पोकलेनचे ७ लाख किंमतीचे १० पिस्टन चोरीला
गुहागर, ता. 20 : तालुक्यातील निगुंडळ येथील खडी क्रशरवर उभ्या असलेल्या पोकलेनचे सुमारे 7 लाखांचे 10 पितळी पिस्टन चोरीला गेले आहेत. याबाबत पोकलेन मालक आनंद जगदाळे यांनी गुहागर पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे. पोकलेन चालक किशोर महतो (मुळ गाव आंबो, ता. परखंड, जि. हजारीबाग, झारखंड) यांनी हे कृत्य केल्याचा आरोप जगदाळे यांनी केला आहे.
आनंद जगदाळे (रा. पेडगाव, ता. खटाव, जि. सातारा) यांनी पोलीस ठाण्यात दिलेल्या माहितीनुसार, जगदाळे यांनी स्वमालकीचा पोकलेन अवधुत सुशील वेल्हाळ यांच्या निगुंडळ येथील खडी क्रशरवर भाड्याने दिला होता. हा पोकलेन चालविण्यासाठी आनंद जगदाळे यांनी चालक किशोर महतो यांच्या ताब्यात दिला होता. निगुंडळ येथील कामाची पहाणी करण्याकरीता आनंद जगदाळे मंगळवारी (ता. 19) सकाळी आले. सकाळी 10 वाजल्यापासून सायंकाळी 5 वाजेपर्यंत किशोर महतो यांच्याबरोबर आनंद जगदाळे निगुंडळ येथील खडीक्रशरवर होते. मंगळवारी रात्री 8.30 च्या सुमारास दोघांनी एकत्र जेवळ केले. त्यानंतर आनंद जगदाळे आपल्या कारमध्ये झोपायला गेले तर किशोर खडीक्रशरवरील अन्य कामगार झोपतात त्या खोलीत झोपायला गेला. मंगळवारी रात्री 11.30 वा. खडीक्रशरवरील कामगारांपैकी गणेश वामनवड यांनी आनंद जगदाळे यांना झोपतून उठवले. किशोर महतो रात्री 9.30 वा. फोनवर बोलत बाहेर पडला तो अजून झोपायला आलेला नाही. अशी माहिती गणेश यांनी दिली. आनंद जगदाळे यांनी अन्य कामगारांसोबत किशोरचा शोध घेतला. त्यावेळी पोकलेनवर कामाला जाताना असणारी बॅगही किशोरच्या खोलीत नसल्याचे लक्षात आले. त्याचे दोन्ही मोबाईल स्वीच ऑफ लागत होते. त्यामुळे आनंद जगदाळे आणि शोध घेणारी मंडळी झोपायला गेली. बुधवारी (ता. 20) सकाळी आनंद जगदाळे खडीक्रशरवर गेले. तेथे उभा असलेला पोकलेन पहात असताना मशिनचे कंट्रोल व्हिल आणि स्विंग बेरींग खोललेले लक्षात आले. अधिक निरिक्षण केले असता पोकलेनचे कंट्रोल व्हीलमधील जे.सी.बी. कंपनीचे 6 पितळी पिस्टन आणि स्विंग व्हिलमधील 4 पिस्टन चोरीला गेल्याचे लक्षात आले. सदर पिस्टनची किंमत 7 लाख रुपये इतकी आहे. पोकलेनची चावी किशोर महतो याच्याकडेच असल्याने सदर कृत्य किशोर महतो याने केल्याचे आनंद जगदाळे यांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे. या घटनेचा अधिक तपास हेडकॉन्स्टेबल हनुमंत नलावडे करत आहेत.