गुहागर : महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभेच्या कोकण विभाग अंतर्गत रत्नागिरी जिल्हा तेली समाज सेवा संघ यांच्या मार्गदर्शनाखाली गुहागर तालुका तेली समाज सेवा संघाच्या वतीने ओबीसींच्या न्याय्य मागण्यांचे निवेदन गुहागर तहसीलदार लता धोत्रे यांना देण्यात आले.
Guhagar Taluka Teli Samaj Seva Sangh under the guidance of Ratnagiri District Teli Samaj Seva Sangh under the Konkan Division of Maharashtra Prantik Telik Mahasabha submitted a statement of just demands of OBCs to Guhagar Tehsildar Lata Dhotre.
ओबीसी आरक्षण, जात निहाय जनगणना आदी प्रमुख मागण्यांसाठी तालुक्यातील विविध भागांतून कोरोना नियमांचे व प्रशासनाच्या सुचनांचे पालन करीत तेली समाज एकवटला होता.यावेळी प्रसिद्धी प्रमुख अमोल पवार यांनी उपस्थित समुदायाला आंदोलना मागची भूमिका याविषयी मार्गदर्शन केले. अध्यक्ष शशिकांत पवार यांनी आंदोलनाची गरज आणि पुढील पिढीसाठी असणारे महत्व विशद केले. कोकण प्रांत सचीव चंद्रकांत झगडे यांनी आगामी काळात महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभेच्या माध्यमातुन ओबीसी आरक्षण,जात निहाय जनगणना याबाबत घ्यावयाची भुमिका, आंदोलनाची दिशा याविषयी मार्गदर्शन केले.यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
सर्वोच्च न्यायालयाला ओबीसींच्या स्थानिक स्वराज्य संस्थांमधील आरक्षणा करिता इम्पिरिकल डाटा अपेक्षित आहे. मराठा आरक्षणाच्या वेळी जसा संकलित केला गेला होता त्याच धर्तीवर डाटा संकलीत करून सदर डाटा महाराष्ट्र शासनाने पुढील तीन महिन्यात सर्वोच्च न्यायालयात सादर करावा तसे शपथपत्र दाखल करावे. सदर डाटाच्या आधारे सर्वोच्च न्यायालयात अपिल करून स्थगिती आदेश रद्द करवून राज्यात २७% ओबीसींचे रद्द केलेले राजकीय आरक्षण पुन्हा लागू करावे. महाराष्ट्र शासनाच्या राज्य निवडणूक आयोगाने पोटनिवडणुकीसाठी दि.२३ जून२०२१ रोजी अधिसूचना काढली आहे ती रद्द करण्यासाठी महाराष्ट्राचे प्रधान सचिव सिताराम कुंटे यांनी दिलेल्या २४ जूनच्या पत्राप्रमाणेच कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर पोटनिवडणूक रद्द करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात अपील करुन होऊ घातलेल्या पोटनिवडणूका रद्द कराव्यात. राज्य व केंद्रशासनाने मंडल आयोगाच्या सर्व शिफारशी लागू कराव्यात.
केंद्र शासन व महाराष्ट्र शासनाने ओबीसींची जातीनिहाय जनगणना करावी व ओबीसींच्या संख्येच्या प्रमाणात, टक्केवारीनुसार त्यांना प्रत्येक क्षेत्रात आरक्षण देण्यात यावे. राज्य व केंद्र सरकारने जातीनिहाय जनगणनेनुसार ओबीसी आरक्षणाचा कायदा करावा या प्रमुख मागण्या निवेदनाद्वारे करण्यात आल्या आहेत. सदर मागण्यांची त्वरीत अंमलबजावणी केली नाही तर महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभेच्या माध्यमातून ओबीसी समाज रस्त्यावर येऊन तीव्र आंदोलन करील असा इशारा देण्यात आला आहे.
यावेळी महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा कोकण विभागीय सचिव चंद्रकांत झगडे, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख अमोल पवार, तालुका अध्यक्ष शशिकांत पवार, उपाध्यक्ष अनिल रहाटे, महिला आघाडी अध्यक्षा दिव्या किर्वे, युवक अध्यक्ष प्रितम रहाटे, एकनाथ रहाटे, प्रकाश झगडे, प्रदीप पवार, विश्वनाथ रहाटे, नितीन खानविलकर,हरीश्चंद्र रहाटे, विनोद महाडिक, गणेश किर्वे, राजेश महाडिक यांसह तालुक्यातील तेली समाज बांधव उपस्थित होते.प्रदिप पवार यांनी उपस्थितांचे आभार मानले.