद तोडणकरांना नव्या वर्षात मात्र आनंदाचा क्षण गवसला. समुद्रकिनाऱ्यावरील खुणांवरुन मोठी कासवीण अंडी घालण्यासाठी येवून गेल्याचे त्यांच्या लक्षात आले. कासविण येवून गेल्याच्या खूणा ठसठशीत असल्याने घरटे शोधण्यासाठी त्यांना मेहनत घ्यावी लागली नाही. घरट्यातून काढलेली अंडी वनखात्यांच्या कासव संवर्धन केंद्रात सुरक्षित ठेवण्यात आली आहेत. मोठी कासवीण अंडी घालून गेल्यामुळे आता हे प्रमाण वाढेल. असा अंदाज तोडणकर यांनी वर्तविला आहे.