गुहागर, ता. 21 : तालुक्यातील देवघर झोंबडी फाटा येथे गॅरेजमध्ये उभी असलेली दुचाकी अज्ञात व्यक्तिने जाळली. अशी तक्रार गॅरेजचे मालक ओंकार दत्ताराम चव्हाण यांनी गुहागर पोलीस ठाण्यात नोंदवली आहे. यामध्ये गाडीचे 8 हजार रुपयांचे नुकसान झाल्याचे नमुद करण्यात आले आहे.
ओंकार चव्हाण यांनी दिलेल्या तक्रारीनुसार त्याच्या गॅरेजमध्ये अविनाश दिलीप माने यांच्या मालकीची दुचाकी (क्र. जी.ए. 02 ए 5829) दुरुस्तीसाठी आली होती. सदर दुचाकी गुरुवारी सकाळी 6 ते 8.30 च्या दरम्यान अज्ञात इसमाने जाळली. ही गोष्ट ओंकार चव्हाण आपले गॅरेज उघडण्यास आले तेव्हा त्यांच्या निर्दशनास आली. यामध्ये दुचाकीचे 8 हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. सदर तक्रार गुहागर पोलीसांनी नोंदवून घेतली असून अधिक तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल हनुमंत नलावडे करत आहेत.
याबाबत ओंकार चव्हाण यांनी सांगितले की ते कोरोना संकटापूर्वी सौदीमध्ये कामाला होते. कोरोना काळात नोकरी सुटली. काहीतरी कमवले पाहिजे म्हणून चार महिन्यांपूर्वी त्यांनी देवघर झोंबडी फाटा येथे दुचाकी दुरुस्तीचे गॅरेज सुरु केले. त्यावेळी अविनाश माने यांनी त्यांची होंडा इटर्नो कंपनीची गाडी दुरुस्तीला ओंकार चव्हाण यांचेकडे दिली. सदर दुचाकीच्या कॉईल मिळत नसल्याने सुमारे दोन महिने ही दुचाकी ओंकार चव्हाण यांच्या गॅरेजमध्ये उभी होती.
दरम्यानच्या काळात ओंकार चव्हाण यांचा परिसरातील दोन मुलांशी वाद झाला होता. याच वादातून 19 जानेवारीला सदर मुलांनी ओंकार चव्हाण यांना झेडले होते. या संदर्भात ओंकार चव्हाण यांनी पोलीसांकडे तक्रार केली होती.
अविनाश माने यांच्या गाडीची दुरुस्ती करण्यासाठी आवश्यक भाग मिळाल्यावर गाडीच्या दुरुस्तीचे काम सुरु होते. अविनाश माने याचा मुलगा गॅरजेवर येवून रोज गाडीच्या कामाची प्रगती पाहून जात असे. 21 तारखेला ओंकार चव्हाण गॅरेज उघडण्यासाठी आले तेव्हा दारात उभी असलेली अविनाश माने यांची दुचाकी जळून खाक झाल्याचे लक्षात आले. दुचाकी जुनी असल्याने नुकसानीचे मुल्यांकन केवळ 8 हजार रुपये झाले असले तरी संपूर्ण दुचाकी चालू स्थितीत आणण्यासाठी रु. 50 हजार पेक्षा जास्त खर्च येणार आहे. सदर दुचाकी कोणी जाळली याचा पुरावा ओंकार चव्हाण यांच्याकडे नाही. त्यामुळे नुकसान आणि मनस्ताप अशा दोन्ही गोष्टी ओंकार चव्हाण यांना सहन कराव्या लागत आहेत.
विध्वंसक वृत्ती धोकादायक गुहागर तालुक्यात अशा प्रकारे दुचाकी जाळण्याचा प्रयत्न प्रथमच झाला आहे. आज गुहागर तालुक्यातील अनेक घरांबाहेर अंगणात, गॅरेजच्या दारात उघड्यावर दुचाकी, चारचाकी उभ्या असतात. मोठ्या बाजारपेठांमध्ये तर अनेकजण दुचाकीची किल्लीही काढत नाही. आपल्या वाहनाला कोणीही इजा करणार नाही. असा विश्र्वास तालुकावासीयांना वाटतो. मात्र आजच्या घटनेतील विध्वंसक वृत्ती वाढू लागली तर सर्वच वाहन मालकांच्या चिंतेत भर पडणार आहे. त्यामुळे या वृत्तीला आळा घालणे गरजेचे आहे.